तेलुगू लोककथा
म्हातारी आणि तिचा कोंबडा
दिवस कोणामुळे उजाडतो?
कांजीवरम म्हणजे आजचे कांचीपुरम. त्याच्याजवळ पेन्नगराई नावाचे एक गाव होते. तिथे एक म्हातारी राहत होती. तिच्याकडे एक कोंबडा होता आणि एक विस्तवाचे भांडे होते. त्यात धगधगते निखारे असत. रोज पहाटे तांबडे फुटले की कोंबडा आरवत असे. मग गावातले सगळे लोक उठत. स्वयंपाकासाठी विस्तव न्यायला ते तिच्या घरी येत. आणि मग आपापल्या कामाला लागत. बरेच दिवस असे चालले. शेवटी म्हातारीच्या डोक्यात एक कल्पना शिरली. माझा कोंबडा आरवतो, म्हणून दिवस उजाडतो, असे तिला वाटू लागले. तिने हेही पाहिले की गावातले सगळे लोक तिच्या घरून विस्तव नेल्यावरच स्वयंपाक करून जेवतात. मी गाव सोडून गेले, तर दिवस कसा उजाडतो आणि गावकरी कसे जेवतात, ते पाहावे, असे तिला वाटले. म्हणून कोणालाही न सांगता ती कोंबडा आणि विस्तवाचे भांडे घेऊन दूरच्या एका रानात गेली. तिथे ती बसून राहिली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी नेहमीप्रमाणे उठले आणि तिच्या घरी आले. ती घरी नव्हती. ती कुठेतरी कामासाठी गेली असेल, असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी दुसरीकडून विस्तव आणला आणि प्रत्येकजण आपल्या कामाला लागला. इकडे म्हातारी दिवसभर उपाशी रानात बसून होती. संध्याकाळी एक गावकरी तिथून दुसरीकडे कुठेतरी चालला होता. तिने त्याला हाक मारली. “आज सकाळी मी गावात नव्हते,” ती म्हणाली. “तिथे दिवस उजाडला का? लोकांना विस्तव मिळाला का? सगळे जेवले का?” तो हसला. “तुझ्या कोंबड्यावर आणि तुझ्या भांड्यावर सगळे जग चालते, असे वाटते की काय तुला?” तो म्हणाला. “इथे उपाशी का बसली आहेस? ऊठ आणि घरी जा.” हे ऐकून तिला लाज वाटली. सगळ्या जगाला आपली गरज आहे, असा वेडा गर्व तिच्या मनात होता. तो तिने सोडून दिला. त्यानंतर ती सुखाने राहिली. जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती.