तेलुगू लोककथा
परटाचे गाढव
गाढवाचा पहारा
काशीला एक परीट राहत होता. त्याच्याकडे एक गाढव आणि एक कुत्रा होते. एका रात्री काही चोरांनी त्याच्या घराच्या भिंतीला भोक पाडले. परीट झोपी जाण्याची ते वाट पाहत होते. मग आत घुसून त्याचे सगळे काही लुटायचे, असा त्यांचा बेत होता. कुत्रा त्या वेळी बाहेर गेला होता. पण गाढवाने चोरांना धन्याच्या घरात शिरताना पाहिले. ते बघता बघता घरातल्या सगळ्या किमती चीजवस्तू लंपास करतील, हे त्याला दिसले. कुत्रा इथे असता, तर त्याने मोठ्याने भुंकून धन्याला जागे केले असते आणि चोरी टळली असती. पण कुत्रा कधी परत येईल, कोणास ठाऊक? धन्याच्या कामात कोणीही हयगय करू नये, संकटाच्या वेळी तर मुळीच नाही. म्हणून धन्याला जागे करायला ओरडायचे, असे गाढवाने ठरवले. आणि ते गळा फाडून ओरडू लागले. गाढवाचे ओरडणे परटाने ऐकले. गाढवाने मला उगाचच उठवले, असे त्याला वाटले. त्याला राग आला. त्याने काठी घेतली आणि गाढवाला चांगले बडवले. मग तो पुन्हा आडवा झाला. तो गाढ झोपला होता, तेव्हा चोर आत घुसले आणि घर लुटू लागले. तेवढ्यात कुत्रा परत आला. गाढवाने त्याला घडलेले सगळे सांगितले. ओरडल्याबद्दल त्याला कसा मार बसला, तेही सांगितले. निदान तू तरी भुंकून धन्याला कळव, असे ते कुत्र्याला म्हणाले. मग कुत्रा मोठमोठ्याने भुंकू लागला. परटाने ते ऐकले. चोर घरात घुसत आहेत, असे त्याला वाटले. तो ताबडतोब उठला आणि त्याने घराचा कानाकोपरा शोधला. चोरांनी सगळे काही नेले होते, हे त्याला दिसले. त्याला फार दुःख झाले. भुंकणे हे कुत्र्याचे काम होते, गाढवाचे नव्हे. जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती.