तेलुगू लोककथा
डोळे मिटलेला भिकारी
वाटेवर सोने
कावेरीच्या काठी जयस्थळ नावाचे गाव होते. तिथे दुर्गत नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो फार गरीब होता. रोज तो चार वेगवेगळ्या गावांत भिक्षा मागायला जात असे. दुपारी दोन-तीनच्या सुमारास तो घरी परते, स्वतःचा स्वयंपाक करी आणि जेवे. असे काही दिवस चालले. मग एके दिवशी तो गरीब ब्राह्मण थकून-भागून घरी चालला होता. त्याच वेळी शंकर आणि त्यांच्या पत्नी पार्वती आकाशातून फेरफटका मारत होते. त्या गरीब ब्राह्मणाची दशा पार्वतींना पाहवेना. त्यांना त्याची दया आली. “याला धनसंपत्ती द्या,” अशी त्यांनी पतीकडे विनंती केली. पण शंकरांनी नकार दिला. सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव प्रत्येकाचे भाग्य त्याच्या कपाळावर लिहितात. या माणसाने धन भोगावे, असे ब्रह्मदेवांनी त्याच्या कपाळावर लिहिलेले नव्हते. तेव्हा तो भिकारी म्हणूनच जगणार आणि भिकारी म्हणूनच मरणार, असे शंकर म्हणाले. “आपणच याला श्रीमंत करायचे ठरवले, तर हा ब्राह्मण गरीब कसा राहतो, तेच मी बघते,” पार्वती म्हणाल्या. आणि त्यांनी त्याच्या वाटेवर हजार सोन्याच्या मोहरांचा ढीग टाकला. ब्राह्मण त्या ढिगापासून दहा वारांवर आला. तेवढ्यात अचानक त्याच्या मनात आले, आंधळ्यासारखे चालता येते का, ते बघावे. म्हणून त्याने डोळे मिटले आणि तो सोन्याच्या ढिगाजवळून सरळ पुढे निघून गेला. भाग्यात लिहिलेले कोणालाही टाळता येत नाही. जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती.