तेलुगू लोककथा
वाघाचे सल्लागार
कोकरे पुढे सरसावली
गन्नवर गावात दिवशर्मा नावाचा एक अतिशय गरीब ब्राह्मण राहत होता. भिक्षा मागून तो पोट भरत असे. एके दिवशी तो यज्ञासाठी समिधा गोळा करायला सहज जवळच्या रानात गेला. तिथे एका डेरेदार वडाच्या झाडाखाली त्याला एक प्रचंड वाघ दिसला. तो भीतीने थरथर कापू लागला. आता घरी सुखरूप कसे पोहोचावे, याचा तो विचार करू लागला. त्या वेळी वाघाजवळ काही कोकरे होती. त्यांनी त्या थरथरणाऱ्या ब्राह्मणाला पाहिले. इथे येताना याला धोक्याची कल्पना नव्हती, हे त्यांनी ओळखले. म्हणून त्याला वाचवायचा काहीतरी मार्ग शोधावा, असे त्यांना वाटले. कोकरे वाघाकडे गेली आणि म्हणाली, “हे व्याघ्रराज, आपल्या दयेला अंतच नाही. आपली कीर्ती दाही दिशांना पसरली आहे. एक ब्राह्मण आपल्या दर्शनाची आस धरून फार वेळ इथे थांबला आहे.” वाघाला फार आनंद झाला. “त्या ब्राह्मणाला माझ्यापुढे घेऊन या,” असे त्याने कोकरांना सांगितले. मग कोकरे ब्राह्मणाकडे गेली. “घाबरू नका,” असे त्याला सांगून त्यांनी त्याला वाघाकडे नेले. वाघ ब्राह्मणावर फार खूश झाला. पूर्वी त्याने ज्यांना मारले होते, त्यांचे काही दागिने त्याने ब्राह्मणाला दिले. ब्राह्मणाला खूप आनंद झाला. ते दागिने घेऊन तो घरी गेला. त्यांतले काही त्याने विकले आणि त्या पैशावर तो सुखाने राहू लागला.
वाघाचे सल्लागार
कोल्हे आणि कुत्रे
काही दिवसांनी शेजारी राहणाऱ्या एका ब्राह्मणाला त्याच्या या भाग्याचा हेवा वाटू लागला. रानात गेलो तर माझेही भाग्य उजळेल, असे त्याला वाटले. तो तिथे पोहोचला, तेव्हा वाघाभोवती कोल्हे आणि कुत्रे जमलेले होते. आपल्यालाही शिकारीतला वाटा मिळेल, असे त्या जनावरांना वाटले. म्हणून ब्राह्मण आल्याचे त्यांनी वाघाला सांगितले आणि वाघाकडून त्या ब्राह्मणाला मारवले. राजाभोवती दुष्ट सल्लागार उभे असताना जो राजाकडे जातो, त्याच्यावर हमखास संकट ओढवते. जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती.