तेलुगू लोककथा
मुलगा आणि चोर
विहिरीत पडलेला हार
एक मुलगा विहिरीच्या काठावर बसून मोठमोठ्याने रडत होता. तेवढ्यात तिथून एक चोर चालला होता. त्याने मुलाला पाहिले आणि विचारले, “का रे, का रडतोस?” मुलगा म्हणाला, “मी खेळत होतो. खेळता खेळता विहिरीत डोकावलो. तेवढ्यात माझ्या गळ्यातला मोत्यांचा हार निसटला आणि पाण्यात पडला. हार न घेता घरी गेलो, तर आई-बाबा मला मारतील. म्हणून रडतो आहे.” तो हार आपल्याला लांबवता येईल, असे चोराला वाटले. “बाळ, घाबरू नकोस,” तो म्हणाला. “मी विहिरीत उतरतो आणि तुझा मोत्यांचा हार काढून आणतो. तोपर्यंत तू माझे कपडे सांभाळ.” त्याने स्वतःचे कपडे काठावर ठेवले आणि तो कपड्यांशिवायच विहिरीत उतरला. तो तळाशी पोहोचताच मुलाने ते कपडे उचलले आणि तो पळून गेला. चोराने बराच वेळ शोधले. त्याला हार काही सापडला नाही. तो पुन्हा वर चढून आला. पाहतो तो मुलाचा कुठे पत्ताच नव्हता. “मी स्वतः भामटा,” तो ओरडला, “आणि मलासुद्धा एका पोराने फसवले!” जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती.