तेलुगू लोककथा
परीट प्रधान
एकच मागणे
कलिंगाच्या राजाकडे एक परीट होता. तो राजाचे कपडे फार छान धूत असे आणि रोज आणून देत असे. एके दिवशी कपडे अगदी स्वच्छ, एकही डाग नसलेले पाहून राजा फार खूश झाला. तू मागशील ती एक गोष्ट देईन, असे वचन त्याने परटाला दिले. परटाने राजाकडे पाहिले. महाराजांचा प्रधान व्हावे, हीच माझी सगळ्यात मोठी इच्छा आहे, असे तो म्हणाला. ते पद मला द्या, अशी त्याने विनंती केली. राजाने त्याला ते पद दिले. आणि खूप वर्षे सेवा केलेल्या जुन्या प्रधानाला काढून टाकले. काही दिवसांनी हा परीट प्रधान किती दुबळा आहे, हे दुसऱ्या एका राजाच्या कानावर गेले. त्याने प्रचंड सैन्य जमवले आणि युद्ध पुकारले. ही बातमी कळताच कलिंगाच्या राजाने नव्या प्रधानाला फौज जमवायला सांगितले. सगळी आवश्यक तयारी मी आधीच केली आहे, शत्रूला भिण्याचे काही कारण नाही, असे प्रधानाने उत्तर दिले. राजाने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला. काही दिवसांतच शत्रूच्या सैन्याने नगराला वेढा घातला. राजाची घोर निराशा झाली. त्याने ताबडतोब प्रधानाला बोलावले. काय घडले ते सांगितले आणि विचारले, “तू काय काय व्यवस्था केली आहेस?” “भिण्यासारखे काही नाही, महाराज,” प्रधान म्हणाला. “पण राज्य चालवणे फार कष्टाचे काम आहे, असे मला दिसून आले. या संकटातून कसे सुटायचे, याचा मी विचार करतच होतो. तेवढ्यात शत्रू आत घुसला आणि त्याने नगराला कोंडून टाकले. तर आता राज्य चालवायचे कष्ट त्यालाच करू द्या. माझे म्हणाल, तर मी इथल्या शंभरेक घरांचे कपडे धूत असे. प्रधान झाल्यावर ते काम सोडावे लागले. आता मी पुन्हा तेच धरतो. त्यातली निम्मी धुलाई आपल्याला देतो आणि निम्मी मी ठेवतो. मला त्याचे काही जड नाही. म्हणून तर मी युद्धाची काही तयारी केली नाही.” राजाला फार दुःख झाले. पण मूर्खावर विश्वास ठेवल्याचे हेच फळ आहे, हे त्याला कळून चुकले. जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती.