तेलुगू लोककथा
वाळूगाठोड्या आणि शेणगाठोड्या
धर्मशाळेत दोन गाठोडी
याचवर आणि माचवर ही दोन शेजारची गावे. एके दिवशी या दोन गावांतून दोन माणसे निघाली. दोघांनाही दुसऱ्या कुठल्यातरी गावाला जायचे होते. दोघांनीही कपड्याच्या टोकाला एकेक गाठोडे बांधले होते. स्वतःच्या गाठोड्यात काय आहे, हे प्रत्येकाला चांगले ठाऊक होते. पहिल्याचे नाव होते इसुकतक्किडिगाडु, म्हणजे “वाळूच्या गाठोड्याचा भामटा”. तेलुगूत इसुक म्हणजे वाळू. त्याच्या गाठोड्यात वाळू होती. दुसऱ्याचे नाव होते पेडतक्किडिगाडु, म्हणजे “शेणाच्या गाठोड्याचा भामटा”. पेड म्हणजे शेण. त्याच्या गाठोड्यात शेण होते. संध्याकाळी योगायोगाने दोघांची भेट झाली. ते एकाच गावाला गेले आणि एका धर्मशाळेच्या ओट्यावर बसले. वाळूगाठोड्याने दुसऱ्याचे गाठोडे पाहिले. ती शिदोरी असावी, असे त्याला वाटले. ती स्वतःसाठी मिळवायची, असे त्याने ठरवले. म्हणून त्याने विचारले, “तुमच्या गाठोड्यात काय आहे?” शेणगाठोड्यालाही दुसऱ्याच्या गाठोड्याबद्दल अगदी असेच वाटत होते. “शिदोरी,” त्याने थाप मारली. “आणि तुमच्याकडे काय आहे?” “तांदूळ,” वाळूगाठोड्यानेही थाप मारली. “पण तुमच्यासारखी शिदोरी मी आणली नाही, याचे वाईट वाटते. मला खूप भूक लागली आहे. पण करणार काय?” त्याचा केविलवाणा सूर शेणगाठोड्याने ऐकला. “वाईट वाटून घेऊ नका,” तो म्हणाला. “आपण गाठोडी बदलू या. मला आत्ता भूक नाही.” दोघे तयार झाले आणि त्यांनी गाठोडी बदलली. मग एकमेकांच्या भीतीने दोघे वेगवेगळ्या दिशांना खूप दूर गेले. तिथे प्रत्येकाने हाती आलेले गाठोडे सोडले. वाळूगाठोड्याला सापडले शेण, आणि शेणगाठोड्याला वाळू! दोघेही अगदी थक्क झाले. दुसऱ्यांना फसवायला निघाल, तर दुसरेही तुम्हाला फसवू शकतील. जी. आर. सुब्रह्मण्य पंतुलू यांनी १९०५ मध्ये मद्रासहून तेलुगू लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. ही गोष्ट त्या पुस्तकावरून पुन्हा सांगितली आहे. ती आधी १८९७ मध्ये एका इंग्रजी नियतकालिकात छापली होती.