काश्मीरच्या लोककथा
गावचे बावळट
दहा चपात्या
एके दिवशी सकाळी एक शेतकरी कामाला निघाला. कमरेच्या कापडात त्याने दहा चपात्या बांधल्या होत्या. दिवसभराचे त्याचे जेवण तेवढेच होते. घरापासून थोडा दूर गेला नाही तोच त्याला कडकडून भूक लागली. तो खायला बसला. एक, दोन, तीन, चार चपात्या संपल्या, पण त्याचे समाधान झाले नाही. पाच, सहा, सात, आठ चपात्या संपल्या, तरी भूक होतीच. तरीही तो उठला आणि पुढे चालू लागला. “आता काय करू?” त्याने विचार केला. “काम सुरू करण्याआधीच सगळ्या चपात्या खाऊ नयेत. खाल्ल्या, तर उरलेल्या दिवसासाठी काय राहील? पण पोट तर भरले नाही.” पण त्याचा सगळा विचार वाया गेला. भुकेनेच वाद जिंकला. शेतकरी पुन्हा बसला आणि शेवटच्या दोन चपात्याही त्याने संपवल्या. मग कुठे तो खूश झाला. “अरेरे!” तो म्हणाला. “मी किती मूर्ख! या शेवटच्या दोन सगळ्यात आधी खायला हव्या होत्या. मग दिवसभरासाठी आठ चपात्या कमरेला उरल्या असत्या. आता मी भुकेने मरणार.” त्या मूर्खाला वाटत होते, की पहिल्या आठ चपात्यांनी त्याचे पोट मुळीच भरले नव्हते.
गावचे बावळट
टोप्या मोजल्या, मिरी चाखली
दहा शेतकरी रस्त्याच्या कडेला उभे राहून रडत होते. वाटेत आपल्यातला एक जण हरवला, असे त्यांना वाटत होते. प्रत्येकाने सगळ्यांना मोजले होते, आणि प्रत्येकाला नऊच भरले होते. “अरे, काय झाले रे?” तिथून जाणाऱ्या शहरातल्या एका माणसाने विचारले. “काय सांगू, साहेब,” शेतकरी म्हणाले, “गावातून निघालो तेव्हा आम्ही दहा जण होतो. आता नऊच उरलो.” ही माणसे किती मूर्ख आहेत, हे शहरातल्या माणसाने एका नजरेत ओळखले. प्रत्येक जण मोजताना स्वतःलाच विसरला होता. त्याने त्यांना डोक्यावरच्या टोप्या काढून जमिनीवर ठेवायला सांगितल्या. त्यांनी तसे केले आणि टोप्या मोजल्या. टोप्या दहा भरल्या. तेव्हा सगळे आहेत, याची त्यांना खात्री पटली आणि त्यांच्या जिवात जीव आला. पण हे कसे झाले, ते त्यांना कधीच कळले नाही. एक शेतकरी एका पैशाची काळी मिरी घ्यायला वाण्याच्या दुकानात गेला. वाण्याने त्याला साधारण मूठभर मिरी दिली. पण शेतकऱ्याला वाटले, ही नुसती चव बघायला दिली आहे. म्हणून त्याने ती सगळी मूठभर मिरी आपल्या मोठ्या तोंडात टाकली. मग मिरी घ्यायला त्याने आपले गवताचे पोते उघडून धरले. “जरा तिखट आहे,” तो म्हणाला, “पण हरकत नाही. आता माझी पैशाची मिरी तोलून दे. लवकर कर.”
