तेलुगू लोककथा
हंस आणि कावळा
समुद्रावरची शर्यत
समुद्रकिनाऱ्याजवळच्या एका वडाच्या झाडावर एक कावळा बसला होता. तेवढ्यात त्याला तिथून एक हंस उडत जाताना दिसला. कावळ्याने त्याला विचारले, “कुठे निघालास?” हिमालयातल्या पवित्र मानस सरोवराला चाललो आहे, असे हंस म्हणाला. कावळ्यालाही तिथे जायची फार इच्छा झाली. “मलाही बरोबर ने,” अशी त्याने हंसाची विनवणी केली. “कावळ्या,” हंस म्हणाला, “कुठे ते मानस सरोवर आणि कुठे तू! तुझ्यापासून ते सरोवर फार फार दूर आहे.” कावळा भडकला. “काय बोलतोस, ते तुझे तुलाच कळत नाही,” तो म्हणाला. “मी तुझ्यापेक्षा जोरात उडतो. आत्ताच सिद्ध करून दाखवतो. तू निघ, मी तुझ्याबरोबर येतो!” असे म्हणून तो आकाशात उडाला. थोडे अंतर तो हंसाच्या बरोबरीने उडत गेला. मग तो हंसाच्या दहा वार पुढे गेला, परत आला आणि त्याला चिडवू लागला. “कोण जोरात उडतो, यावर तू काहीतरी बोलत होतास. आणि आता तुला माझ्या बरोबरीने उडता येत नाही! स्वतःची ताकद आधी न अजमावताच तू मला कमी लेखलेस.” कावळा आणखी थोडा पुढे उडाला. मग तो थकला. त्याला आता उडवेना. तो मोठ्या संकटात सापडला. हंस हसला. मग त्याने कावळ्याला पंखांवर घेतले. खालच्या समुद्रात त्याला पडू दिले नाही. त्याने कावळ्याला किनाऱ्यावर आणले आणि तिथे सोडले. जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती.