तेलुगू लोककथा
घुबडांचे लग्न
पक्ष्यांची भाषा
सुलतान महमूद सतत परदेशांवर स्वाऱ्या करत असे. घरी तो स्वतःच्याच प्रजेवर जुलूम करत असे. त्यामुळे त्याचे सगळे राज्य उजाड झाले होते. सुलतानाने नीट राज्य करावे म्हणून काहीतरी चतुर युक्ती शोधली पाहिजे, असे त्याच्या प्रधानाला वाटले. म्हणून सुलतानाशी बोलताना तो नेहमी स्वतःबद्दल एक गोष्ट सांगत असे. पूर्वी मी एका संन्यासी महाराजांचा शिष्य होतो आणि त्यांच्याकडून पक्ष्यांची भाषा शिकलो, असे तो म्हणे. एके दिवशी सुलतान आणि प्रधान शिकारीहून परत येत होते. वाटेवरच्या एका झाडावर दोन घुबडे बसून घुत्कार करत होती. सुलतानाने ते ऐकले. “हे पक्षी काय बोलत आहेत, ते मला सांग,” तो प्रधानाला म्हणाला. प्रधानाने थोडा वेळ कान देऊन ऐकले, जणू काही त्याला ते खरेच कळत होते. मग तो म्हणाला, “हुजूर, ते बोलणे आपल्या कानी पडण्याजोगे नाही.” पण सुलतानाने हट्टच धरला. तेव्हा प्रधानाने घुबडांचे बोलणे सांगितले. “जहाँपन्हा, एका घुबडाला मुलगा आहे आणि दुसऱ्याला मुलगी. दोघे त्यांचे लग्न ठरवत आहेत. पहिले घुबड म्हणाले, ‘म्हणजे तुम्ही तुमची मुलगी माझ्या मुलाला देणार. पण त्याला पन्नास उजाड गावेही द्याल ना?’ त्यावर दुसरे घुबड म्हणाले, ‘देवाच्या कृपेने आपले सुलतान महमूद इतक्या सुखाने राज्य करत असताना उजाड गावांना काय तोटा? तुम्ही नुसती पन्नास मागता. मी पाचशे देईन.’” हे ऐकून सुलतानाला फार दुःख झाले. राज्यातले प्रत्येक उजाड गाव पुन्हा वसवा, असा हुकूम त्याने ताबडतोब दिला. आणि त्याने प्रजेला सुखी आणि संपन्न केले. जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती.