तेलुगू लोककथा
बहिरा मित्र
उत्तरे आधीच तयार
एका गावात एक व्यापारी राहत होता. त्याचा एक मित्र बहिरा होता. व्यापारी आजारी आहे, असे त्या बहिऱ्याच्या कानावर आले. तो त्याची विचारपूस करायला निघाला. वाटेत दोघांत काय काय बोलणे होईल, याचा त्याने मनाशी हिशेब मांडला. “नमस्कार झाला की मी आधी विचारीन, ‘काय शेठजी, आज कसे वाटते?’” त्याने विचार केला. “तो म्हणेल, ‘बरे आहे.’ मग मी म्हणेन, ‘छान.’ मग मी विचारीन, काय खाता? तो म्हणेल, ‘बिनमिठाचा भात.’ मग मी म्हणेन, ‘त्याचा तुम्हाला खूप गुण येवो.’ मग मी विचारीन, ‘आणि वैद्य कोण आहेत?’ तो कोणत्या ना कोणत्या वैद्याचे नाव सांगेलच. मग मी बिनधास्त म्हणेन, ‘देव त्यांच्या हाताला यश देवो.’” असे ठरवून तो व्यापाऱ्याच्या घरी पोहोचला. नेहमीचे नमस्कार झाले. मग तो आजाऱ्याजवळ बसला. “काय मित्रा, कसे आहात?” त्याने विचारले. “कडक तापाने मला फार हैराण केले आहे,” आजारी माणूस म्हणाला. बहिऱ्याला ते कळले नाही. ठरवलेलेच उत्तर आले, असे त्याला वाटले. “छान,” तो म्हणाला. “देव तुम्हाला असेच ठेवो!” व्यापारी आधीच आजाराने चिडलेला होता. हे ऐकून तो आणखी चिडला. मग बहिऱ्याने विचारले, काय खाता? “माती!” उत्तर आले. “तिचा तुम्हाला खूप गुण येवो!” बहिरा म्हणाला. “आणि सांगा पाहू मित्रा, कोणते वैद्य तुमचा इलाज करतात?” आजारी व्यापाऱ्याचा संताप अनावर झाला. “वैद्य?” तो ओरडला. “साक्षात यम!” “बरे बरे,” बहिरा मित्र म्हणाला. “देव त्यांच्या औषधांना गुण देवो!” आणि तो घरी निघून गेला. जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती.