सिंहासन बत्तिशी
तेविसावी पुतळी — अशुभ स्वप्न
तेविसावी पुतळी बोलली
भोज राजा पुन्हा एकदा सिंहासनावर बसायला आला. आता तेविसावी पुतळी त्याच्याशी बोलली. तिचे नाव कामोन्मादिनी. “हे राजा,” ती म्हणाली, “ज्याच्यात विक्रमादित्याचे औदार्य आणि त्याचे इतर गुण आहेत, तोच या सिंहासनावर बसू शकतो.” “हे पुतळी,” भोज म्हणाला, “त्याच्या औदार्याची एखादी गोष्ट मला सांग.” “ऐका महाराज,” पुतळी म्हणाली. एकदा विक्रमादित्य पृथ्वीवर फिरून आपल्या नगरात परत आला. नगरातले सगळे लोक आनंदून गेले. राजा आपल्या महालात गेला. दुपारी त्याने अंगाला उटी लावून घेतली. उंची वस्त्रे घातली, अंगाला चंदन लावले. मग त्याने विष्णूची पूजा केली.
तेविसावी पुतळी — अशुभ स्वप्न
दानाचा दिवस
त्यानंतर त्याने ब्राह्मणांना नेहमीप्रमाणे गाई आणि जमीन दान दिली. गरीब, आंधळे, बहिरे, लंगडे, आणि ज्यांना कोणाचा आधार नाही अशा सगळ्यांनाही त्याने भरपूर दान दिले. जेवणाच्या वेळी त्याने आधी मुलांना आणि म्हाताऱ्यांना जेवू घातले. मगच तो घरच्या बाकीच्या मंडळींबरोबर जेवला. त्या रात्री राजा मोगऱ्याची फुले पसरलेल्या पलंगावर झोपला. पहाटेच्या सुमाराला त्याला एक स्वप्न पडले. आपण एका रेड्यावर बसलो आहोत, असे त्याला दिसले.
तेविसावी पुतळी — अशुभ स्वप्न
वाईट स्वप्नाचे फळ
राजा दचकून जागा झाला आणि त्याने विष्णूचे नाव घेतले. सकाळची प्रार्थना झाल्यावर तो सिंहासनावर बसला. मग त्याने आपले स्वप्न ब्राह्मणांना सांगितले. दरबारातला एक विद्वान ब्राह्मण बोलला. “महाराज, स्वप्नात गाय, बैल किंवा हत्ती यांच्यावर बसणे शुभ असते. पण रेडा, गाढव किंवा उंट यांच्यावर बसणे शुभ नसते. असे म्हणतात, की स्वप्नात रेड्यावर बसणारा सहा महिन्यांत मरतो. हे अशुभ स्वप्न आहे, महाराज. आपल्यावर संकट येणार, असा त्याचा अर्थ आहे.” “ब्राह्मणदेवा,” राजा म्हणाला, “हे स्वप्न खरे होऊ नये, म्हणून काय करता येईल?”
तेविसावी पुतळी — अशुभ स्वप्न
उघडा खजिना
“महाराज,” ब्राह्मण म्हणाला, “तुपाचा होम करा, आणि पुरोहिताला दक्षिणा द्या. मग राजाला करतात तसा विष्णूच्या मूर्तीला राज्याभिषेक करा. नवरत्ने वाहून देवाचा सन्मान करा. ब्राह्मणांना आणि गरिबांना भरपूर दान द्या. “या पुण्यकर्मांनी आणि ब्राह्मणांच्या आशीर्वादांनी स्वप्नातले संकट टळेल.” ब्राह्मणाने सांगितले ते सगळे राजाने केले. आणि मोठे दान करण्यासाठी त्याने तीन दिवस आपला खजिना उघडा ठेवला. जो तो आला, आणि त्याला हवे तितके धन घेऊन गेला. इथे पुतळीने आपली गोष्ट संपवली. “हे राजा,” ती भोजाला म्हणाली, “असे औदार्य आपल्यात असेल, तर या सिंहासनावर बसा.” आणि भोज राजा काहीच बोलला नाही. फ्रँकलिन एजर्टन यांनी १९२६ मध्ये सिंहासन बत्तिशीच्या दक्षिणी पाठाचे इंग्रजी भाषांतर केले. त्यातल्या तेविसाव्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे. राजाने गायलेली विष्णूची स्तोत्रे, जेवणावरचे आणि आरोग्यावरचे श्लोक, स्वप्नातली दिशा (दक्षिण), आणि शुभ-अशुभ स्वप्नांवरचे ब्राह्मणाचे श्लोक इथे गाळले आहेत, किंवा एका वाक्यात दिले आहेत.