सिंहासन बत्तिशी
बारावी पुतळी — वेळूच्या बनातली किंकाळी
बारावी पुतळी बोलली
भोज राजा पुन्हा एकदा सिंहासनावर बसायला आला. या वेळी बारावी पुतळी बोलली. तिचे नाव प्रबोधवती. “हे राजा,” ती म्हणाली, “हे विक्रमादित्याचे सिंहासन आहे. ज्याच्यात त्याचा थोरपणा आणि त्याचे इतर गुण आहेत, त्यानेच यावर बसावे.” “त्याच्या थोरपणाची आणि इतर गुणांची एखादी गोष्ट मला सांग,” भोज म्हणाला. “हे राजा, ऐका,” पुतळी म्हणाली. आणि तिने ही गोष्ट सांगितली. विक्रमादित्याच्या उज्जयिनी नगरात भद्रसेन नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याच्या संपत्तीला अंत नव्हता. तरीही तो कधी पैसा उधळत नसे. त्याला पुरंदर नावाचा एक मुलगा होता.
बारावी पुतळी — वेळूच्या बनातली किंकाळी
उधळ्या मुलगा
काही काळाने भद्रसेन वारला, आणि वडिलांची सगळी संपत्ती पुरंदरला मिळाली. तो तरुण होता. तरुण मुले करतात तसा तोही पैसा उधळू लागला. एके दिवशी त्याचा एक जिवलग मित्र त्याला म्हणाला, “पुरंदरा, तू व्यापाऱ्याच्या घरचा. पण राजपुत्रासारखा पैसा खर्च करतोस. ही व्यापाऱ्याची रीत नव्हे. व्यापाऱ्याच्या मुलाने संपत्ती वाढवावी. एक कवडीसुद्धा वाया घालवू नये. आज वाचवलेले कधीतरी संकटात कामी येते. म्हणून शहाणा माणूस वाईट दिवसांसाठी बचत करतो.”
बारावी पुतळी — वेळूच्या बनातली किंकाळी
होणारे ते होणारच
“असे म्हणणारा शहाणा नव्हे,” पुरंदर म्हणाला. “संकट आले, की बाकी सगळ्याबरोबर साठवलेलेही जाते. “म्हणून शहाणा माणूस गेलेल्याचे दुःख करत नाही. पुढच्याची काळजी करत नाही. तो फक्त आजचा विचार करतो. जे यायचे ते काही न करता येतेच. आणि जे जायचे ते हातात धरून ठेवले, तरी जातेच.” यावर मित्राकडे उत्तर नव्हते. तो पुढे काहीच बोलला नाही. आणि पुरंदर वडिलांची संपत्ती उधळत राहिला. शेवटी ती सगळी संपली.
बारावी पुतळी — वेळूच्या बनातली किंकाळी
मित्र दूर झाले
पुरंदरकडे पैसा उरला नाही, तेव्हा मित्र आणि नातेवाईक त्याला किंमत देईनासे झाले. कोणी त्याच्या संगतीतसुद्धा राहीना. तो मनात म्हणाला, “माझ्या हातात पैसा होता, तोवर हे मित्र माझ्या पुढेपुढे करत होते. आता ते माझ्याकडे ढुंकूनही बघत नाहीत. खरेच आहे. ज्याच्याकडे पैसा, त्यालाच मित्र. गरिबाला कोणी नसते. गरिबीपेक्षा मरण बरे.” असे विचार करत तो दूर देशी निघून गेला.
बारावी पुतळी — वेळूच्या बनातली किंकाळी
मध्यरात्रीची किंकाळी
भटकत भटकत तो हिमालयाजवळच्या एका नगरात पोचला. त्या नगरापासून जवळच वेळूचे एक बन होते. पुरंदर गावाच्या वेशीपाशी थांबला. त्या रात्री तो कोणाच्यातरी घराबाहेरच्या ओट्यावर झोपला. मध्यरात्री त्याला वेळूच्या बनातून एका बाईची किंकाळी ऐकू आली. “लोकहो, वाचवा, वाचवा! राक्षस मला मारतो आहे!” भल्या पहाटे त्याने गावकऱ्यांना विचारले, “लोकहो, त्या वेळूच्या बनात काय आहे? रात्री ओरडणारी ती बाई कोण?” “त्या बनातल्या किंकाळ्या आम्हाला रोज रात्री ऐकू येतात,” ते म्हणाले. “पण काय आहे ते जाऊन पाहायला सगळ्यांनाच भीती वाटते.”
