काश्मीरच्या लोककथा
हुशार कोल्हा
रिकामे मडके
नांगरणीचे दिवस होते. एक शेतकरी सकाळीच शेताकडे निघाला. “लवकर मागोमाग जेवणाचे मडके घेऊन ये,” असे त्याने बायकोला सांगितले. भात शिजल्यावर तिने थोडा भात त्याच्यासाठी नेला. शेतात थोड्या अंतरावर तिने तो ठेवला. “हे तुझे जेवण,” ती म्हणाली. “मला आत्ता थांबता येणार नाही.” थोड्या वेळाने शेतकरी जेवण घ्यायला गेला. पाहतो तर मडके रिकामे! त्याला फार राग आला. संध्याकाळी घरी आल्यावर, माझी थट्टा करतेस, म्हणून त्याने बायकोला चांगलेच फैलावर घेतले. तिला अर्थातच वाटले, हा खोटे बोलतो आहे. तिला फार वाईट वाटले. दुसऱ्या दिवशी सकाळी निघण्यापूर्वी त्याने पुन्हा तिला जेवण आणायला सांगितले. “मला कुत्र्यासारखे उपाशी मारू नकोस,” असेही तो म्हणाला. त्या दिवशी तिने मातीच्या एका मोठ्या मडक्यात दुप्पट भात नेला. पुन्हा तिने तो शेतात ठेवला. “हे पाहा तुझे जेवण,” ती म्हणाली. “नंतर, आणले नाही असे म्हणू नकोस. मला थांबता येणार नाही. घराकडे पाहायला घरी कोणी नाही.” आणि ती निघून गेली. थोड्या वेळाने एक कोल्हा आला. आदल्या दिवशी येऊन शेतकऱ्याचे जेवण खाणारा तोच हा कोल्हा. त्याने मडक्यात तोंड घातले. भाताच्या हावेपोटी त्याने मडक्याच्या अरुंद तोंडात डोके जोराने खुपसले. मग ते त्याला बाहेर काढता येईना. त्याची फार दैना झाली. डोके हलवत तो इकडेतिकडे पळू लागला. मडके फुटावे म्हणून ते जमिनीवर आपटू लागला. शेवटी काय चालले आहे ते शेतकऱ्याला दिसले. तो हातात सुरा घेऊन धावत आला. “चोरा!” तो ओरडला. “म्हणजे माझे जेवण तूच चोरलेस तर!” “अहो, मला सोडा!” कोल्हा ओरडला. “मला या मडक्यातून सोडवा. तुम्ही मागाल ते मी देईन.” “ठीक आहे,” शेतकरी म्हणाला. त्याने तत्काळ मडके फोडले आणि कोल्ह्याला मोकळे केले.
हुशार कोल्हा
राजकन्येसाठी नवरा
“आभारी आहे,” कोल्हा म्हणाला. “आज मला सोडले, याचा तुम्हाला पस्तावा होणार नाही.” शेतकऱ्याचा निरोप घेऊन तो काही कोस दूर असलेल्या एका राजाच्या राजवाड्याकडे निघाला. राजाच्या दालनात जाऊन तो म्हणाला, “महाराज, आज्ञा द्या. मी आपल्या कन्येचे लग्न जुळवून देतो. माझ्यावर रागावू नका. राजकन्येला सर्व बाबतींत शोभेल असा एक माणूस मी नुकताच पाहिला नसता, तर या विषयावर आपल्याशी बोलायचे धाडस मी कधीच केले नसते.” “त्या माणसाला इथे घेऊन ये,” राजा म्हणाला. “मी त्याला पाहीन.” कोल्हा तडक शेतकऱ्याच्या घरी परत आला. “लवकर तयार व्हा,” तो म्हणाला. “तुम्हाला शेजारच्या देशाच्या राजाकडे जायचे आहे. त्याला तुम्हाला भेटायचे आहे. तुम्हाला जावई करून घ्यायचा त्याचा विचार आहे.” आधी शेतकरी कचरला. तो अडाणी होता, गरीब होता. राजाशी