सिंहासन बत्तिशी
अठ्ठाविसावी पुतळी — रक्ताची भुकेली देवी
अठ्ठाविसावी पुतळी बोलली
भोज राजा पुन्हा सिंहासनापाशी गेला, आणि वर चढू लागला. आता अठ्ठाविसाव्या पुतळीने त्याला थांबवले. तिचे नाव मदनमोहिनी. “हे राजा,” ती म्हणाली, “ज्याच्यात विक्रमादित्यासारखे औदार्य आणि इतर गुण आहेत, तोच या सिंहासनावर बसायला योग्य आहे. दुसरा कोणी नाही.” “हे पुतळी,” भोज म्हणाला, “त्याच्या औदार्याची आणि त्याच्या इतर गुणांची एखादी गोष्ट मला सांग.” “ऐका महाराज,” पुतळी म्हणाली. एकदा विक्रमादित्य राजा जग पाहायला निघाला. फिरता फिरता तो एका नगरात आला. नगराजवळून स्वच्छ पाण्याची एक नदी वाहत होती. तिच्या काठावर फुलांची आणि फळझाडांची एक बाग होती. बागेच्या मधोमध एक सुंदर देऊळ होते.
अठ्ठाविसावी पुतळी — रक्ताची भुकेली देवी
चार परदेशी
राजाने नदीत स्नान केले. मग तिथल्या देवाला नमस्कार करून तो देवळात बसला. तेवढ्यात चार परदेशी माणसे आत आली, आणि त्याच्याजवळ बसली. “मंडळी,” राजाने विचारले, “तुम्ही कुठून आलात? आणि तिकडे तुम्ही कोणती नवलाची गोष्ट पाहिली?” “महाराज, आम्ही पूर्वेकडून आलो आहोत,” त्यांच्यातला एक म्हणाला. “तिथे आम्ही फार विचित्र गोष्ट पाहिली. खरे तर आम्ही जीव कसाबसा वाचवून आलो.” “ते कसे?” राजाने विचारले.
अठ्ठाविसावी पुतळी — रक्ताची भुकेली देवी
दर वर्षीचा बळी
“त्या देशात एक नगर आहे,” तो परदेशी म्हणाला. “तिथे एक देवी राहते. तिच्या नावाचा अर्थ ‘रक्ताची आवड असलेली’. “तिथले लोक आणि त्यांचा राजा दर वर्षी एका माणसाला मारतात. देवीने आपल्या इच्छा पुऱ्या कराव्यात, म्हणून त्याचा तिला बळी देतात. त्या दिवशी कोणी परदेशी नगरात आला, तर त्यालाही मारतात. एखाद्या पशूसारखा त्याचाही देवीला बळी देतात. “आम्ही नेमके त्याच दिवशी त्या नगरात पोचलो. आम्हाला मारायला लोक गोळा झाले. पण आम्हाला वेळीच कळले, आणि आम्ही पळून आलो. हीच ती नवलाची गोष्ट.”
अठ्ठाविसावी पुतळी — रक्ताची भुकेली देवी
मरायला नेलेला माणूस
हे ऐकून विक्रमादित्य राजा त्या नगरात गेला. देवीचे भयंकर देऊळ त्याने पाहिले. त्याने देवीला नमस्कार केला, तिची स्तुती केली, आणि तो देवळाच्या सभामंडपात गेला. तेवढ्यात एक माणूस आत आला. त्याचा चेहरा अगदी केविलवाणा झाला होता. त्याच्याबरोबर लोकांची गर्दी होती. त्यांच्यापुढे वाजंत्री वाजवत चालले होते. राजाने विचार केला, “यालाच हे लोक देवीला बळी द्यायला आणत असणार. म्हणूनच हा इतका दुःखी दिसतो. आता मी माझा देह देईन, आणि याला सोडवीन. “हा देह शंभर वर्षे टिकला, तरी शेवटी तो जाणारच. बाकी सगळे नाहीसे होते. उरतात ते फक्त पुण्य आणि कीर्ती. म्हणून देह गेला तरी चालेल, पण माणसाने ते मिळवावे.”
अठ्ठाविसावी पुतळी — रक्ताची भुकेली देवी
राजा त्याच्या जागी
मग राजा गर्दीला म्हणाला, “लोकहो, या बिचाऱ्याला तुम्ही कुठे नेत आहात?” “देवीला याचा बळी द्यायला,” ते म्हणाले. “कशासाठी?” राजाने विचारले. “या नरबळीने देवी प्रसन्न होईल,” ते म्हणाले, “आणि आमच्या इच्छा पुऱ्या करेल.” “लोकहो,” राजा म्हणाला, “हा माणूस अगदी लहानखुरा आहे, आणि भयंकर घाबरलेला आहे. याच्या देहाने देवीला फारसा आनंद होणार नाही. याला सोडा, आणि याच्याऐवजी मला न्या. मी उंचापुरा आणि बळकट आहे. माझ्या देहाने देवी जास्त प्रसन्न होईल. मला मारा, आणि माझा बळी द्या.”
अठ्ठाविसावी पुतळी — रक्ताची भुकेली देवी
देवीने तलवार धरली
असे म्हणून राजाने त्या माणसाला सोडवले. मग तो स्वतः जाऊन देवीसमोर उभा राहिला. तो आपल्याच गळ्यावर तलवार चालवणार होता. पण देवीने ती तलवार धरून ठेवली. “हे महावीरा,” ती म्हणाली, “तुझ्या धीरावर आणि परोपकारावर मी प्रसन्न झाले आहे. वर माग.” “हे देवी,” राजा म्हणाला, “आपण माझ्यावर प्रसन्न असाल, तर आजपासून नरबळी घेणे सोडून द्या.” “तथास्तु,” देवी म्हणाली.
अठ्ठाविसावी पुतळी — रक्ताची भुकेली देवी
मोठ्या झाडासारखा
मग लोक राजाला म्हणाले, “महाराज, दुसऱ्यांसाठी आपण दुःख सोसता, आणि स्वतःचे सुख सोडता. आपण एखाद्या मोठ्या झाडासारखे आहात. ते कडक ऊन स्वतःच्या माथ्यावर झेलते, आणि त्याच्या आश्रयाला येणाऱ्या सगळ्यांना थंडगार सावली देते.” मग राजाने त्यांचा निरोप घेतला, आणि तो आपल्या नगरात परत गेला. इथे पुतळीने आपली गोष्ट संपवली. “हे राजा,” ती भोजाला म्हणाली, “असा धीर आणि असे औदार्य आपल्यात असेल, तर या सिंहासनावर बसा.” हे ऐकून भोज राजा काहीच बोलला नाही. फ्रँकलिन एजर्टन यांनी १९२६ मध्ये सिंहासन बत्तिशीच्या दक्षिणी पाठाचे इंग्रजी भाषांतर केले. त्यातल्या अठ्ठाविसाव्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे. पूर्वेकडच्या त्या नगराचे नाव वेतालपुरी, आणि देवीचे नाव शोणितप्रिया, म्हणजे “रक्ताची आवड असलेली”. राजाने सात मातृकांची केलेली स्तुती, आणि जीवन व संपत्ती किती लवकर नाहीशी होते यावरचे त्याचे श्लोक इथे गाळले आहेत, किंवा एका वाक्यात दिले आहेत.