तेलुगू लोककथा
शब्द पाळणारा ब्राह्मण
परत यायला तीन दिवस
धारापूर गावात एक ब्राह्मण राहत होता. एके दिवशी तो फळे आणि फुले गोळा करायला रानात गेला. तेवढ्यात तिथे एक वाघ आला. ब्राह्मण घाबरला आणि पळू लागला. पण वाघाने पाठलाग करून त्याला पकडले. वाघाच्या तावडीत सापडल्यावर ब्राह्मणाने त्याची विनवणी केली, “मला तीन दिवसांचे जीवदान दे.” त्याला घरी जाऊन घरची सगळी व्यवस्था लावायची होती आणि घरच्यांचा निरोप घ्यायचा होता. “तू परत आला नाहीस तर?” असे वाघाने विचारले. “त्याची काळजी करू नकोस,” ब्राह्मण म्हणाला. “मी परत यायची शपथ घेतो.” वाघ तयार झाला. ब्राह्मण दुःखी मनाने घरी गेला. तीन दिवस त्याने सगळी व्यवस्था लावली आणि घरच्यांचा निरोप घेतला. वाघाला जिथे भेटायचे कबूल केले होते, त्याच जागी तो ठरलेल्या वेळी परत आला. ब्राह्मणाचा हा खरेपणा पाहून वाघ इतका खूश झाला, की त्याने त्याला काहीही इजा न करता सोडून दिले. दिलेला शब्द पाळणाऱ्या माणसाला नेहमीच मान मिळतो. जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती.