तेलुगू लोककथा
कर्पटक आणि नागकन्या
राजाच्या पाठीवर वेताळ
एक संन्यासी मोठे तप करत होते. राजा विक्रमार्काने, म्हणजे राजा विक्रमादित्याने, त्यांना त्या तपात मदत करायचे वचन दिले होते. वेताळ नेहमी त्या तपात विघ्ने आणत असे. म्हणून संन्याशांनी राजाला सांगितले, “वेताळाचे हातपाय बांधून त्याला माझ्याकडे घेऊन ये. वाटेत त्याच्याशी बोलू नकोस. बोललास, तर तो नक्की पळून जाईल.” विक्रमार्काने वेताळाला बांधले आणि पाठीवर घेतले. तेव्हा वेताळाने सांगितले की तो राजाला एक प्रश्न विचारेल. उत्तर ठाऊक असूनही राजाने ते दिले नाही, तर त्याच्या डोक्याची हजार शकले होतील. वेताळाने एक गोष्ट आधीच सांगितली होती आणि तिच्यावर प्रश्न विचारला होता. विक्रमार्काने त्याचे उत्तर दिले. राजा बोलला, म्हणून वेताळ लगेच नाहीसा झाला. राजाने त्याला परत आणले, आणि वेताळाने नवी गोष्ट सुरू केली. “मल्लिकापूरचा राजा शकटशृंग याचा कर्पटक नावाचा एक सेवक होता. तो सतत राजाच्या सोबत असे. एकदा राजा मोठे सैन्य घेऊन एका जंगलात शिकारीला गेला. तिथून तो कर्पटकाला घेऊन घोड्यावरून खूप दूर एका निर्जन जागी गेला. तो फार थकला होता. म्हणून एका मोठ्या, दाट पानांच्या झाडाच्या सावलीत तो विसावला. कर्पटकाने त्याला दोन आवळे आणून दिले.
कर्पटक आणि नागकन्या
नागलोकात
“नगरात परतल्यावर काही काळाने राजा शकटशृंग कर्पटकाला म्हणाला, ‘सिंहलद्वीपाच्या, म्हणजे श्रीलंकेच्या, राजकन्येवर माझे प्रेम बसले आहे.’ लग्न ठरवायला त्याने कर्पटकाला तिकडे पाठवले. कर्पटक एका व्यापारी जहाजातून निघाला. पण तो सिंहलद्वीपाला पोहोचलाच नाही. जहाज फुटले. त्याच्याशिवाय जहाजावरचे सगळे मरण पावले. तो मोठ्या कष्टाने पोहत राहिला. एक डहाळी त्याच्या हाती लागली. तिने त्याला नागलोकात नेऊन पोहोचवले. नागलोक म्हणजे नागांचे, सर्पजातीच्या लोकांचे जग. तिथे त्याला दुर्गादेवीचे एक मंदिर दिसले. तो त्या मंदिरात विसावला. “देवीची पूजा करायला आणि नाचायला-गायला नागकन्या त्या मंदिरात येत. त्यांच्यापैकी एकीवर कर्पटकाचे प्रेम बसले. त्याने तिच्या दासींना सांगितले, आणि दासींनी त्यांच्या स्वामिनीला. तिचा होकार असावा, असे दिसले. तिने त्याला मंदिराजवळच्या एका तळ्यात स्नान करायला सांगितले. त्याने स्नान केले मात्र, आणि पाहतो तो काय! तो मल्लिकापूरच्या, स्वतःच्याच नगराच्या तळ्यात तरंगत होता. त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. “कर्पटकाने घडलेले सगळे राजा शकटशृंगाला सांगितले. ती नागकन्या पाहावी, असे राजाला वाटले. म्हणून पुन्हा तोच सगळा प्रवास झाला, आणि दुर्गादेवीच्या मंदिरात कर्पटकाने ती राजाला दाखवली.
कर्पटक आणि नागकन्या
उपकार कोणाचा मोठा?
“पण कर्पटकाचे जिच्यावर प्रेम होते, त्या नागकन्येचे प्रेम राजावर बसले. ‘माझ्या मनातली इच्छा पूर्ण कराल, तर मी तुम्हाला सर्वस्व देईन,’ असे ती राजाला म्हणाली. “राजा तिला म्हणाला, ‘कर्पटक माझा मुलगा आहे. तो देखणा आहे, हुशार आहे. काहीही झाले तरी तो दिलेला शब्द पाळतो. त्याच्याशी लग्न कर आणि त्याच्याबरोबर सुखाने राहा.’ ती तयार झाली. “राजाने कर्पटकाचा हात हातात घेतला. ‘तू मला एकदा दोन आवळे दिले होतेस,’ तो म्हणाला. ‘हे लग्न त्यांतल्या एका आवळ्याच्या बरोबरीचे आहे. दुसऱ्या आवळ्यासाठी मला अजून तुझी काहीतरी सेवा करायची आहे.’ मग राजाने त्या तळ्यात स्नान केले आणि तो सुखरूप स्वतःच्या राजधानीत पोहोचला. आणि कर्पटक नागकन्येबरोबर सुखाने राहू लागला.” इथे वेताळाने गोष्ट संपवली आणि विचारले, “आता सांग, सेवक आणि राजा या दोघांपैकी जास्त मोठा उपकार कोणी केला?” विक्रमार्क म्हणाला, “कोणताही सेवक धन्याचे भले करेल, अशी अपेक्षाच असते. पण या धन्याने सेवकाच्या सेवेची इतकी कदर केली, की त्याने त्या उपकाराची फेड केली. म्हणून त्याचाच उपकार मोठा मानला पाहिजे.” हे ऐकून वेताळ पुन्हा एकदा नाहीसा झाला. जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती. हे कोडे राजा विक्रमार्क आणि वेताळ यांच्या एका तेलुगू कथेतले आहे. पंतुलूंनी त्या कथेला ‘राजा आणि राक्षस’ असे नाव दिले आहे.