बारावी पुतळी — वेळूच्या बनातली किंकाळी
राजा पाहायला निघाला
मग पुरंदर उज्जयिनीला परत आला, आणि विक्रमादित्य राजाला भेटायला गेला. “पुरंदरा,” राजाने विचारले, “प्रवासात तू काय नवल पाहिलेस?” पुरंदरने त्याला वेळूच्या बनाबद्दल सांगितले. राजा त्याला बरोबर घेऊन त्या नगराकडे निघाला. त्या रात्री राजाला बनात त्या बाईचा आक्रोश ऐकू आला, आणि तो आत शिरला. तिथे एक भयंकर राक्षस एका बाईला मारत होता. ती किंचाळत होती, पण स्वतःला वाचवू शकत नव्हती. “दुष्टा!” राजा म्हणाला. “एका असहाय बाईला का मारतोस?” “तुला काय त्याचे?” राक्षस म्हणाला. “तुझ्या वाटेने चालता हो. नाहीतर माझ्या हातून फुकट मरशील.” मग दोघांची लढाई झाली, आणि राजाने राक्षसाला ठार मारले.
बारावी पुतळी — वेळूच्या बनातली किंकाळी
बाईचा शाप
ती बाई पुढे आली, आणि राजाच्या पाया पडली. “महाराज,” ती म्हणाली, “आपल्या कृपेने माझा शाप संपला. आपण मला मोठ्या दुःखातून सोडवलेत.” “तू कोण आहेस?” राजाने विचारले. “ऐका,” ती म्हणाली. “याच नगरात एक फार श्रीमंत ब्राह्मण राहत होता. मी त्याची बायको. त्याचे माझ्यावर फार प्रेम होते. पण मला त्याची काहीच पर्वा नव्हती. मला माझ्या रूपाचा आणि माझ्या मोहकपणाचा गर्व होता. त्याला माझ्याशी शय्यासोबत हवी असे, तेव्हा मी नकार देत असे.
बारावी पुतळी — वेळूच्या बनातली किंकाळी
शापाची मर्यादा
“त्यामुळे माझ्यावरच्या प्रेमापायी तो आयुष्यभर तळमळत राहिला. मरताना त्याने मला शाप दिला. ‘दुष्ट बाई! तुझ्यामुळे मी आयुष्यभर दुःख भोगले. म्हणून वेळूच्या बनात राहणारा एक भयंकर राक्षस रोज रात्री येईल. तो तुझ्यावर बळजबरी करेल, आणि तुला मारेल.’ “मी त्याची विनवणी केली. ‘स्वामी, या शापाला काहीतरी शेवट ठेवा.’ “तो म्हणाला, ‘दुसऱ्यांच्या सेवेसाठी जगणारा कोणी मोठा धैर्यवान पुरुष इथे येऊन त्या राक्षसाला मारेल, तेव्हा तुझा शाप संपेल.’ “आपल्यामुळे आता मी त्या शापातून सुटले.”
बारावी पुतळी — वेळूच्या बनातली किंकाळी
सोन्याचे नऊ हंडे
“आता मी मरणार आहे,” ती बाई पुढे म्हणाली. “माझ्याकडे सोन्याने भरलेले नऊ हंडे आहेत. ते वाया जातील. आपण ते घ्या.” सोने कुठे आहे ते तिने राजाला सांगितले, आणि मग तिचे प्राण गेले. पण राजाने ते सोन्याचे नऊ हंडे पुरंदर व्यापाऱ्याला दिले. आणि पुरंदरला बरोबर घेऊन राजा उज्जयिनीला परतला. इथे पुतळीने आपली गोष्ट संपवली. “हे राजा,” ती भोजाला म्हणाली, “असा थोरपणा आणि असे धैर्य आपल्यात असेल, तर या सिंहासनावर बसा.” आणि भोज राजा काहीच बोलला नाही. फ्रँकलिन एजर्टन यांनी १९२६ मध्ये सिंहासन बत्तिशीच्या दक्षिणी पाठाचे इंग्रजी भाषांतर केले. त्यातल्या बाराव्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे. पुरंदरच्या मित्राचे नाव इथे गाळले आहे. दैवावरची आणि गरिबाला मित्र नसतात यावरची लांबलचक सुभाषिते काही वाक्यांत दिली आहेत.