तेलुगू लोककथा
खिडकीतून दोन डोकी
मालक की नोकर?
फार पूर्वी दिल्लीत एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्या एका नोकराने घरातल्या काही वस्तू चोरल्या. दुसऱ्या दिवशी तो पळून गेला. व्यापाऱ्याने चोराला सगळीकडे शोधले. पण तो काही सापडला नाही. थोड्याच दिवसांनी व्यापारी कामानिमित्त दुसऱ्या एका नगराला गेला. तिथे रस्त्यात त्याला तोच नोकर दिसला. याच नोकराने त्याचे घर लुटले होते. व्यापाऱ्याने त्याला धरले. “तू माझा माल चोरलास आणि पळून गेलास,” असा आरोप त्याने केला. पण नोकराने उलट व्यापाऱ्याचेच धोतर धरले आणि तो मोठ्याने स्वतःचा माल परत मागू लागला. “हा माझा नोकर आहे,” तो ओरडला. “याने माझ्या घरातून माल चोरला. कितीतरी दिवस मी याला शोधतो आहे. आज हा सापडला. याने माझा माल परत द्यावा, मग खुशाल जावे.” असे भांडत भांडतच खरा व्यापारी आणि खोटा व्यापारी न्यायाधीशाकडे गेले. दोघांनी आपापली फिर्याद सांगितली. न्यायाधीशाने थोडा विचार केला. मग त्याने दोघांनाही एका खिडकीतून डोके पलीकडे घालायला सांगितले. त्याने जल्लादाला बोलावले आणि सांगितले, “यांच्यापैकी जो नोकर असेल, त्याचे डोके उडव.” चोर खरोखरच नोकर होता. डोके उडवणार, हे ऐकताच त्याने ते मागे ओढले. व्यापाऱ्याने मात्र डोके खिडकीतच ठेवले. त्यावरून न्यायाधीशाने ओळखले, की डोके मागे घेणारा माणूसच घर लुटणारा नोकर आहे. कोणाचेच डोके उडवले नाही. न्यायाधीशाने नोकराला कडक शिक्षा दिली. जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती.