तेलुगू लोककथा
राजा आणि पहिलवान
डोक्यावर डोंगर
मलबारवर राजा नंदन राज्य करत होता. एके दिवशी एक पहिलवान त्याच्याकडे आला. “मी मेहनतीने तलवारबाजी आणि अशा इतर कला शिकलो आहे,” तो म्हणाला. “मी जंगली जनावरांशी लढू शकतो. एवढेच काय, एक प्रचंड डोंगर डोक्यावर घेऊन मी चालू शकतो. पण माझ्या या शक्तीचे योग्य मोल आपल्याशिवाय कोणी देऊ शकणार नाही. म्हणून नीट पोट भरावे, या हेतूने मी आपल्याकडे आलो आहे.” असा लढवय्या कामी येईल, असे राजाला वाटले. त्याने त्याला महिना शंभर होनांवर चाकरीला ठेवले. होन म्हणजे सोन्याचे नाणे. नगराजवळ एक प्रचंड डोंगर होता. त्यावर जंगली जनावरे भरलेली होती. ती लोकांचे फार नुकसान करत. म्हणून राजाने पहिलवानाला बोलावले. “डोंगर खांद्यावर घेऊन जाऊ शकतो, असे तू म्हणाला होतास,” तो म्हणाला. “इथे जवळच एक डोंगर आहे. त्याच्यामुळे लोकांना फार त्रास होतो. तो उचलून कुठेतरी दूर नेऊन ठेव आणि परत ये.” पहिलवानाने हुकूम पाळायचे कबूल केले. दुसऱ्या दिवशी पहाटे राजा त्याला डोंगराच्या पायथ्याशी घेऊन गेला. सोबत त्याचे प्रधान, पुरोहित आणि शिपायांची एक तुकडी होती. पहिलवानाने कंबर कसली, फेटा बांधला आणि तो तयार उभा राहिला. ते पाहून राजाने विचारले, “वाट कसली बघतोस? डोंगर डोक्यावर घे आणि चालू लाग.” “महाराज,” पहिलवान म्हणाला, “डोंगर डोक्यावर घेऊन मी चालू शकतो, असे मी म्हणालो होतो. तो उचलू शकतो, असे मी कधीच म्हणालो नाही. तेव्हा कृपा करून आपल्या शिपायांना हुकूम द्या. त्यांनी डोंगर उपटून माझ्या डोक्यावर ठेवावा. मग आपण सांगाल तिथे मी तो घेऊन जाईन.” जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती.