तेलुगू लोककथा
पिसाळलेले कुत्रे
वाटेत चार आवाज
ताम्रपर्णी नदीच्या काठी श्रीरामपूर नावाचे गाव होते. तिथे वसंतयाजी नावाचा एक ब्राह्मण राहत होता. एक यज्ञ करायचा, असे त्याने ठरवले. त्या यज्ञासाठी त्याला चार-पाच उत्तम बकरे हवे होते. म्हणून तो जवळच्या एका गावाला गेला आणि त्याने बकरे विकत घेतले. त्यांच्या गळ्यात दोरी बांधून तो त्यांना घेऊन घरी निघाला. वाटेत चार भामट्यांनी ते बकरे स्वतःसाठी लाटायचे ठरवले. पहिला भामटा येऊन ब्राह्मणासमोर उभा राहिला. “एवढे पिसाळलेले कुत्रे कशाला घेऊन चाललात?” त्याने विचारले. बकरे आणि पिसाळलेले कुत्रे यांतला फरकही न कळणारा हा कोणी मूर्ख आहे, असेच ब्राह्मणाला वाटले. तो थोडा पुढे गेला. मग दुसऱ्या भामट्याने त्याला तोच प्रश्न विचारला. “हे पिसाळलेले कुत्रे तुम्हाला चावणार नाहीत, याची काळजी घ्या,” असेही तो म्हणाला. हे ऐकून ब्राह्मणाच्या मनात थोडीशी शंका आली. तो आणखी थोडा पुढे गेला. तिसरा भामटा थेट बकऱ्यांजवळ आला आणि फार संतापला. वाटसरूंवर एवढे पिसाळलेले कुत्रे मोकाट सोडल्याबद्दल त्याने ब्राह्मणाला खूप बोल लावले. ते ऐकून, हे पिसाळलेले कुत्रेच असणार, अशी ब्राह्मणाची खात्री झाली. त्याने त्यांना सोडून द्यायचा प्रयत्न केला. तेवढ्यात शेवटचा भामटा आला. “यांना जवळच्या झाडाला बांधून ठेवा,” तो ब्राह्मणाला म्हणाला. “मोकळे सोडले, तर हे लोकांवर तुटून पडतील आणि त्यांना चावतील.” तेव्हा ब्राह्मणाने बकरे एका झाडाला बांधले आणि तो पळून गेला. भामट्यांनी बकरे सोडले आणि ते घरी घेऊन गेले. पुष्कळ लोक एकच मूर्खपणाची गोष्ट सांगू लागले, तर शहाणा माणूसही फसू शकतो. जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती. या संकेतस्थळावरील पंचतंत्रात याच गोष्टीचे दुसरे रूप आहे: “तीन धूर्त आणि ब्राह्मणाचा बोकड”.