सिंहासन बत्तिशी
अकरावी पुतळी — राक्षसाची शिळा
अकरावी पुतळी बोलली
आणखी एका शुभ मुहूर्तावर भोज राजा सिंहासनाकडे गेला. या वेळी अकरावी पुतळी बोलली. तिचे नाव विद्याधरी. “हे राजा,” ती म्हणाली, “ज्याच्यात विक्रमादित्याचे औदार्य आहे, त्यानेच या सिंहासनावर बसावे.” “हे पुतळी,” भोज म्हणाला, “त्याच्या औदार्याची एखादी गोष्ट मला सांग.” “हे राजा, ऐका,” पुतळी म्हणाली. आणि तिने ही गोष्ट सांगितली. विक्रमादित्य राज्य करत होता, तेव्हा जगात कुठेही दुष्ट माणूस नव्हता. चहाडखोर नव्हता, चोर नव्हता, पापी नव्हता. त्याने सगळ्या शत्रू राजांना पायाशी आणले होते. त्याची आज्ञा कोणी मोडत नसे.
अकरावी पुतळी — राक्षसाची शिळा
राजा भ्रमंतीला निघाला
पुष्कळ राजांना बलवान शत्रूंच्या काळजीने दिवसा चैन पडत नाही, आणि रात्री झोप येत नाही. विक्रमादित्याला अशी कसलीच काळजी नव्हती. एके दिवशी त्याने राज्याचा कारभार मंत्र्यांवर सोपवला. संन्याशाचा वेश घेतला, आणि तो दूरदूरच्या देशांत निघाला. जिथे आवडेल तिथे, हवे तितके दिवस तो राहत असे. कुठे काही नवल दिसले, की तिथे थोडा वेळ थांबत असे. एका संध्याकाळी तो जंगलाच्या मधोमध असताना सूर्य मावळला. रात्र काढण्यासाठी राजा एका झाडाच्या बुंध्याशी बसला.
अकरावी पुतळी — राक्षसाची शिळा
म्हातारा पक्षी
त्या झाडाच्या शेंड्यावर एक खूप म्हातारा पक्षी राहत होता. तो पक्ष्यांचा राजा होता. रोज सकाळी त्याची मुले आणि नातवंडे वेगवेगळ्या देशांत उडून जात. पोटभर खाऊन ती संध्याकाळी घरी परत येत. येताना प्रत्येक जण म्हाताऱ्या पक्ष्यासाठी एक फळ आणत असे. त्या रात्री म्हातारा पक्षी निवांत बसून त्यांच्याशी बोलू लागला. खाली बसलेल्या राजाला त्यांचा शब्द न् शब्द ऐकू आला. “मुलांनो,” म्हातारा पक्षी म्हणाला, “फिरताना तुम्ही काय काय नवल पाहिले?” एक तरुण पक्षी म्हणाला, “मी काही नवल पाहिले नाही. पण आज माझे मन फार दुःखी आहे.”
अकरावी पुतळी — राक्षसाची शिळा
दुःख सांगितले
“मग तुझ्या दुःखाचे कारण आम्हाला सांग,” म्हातारा पक्षी म्हणाला. “सांगून काय उपयोग?” तरुण पक्षी म्हणाला. “बाळा,” म्हातारा पक्षी म्हणाला, “दुःखी माणसाने आपले दुःख खऱ्या मित्राला सांगितले, की तो त्या दुःखातून मोकळा होतो.” मग तरुण पक्ष्याने आपले दुःख सांगितले. “बाबा, ऐका. उत्तरेला एक डोंगर आहे. त्याच्याजवळ एक नगर आहे. त्या डोंगरावर माणसे खाणारा एक राक्षस राहतो. “तो रोज खाली नगरात येत असे. जो माणूस भेटेल, त्याला धरून डोंगरावर नेत असे, आणि खाऊन टाकत असे.