काय बोलावे, ते त्याला कसे कळणार? एवढ्या मोठ्या माणसासमोर कसे वागावे, हे त्याला कसे समजणार? आणि त्या भेटीला साजेसे कपडे तरी कुठून आणणार? पण शेवटी कोल्ह्याने त्याचे मन वळवले, आणि तो राजाचे आमंत्रण स्वीकारायला तयार झाला. जमेल तशी सगळी मदत करायचे वचन कोल्ह्याने दिले. मग कोल्हा आणि शेतकरी निघाले. राजवाड्यात पोहोचल्यावर कोल्हा राजाला शोधायला गेला. शेतकरी प्रवेशाच्या दालनात, लोक जिथे जोडे काढून ठेवत तिथे, जमिनीवर उकिडवा बसला आणि वाट पाहू लागला. कोल्हा राजाला म्हणाला, “महाराज, परवा मी ज्या माणसाविषयी बोललो होतो, त्याला घेऊन आलो आहे. तो साध्या कपड्यांत आला आहे. सोबत नोकरचाकर नाहीत, थाटमाट नाही. एवढ्या लोकांची सोय करायला आपल्याला त्रास होईल, असे त्याला वाटले. महाराजांनी याचा राग मानू नये. उलट, हे त्या माणसाच्या शहाणपणाचे लक्षण समजावे.”
हुशार कोल्हा
जोडे आणि आग
“अगदी खरे,” राजा म्हणाला आणि उठला. “मला त्याच्याकडे घेऊन चल.” “ते पाहा तिथे,” कोल्हा म्हणाला. “काय! तो जोड्यांमध्ये उकिडवा बसलेला माणूस?” राजा उद्गारला. “मित्रा, तू अशा जागी का बसला आहेस?” “महाराज, ही जागा छान स्वच्छ आहे,” शेतकरी म्हणाला. “माझ्यासारख्या गरीब माणसाला ही पुरेशी आहे.” “पाहा, किती नम्र आहे हा माणूस,” कोल्हा मध्येच म्हणाला. “आज रात्री तू राजवाड्यातच राहा,” राजा म्हणाला. “मला तुझ्याशी काही गोष्टींविषयी बोलायचे आहे. उद्या तुझी सोय असली, तर मी तुझे घर पाहायला येईन.” त्या संध्याकाळी राजा, शेतकरी आणि कोल्हा यांच्या खूप गप्पा झाल्या. आपण अगदी साधा माणूस आहोत, हे शेतकऱ्याच्या तोंडून पुनःपुन्हा निसटत होते. पण हुशार कोल्ह्याने सगळे इतके छान सांभाळले, की एकूण राजाचा कल या लग्नाकडेच झुकला. पण दुसऱ्या दिवसाचे काय? रात्रभर कोल्हा त्याच गोष्टीचा विचार करत होता. राजा आणि शेतकरी निघताच कोल्ह्याने पुढे जायची परवानगी मागितली. तो जीव खाऊन पळत शेतकऱ्याच्या घरी गेला आणि त्याने घराला आग लावली. मग ते दोघे जवळ येत असताना तो धावत त्यांना सामोरा गेला. “महाराज, आपल्याला विनंती करतो, पुढे येऊ नका!” तो ओरडला. “या माणसाचे घर आणि त्याचे सगळे काही नष्ट झाले आहे. कोणा शत्रूचे हे काम असणार. मी विनवतो, तुम्ही दोघेही परत फिरा.” तेव्हा तो भोळा राजा परत फिरला. पुढे त्याने आपल्या मुलीचे लग्न त्या अडाणी शेतकऱ्याशी लावून दिले. ही गोष्ट श्रीनगरमध्ये १८८० च्या दशकात जे. हिंटन नोल्स यांना काश्मिरी भाषेत सांगितली गेली. त्यांनी ती १८८८ मध्ये काश्मीरच्या लोककथांच्या इंग्रजी पुस्तकात छापली. ती सांगणारे होते क्रुहन परगण्यातल्या काहीपुराचे पंडित वासह कौल.