गावचे बावळट
घोड्यासाठी प्रार्थना
एक शेतकरी देवाकडे सारखी प्रार्थना करत असे, “मला एक घोडा दे.” एके दिवशी फिरायला गेला असताना तो मोठ्याने म्हणाला, “देवा, मला घोडा दे!” त्याच क्षणी एक घोडेस्वार घोडीवर बसून तिथे आला. घोडी त्याच्यापाशी येताच व्याली. नुकते जन्मलेले शिंगरू आईच्या मागे चालू शकत नव्हते. तेव्हा स्वाराने शेतकऱ्याला ते उचलून घ्यायला लावले. स्वाराच्या मागोमाग त्याच्या घरापर्यंत शेतकऱ्याला ते वाहून न्यावे लागले. घरी पोहोचेपर्यंत त्या ओझ्याने शेतकरी इतका दमला, की त्याचा विचारच बदलला. “देवा,” तो म्हणाला, “माझी प्रार्थना ऐकून तू हे शिंगरू दिलेस, त्याबद्दल तुझे आभार. पण मी ते परत केले तर मला क्षमा कर. आता मला घोडा नको.” असे म्हणून त्याने ते शिंगरू जमिनीवर टाकले आणि तो चालता झाला.
गावचे बावळट
कापूस विकायला
ऑक्टोबरचा महिना होता. खेड्यातला एक माणूस आपला कापूस विकायला शहरात आला. शहरात तो पहिल्यांदाच आला होता. बाजारातून जाताना त्याने पाहिले, सोनार सोन्याचे दागिने सारखे आगीत घालतात आणि लगेच विकतात. सोने शुद्ध आहे की नाही, हे पाहायला गिऱ्हाईक जवळजवळ नेहमीच सोनाराला ते आगीत घालून दाखवायला लावत असे. “यात काहीतरी युक्ती असणार,” खेडूताने विचार केला. “मीही तसेच करतो. असे गिऱ्हाईक मिळत असेल, तर कापूस विकायला सगळीकडे कशाला भटकायचे?” म्हणून तो एका लोहाराच्या दुकानात गेला आणि त्याने कापसाची टोपली भट्टीत टाकली. मग तो वाट पाहत बसला. कापूस अर्थातच जळून गेला.
गावचे बावळट
रुपयाकडे रुपया
श्रीनगरमध्ये एक म्हण आहे, “रुपयिह निश छेह रुपे त्सतन.” म्हणजे, “रुपयाकडे रुपया येतो.” इंग्रजीतही अशीच म्हण आहे: पैशाने पैसा वाढतो. एका मूर्ख शेतकऱ्याने ही म्हण ऐकली आणि ती अक्षरशः खरी मानली. तो एका सराफाच्या दुकानापाशी गेला. तिथे चांदीच्या आणि तांब्याच्या नाण्यांच्या दोन-तीन राशी त्याला दिसल्या. मग त्याने भिंतीच्या एका फटीत एक रुपया खुपसला. “या, या रे रुपयांनो, माझ्या रुपयाकडे या!” तो म्हणाला. पण उत्साहाच्या भरात त्याने रुपया इतका आत ढकलला, की तो पलीकडे दुकानात पडला. तिथे तो सराफाच्या पैशात मोजला गेला. हे पाहून शेतकरी रडत घरी गेला. काही दिवसांनी त्याला ती म्हण सांगणारा माणूस भेटला. ती म्हण खोटी कशी ठरवली, ते शेतकऱ्याने त्याला सांगितले. “मुळीच नाही,” तो माणूस म्हणाला. “मी खरेच सांगितले. तुझा रुपया सराफाच्या रुपयांकडे गेला. ते जास्त होते, म्हणून त्यांचा जोर जास्त होता.” ही गोष्ट श्रीनगरमध्ये १८८० च्या दशकात जे. हिंटन नोल्स यांना काश्मिरी भाषेत सांगितली गेली. त्यांनी ती १८८८ मध्ये काश्मीरच्या लोककथांच्या इंग्रजी पुस्तकात छापली. पहिल्या तीन गोष्टी श्रीनगरमधल्या झैना कदलचे पंडित आनंद कौल यांनी सांगितल्या. चौथी आणि पाचवी काश्मीर खोऱ्यातल्या खुनमुह गावचे पंडित लालचंद यांनी सांगितली. आणि सहावी श्रीनगरचे फेरीवाले अहमद जू यांनी सांगितली.