अकरावी पुतळी — राक्षसाची शिळा
रोज एक माणूस
“शेवटी नगरातले लोक राक्षसाला म्हणाले, ‘वाटेत भेटेल त्या माणसाला खाऊ नकोस. आम्हीच तुला रोज एक माणूस खायला देऊ.’ राक्षसाने ते मान्य केले. “तेव्हापासून प्रत्येक घर आपल्या पाळीने एक माणूस देते, रोज एक. असाच पुष्कळ काळ गेला आहे. “आज एका ब्राह्मणाची पाळी आहे. तो मागच्या जन्मी माझा मित्र होता. त्याला एकुलता एक मुलगा आहे. मुलाला दिले, तर त्याचा वंश पुढे चालवायला कोणी उरणार नाही. स्वतः गेला, तर बायको विधवा होईल. आणि विधवेचे जिणे फार कठीण असते. “ती माणसे दुःखात आहेत, म्हणून मीही दुःखी आहे.”
अकरावी पुतळी — राक्षसाची शिळा
ती शिळा
“हाच खरा मित्र,” बाकीचे पक्षी म्हणाले. “मित्राच्या दुःखाने हा दुःखी होतो.” राजाने हे सगळे ऐकले. दुसऱ्यांसाठी आपला देह द्यायला तयार होऊन तो त्या नगरात गेला. तिथे त्याला ती शिळा दिसली. राक्षसाचा बळी रोज तिथे ठेवला जाई. जवळच एक सुंदर तळे होते. राजाने तळ्यात स्नान केले, आणि मग तो त्या शिळेवर जाऊन बसला. मग राक्षस आला. राजा तिथे हसतमुखाने बसलेला पाहून तो थक्क झाला. “हे वीरा, तू कुठून आलास?” राक्षस म्हणाला. “या शिळेवर रोज बसणारी माणसे मी पोचायच्या आधीच भीतीने मेलेली असतात. पण तू तर हसतो आहेस.
अकरावी पुतळी — राक्षसाची शिळा
तू कोण?
“मरण जवळ आले, की माणसाचे शरीर गळून जाते, रोगट होते. पण तू तर तेजाने झळकतो आहेस. सांग, तू आहेस तरी कोण?” “राक्षसा, त्याच्याशी तुला काय करायचे?” राजा म्हणाला. “दुसऱ्यांसाठी मी हा देह सोडतो आहे. तुला हवे ते कर.” राक्षसाने विचार केला, “हा कोणी थोर माणूस दिसतो. हा स्वतःचे सुख सोडतो, आणि दुसऱ्यांच्या दुःखाने दुःखी होतो.” “हे वीरा,” तो म्हणाला, “तुझे जीवन खरोखरच धन्य आहे. तू दुसऱ्यांसाठी आपला देह देतो आहेस. आपले पोट भरण्यासाठी तर जनावरेही जगतात. जो दुसऱ्यांसाठी जगतो, त्याचेच जीवन खरे धन्य.”
अकरावी पुतळी — राक्षसाची शिळा
राजाची इच्छा
“हे वीरा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे,” राक्षस म्हणाला. “काहीतरी माग.” “राक्षसा,” राजा म्हणाला, “तू माझ्यावर प्रसन्न असशील, तर आजपासून माणसे खाणे सोडून दे. तुला तुझा जीव प्रिय आहे. तसाच प्रत्येक प्राण्याला आपला जीव प्रिय असतो. म्हणून आपल्या जीवाचे रक्षण करतोस, तसेच दुसऱ्यांच्या जीवाचेही रक्षण कर.” त्या दिवसापासून राक्षसाने प्राण्यांना मारणे सोडून दिले. आणि विक्रमादित्य राजा आपल्या नगरात परत गेला. इथे पुतळीने आपली गोष्ट संपवली. “हे राजा,” ती भोजाला म्हणाली, “असे औदार्य, दुसऱ्यांविषयी अशी दया आणि असे इतर गुण आपल्यात असतील, तर या सिंहासनावर बसा.” आणि भोज राजा काहीच बोलला नाही. फ्रँकलिन एजर्टन यांनी १९२६ मध्ये सिंहासन बत्तिशीच्या दक्षिणी पाठाचे इंग्रजी भाषांतर केले. त्यातल्या अकराव्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे. म्हाताऱ्या पक्ष्याचे, डोंगराचे आणि राक्षसाचे नाव इथे गाळले आहे. मैत्री, दया आणि जीवाची ओढ यांवरची पक्ष्यांची, राक्षसाची आणि राजाची सुभाषिते एक-दोन वाक्यांत दिली आहेत.