तेलुगू लोककथा
ब्राह्मणाच्या दोन बायका
मुलगा कोणाचा?
दख्खनमध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्याला दोन बायका होत्या. थोरल्या बायकोला मुलगा झाला. मुलगा सुमारे दहा महिन्यांचा होता, तेव्हा ब्राह्मण कुटुंबाला घेऊन काशीयात्रेला निघाला. पण वाटेतच तो वारला. दोघी बायका जवळच्या एका अग्रहारात गेल्या आणि तिथेच राहिल्या. त्यांनी मुलाला इतक्या मायेने वाढवले, की त्याची खरी आई कोणती, हे त्या मुलाला कळत नसे. पण एके दिवशी धाकटी थोरलीशी भांडली. “आता मी तुझ्याबरोबर राहणार नाही,” असे म्हणून ती मूल घेऊन घरी निघाली. थोरलीने मुलाला धरले. “त्याला कुठे नेतेस?” तिने विचारले. धाकटी म्हणाली, “हे मूल मी जन्माला घातले आहे. म्हणून मी त्याला घेऊन जाते.” पण खरे तर त्याला थोरलीने जन्म दिला होता. असे भांडत भांडतच दोघी न्यायाधीशाकडे गेल्या. त्यांनी त्याला सगळी हकिगत सांगितली. न्यायाधीशाने थोडा विचार केला. मग त्याने सेवकांना बोलावले. “या मुलाचे दोन तुकडे करा आणि दोघींना अर्धा अर्धा द्या,” असा हुकूम त्याने दिला. धाकटी काहीच बोलली नाही. पण थोरली खरी आई होती. मूल जिवंत राहिले, तरी तिला पुरे होते. तिने न्यायाधीशाचा हुकूम मान्य केला नाही. “हे मूल माझे नाही,” ती त्याला म्हणाली. “कृपा करून ते तिलाच द्या.” हे शब्द ऐकून न्यायाधीशाने ठरवले, की थोरली बायकोच मुलाची आई आहे. त्याने मुलगा तिच्या हवाली केला. मुलाचे दोन तुकडे करण्याचा हुकूम कधीच अमलात आला नाही. जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती.