तेलुगू लोककथा
वाघ आणि कावळा
वाघाच्या जबड्यात हाड
एका रानात एक वाघ राहत होता. त्या रानातल्या इतर सगळ्या जनावरांना तो मारून खात असे. एके दिवशी त्याने एक रानरेडा पकडला. तो खात असताना रेड्याचे एक हाड त्याच्या जबड्यात अडकले. वाघाला ते हाड काही काढता येईना. त्याला फार वेदना होऊ लागल्या. वेदनेने तो एका झाडाखाली आडवा झाला. त्याने तोंड वासले आणि तो विव्हळू लागला, “हे हाड कसे काढू? आता मी कसा जगू? काय करू?” त्या संकटात त्याला झाडावर एक कावळा दिसला. “कावळ्या,” वाघ म्हणाला, “मी किती तडफडतो आहे, ते बघतोस ना? एवढे हाड काढ आणि माझा जीव वाचव. मग रोज मी जी शिकार करीन, तिच्यातले तुला हवे तेवढे मांस देईन.” वाघाची विनवणी ऐकून कावळ्याचे मन द्रवले. त्याला वाघाची दया आली. तो वाघाच्या तोंडात शिरला आणि त्याने ते हाड काढले. मग वाघाने कबूल केलेले मांस त्याने मागितले. “तू माझ्या तोंडात होतास,” वाघ म्हणाला, “तेव्हा मी तुला जबड्यात चिरडले नाही. तुला सुखरूप बाहेर येऊ दिले. आणि आता, कृतघ्ना, तू माझ्याकडे मांस मागतोस? चालता हो इथून!” चांगले दिवस आले की संकटात मदत करणाऱ्या मित्रांना माणसे बहुधा विसरतात. जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती.