काश्मीरच्या लोककथा
दुष्ट मुलांची फजिती
दगडांच्या चार पिशव्या
एक फार श्रीमंत म्हातारा होता. आता आपण मरणार, असे त्याला वाटले. म्हणून त्याने मुलांना बोलावले आणि सगळी मालमत्ता त्यांच्यात वाटून दिली. पण त्यानंतर कितीतरी वर्षे तो मेला नाही. त्यातली बरीच वर्षे दुःखात गेली. म्हातारपणाचा थकवा तर होताच. शिवाय मुलांच्या शिव्या आणि छळही त्याला खूप सोसावा लागला. वडिलांकडे पैसा होता, तोवर प्रत्येक मुलगा दुसऱ्यापेक्षा जास्त त्यांना खूश ठेवायला धडपडत असे. त्यांचा जास्त पैसा आपल्याला मिळावा, अशी त्याची आशा होती. पण आता हिस्सा हाती आल्यावर म्हातारा कधी जातो, याची त्यांना पर्वा उरली नाही. उलट, तो जितक्या लवकर जाईल तितके बरे, असेच त्यांना वाटे. तो नुसता त्रास होता आणि फुकटचा खर्च. याचे म्हाताऱ्याला फार दुःख होत असे. एके दिवशी त्याला एक मित्र भेटला. म्हाताऱ्याने त्याला स्वतःची सगळी दुःखे सांगितली. मित्राला त्याची फार कीव आली. यावर विचार करून काय करायचे ते लवकरच येऊन सांगेन, असे त्याने वचन दिले. त्याने शब्द पाळला. काही दिवसांनी तो म्हाताऱ्याला भेटायला आला. त्याने म्हाताऱ्यासमोर दगडगोट्यांनी भरलेल्या चार पिशव्या ठेवल्या. “मित्रा, ऐक,” तो म्हणाला. “मी आज इथे आलो होतो, हे तुझ्या मुलांना कळेल आणि ते त्याविषयी विचारतील. तेव्हा तू असे दाखव, की मी तुझे जुने देणे फेडायला आलो होतो. आणि तुला वाटत होते त्यापेक्षा तू कित्येक हजार रुपयांनी श्रीमंत आहेस, असेही दाखव. या पिशव्या स्वतःच्याच ताब्यात ठेव. जिवंत असेपर्यंत त्या कधीही मुलांच्या हाती लागू देऊ नकोस. मग पाहा, ते तुझ्याशी कसे बदलून वागतात. येतो मी. तुझे कसे चालले आहे ते पाहायला लवकरच पुन्हा येईन.” या नव्या संपत्तीची बातमी मुलांच्या कानावर गेली. तेव्हा ते वडिलांशी पूर्वी कधी नव्हते इतके प्रेमाने वागू लागले, त्यांची काळजी घेऊ लागले. म्हाताऱ्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत ते असेच वागत राहिले. मग त्यांनी हावरटपणाने पिशव्या उघडल्या. पाहतात तो काय, आत नुसते दगडगोटे! ही गोष्ट श्रीनगरमध्ये १८८० च्या दशकात जे. हिंटन नोल्स यांना काश्मिरी भाषेत सांगितली गेली. त्यांनी ती १८८८ मध्ये काश्मीरच्या लोककथांच्या इंग्रजी पुस्तकात छापली. ती सांगणारे होते श्रीनगरमधल्या रैनावारीचे शिवा बायू.