पुराणे आणि महाकाव्यांतील कथा · विष्णू आणि त्यांचे अवतार
मत्स्यावतार: मनू आणि मासा
वेद चोरीला गेले
फार पूर्वीची गोष्ट. सृष्टीचे एक युग संपत आले होते. युग संपले की सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मदेव झोपतो. तो झोपलेला असतो तोवर पृथ्वी आणि बाकीची भुवने समुद्राखाली बुडून राहतात. त्या काळाला ब्रह्मदेवाची रात्र म्हणतात. ब्रह्मदेवाला आधीच पेंग येऊ लागली होती. झोप डोळ्यांवर येत असतानाच त्याच्या तोंडातून वेद निसटले. वेद म्हणजे पवित्र शब्द; सगळे पवित्र ज्ञान त्यांत साठवलेले आहे. हयग्रीव नावाचा एक बलाढ्य दैत्य जवळच होता. त्याने ते पळवून नेले. दैत्याने काय केले ते विष्णूला कळले. विष्णू म्हणजे जगाचे रक्षण करणारा प्रभू. वेदांचे आणि सज्जनांचे रक्षण करायची वेळ आली, की तो देह धारण करतो. या वेळी तो मत्स्य, म्हणजे मासा, होऊन आला. आणि सुरुवातीला तो अगदीच चिमुकला मासा होता.
मत्स्यावतार: मनू आणि मासा
राजाच्या ओंजळीत मासा
त्या युगात सत्यव्रत नावाचा एक राजा होता. तो राजा तर होताच, पण साधुपुरुषही होता. विष्णूवर त्याचे प्रेम होते. तो तपश्चर्या करीत असे. तपश्चर्या म्हणजे साधुपुरुषांचे कठोर व्रत. तो फक्त पाणी पिऊन राहत असे. एके दिवशी राजा एका नदीवर प्रार्थना करीत पाणी अर्पण करीत होता. त्याने ओंजळीत थोडे पाणी घेतले. त्यात त्याला एक चिमुकला मासा दिसला. राजा त्याला परत नदीत सोडणारच होता. तेवढ्यात मासा बोलला. तो म्हणाला, “राजा, तू दीनदुबळ्यांचा कैवारी आहेस. मी लहान आहे आणि घाबरलो आहे. तू मला या नदीत कसा टाकतोस? पाण्यातले जीव आपल्याच जातीच्या जिवांना खातात.”
मत्स्यावतार: मनू आणि मासा
कमंडलू पुरेना
सत्यव्रत फार दयाळू होता. हा मासा म्हणजे विष्णू आहे, आणि तो प्रेमापोटी आपल्याकडे आला आहे, हे त्याला ठाऊक नव्हते. त्या लहानशा जिवाला जपावे, एवढेच त्याला वाटले. त्याने माशाला आपल्या पाण्याच्या कमंडलूत ठेवले आणि आपल्या आश्रमात नेले. एका रात्रीत मासा एवढा मोठा झाला, की कमंडलूत मावेना. तो म्हणाला, “या कमंडलूत अंग चोरून मला राहवत नाही. मला याहून मोठी जागा शोधून दे.” राजाने त्याला पाण्याच्या एका मोठ्या रांजणात ठेवले. थोड्याच वेळात तो तीन हात लांब झाला. तो म्हणाला, “राजा, हा रांजणही मला पुरत नाही. मी तुझ्या आश्रयाला आलो आहे. मला ऐसपैस जागा दे.”
मत्स्यावतार: मनू आणि मासा
सरोवरही लहान पडले
राजाने माशाला एका सरोवरात नेऊन सोडले. तिथे तो वाढतच गेला. शेवटी त्याच्या शरीराने सगळे सरोवर व्यापून टाकले. तो म्हणाला, “राजा, मी पाण्यातला जीव आहे. हे पाणी मला पुरायचे नाही. माझे रक्षण कर, आणि जे कधीच आटत नाही अशा सरोवरात मला ठेव.” मग राजा त्याला अशा एका सरोवरातून दुसऱ्या सरोवरात नेत राहिला. पण प्रत्येक सरोवर माशाला लहानच पडले. शेवटी राजाने त्याला समुद्रात नेऊन सोडले. तरीही मासा ओरडला, “इथे समुद्रातले मोठमोठे भयंकर प्राणी मला खाऊन टाकतील! मला इथे सोडून जाऊ नकोस.”
मत्स्यावतार: मनू आणि मासा
राजाला उमगले
राजा थक्क होऊन उभा राहिला. तो म्हणाला, “आपण कोण आहात? माशाचे रूप घेऊन आपण आमच्याकडे येता आणि आम्हांला गोंधळात टाकता. असा जीव मी कधी पाहिला नाही, कधी ऐकलाही नाही. एका दिवसात आपण शेकडो मैल रुंद सरोवर भरून टाकले. “आपण नक्कीच स्वतः भगवान विष्णू आहात. जिवांवरच्या दयेपोटी आपण हे रूप घेतले आहे. मी आपल्याला नमस्कार करतो. आपल्या पायांशी आलेला कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. आपण हे रूप का घेतले, ते मला सांगा.” जे विष्णूवर प्रेम करतात, त्यांच्यावर विष्णूचेही प्रेम असते. राजाचे भले करावे, असे त्याला वाटले. म्हणून पुढे काय होणार आहे, ते मत्स्याने त्याला सांगितले.
मत्स्यावतार: मनू आणि मासा
सात दिवस
मत्स्य म्हणाला, “आजपासून सातव्या दिवशी पृथ्वी, आकाश आणि सगळी भुवने महासागरात बुडतील. ती बुडत असताना एक मोठी नाव तुझ्याकडे येईल. ती मीच पाठवीन. “सगळ्या औषधी वनस्पती आणि लहानमोठी सगळी बीजे बरोबर घे. मग सगळ्या प्रकारचे जीव घेऊन नावेत चढ. सप्तर्षी, म्हणजे ऋषींमधले सगळ्यांत श्रेष्ठ असे सात ऋषी, तुझ्याबरोबर असतील. “त्या एकच एक महासागरावरून तू न भिता जाशील. तिथे ऋषींच्या तेजाशिवाय दुसरा कसलाच उजेड नसेल. जोराचा वारा नावेला हेलकावे देईल. तेव्हा मी जवळच असेन. नाव माझ्या शिंगाला बांध, आणि दोर म्हणून एक मोठा नाग वापर. ब्रह्मदेवाची रात्र संपेपर्यंत मी तुम्हांला पाण्यावरून ओढून नेईन.”
मत्स्यावतार: मनू आणि मासा
महापूर
एवढे बोलून मत्स्य दिसेनासा झाला. सांगितलेल्या दिवसाची वाट पाहत सत्यव्रत थांबला. त्याने जमिनीवर पवित्र दर्भ पसरले आणि तो त्यांवर बसला. मत्स्याचे रूप घेतलेल्या विष्णूवर त्याने आपले मन लावून ठेवले. मग समुद्राने आपले किनारे फोडले. तो चारी बाजूंनी पृथ्वीवर लोटला. मोठमोठे ढग कोसळू लागले, आणि पाणी चढतच गेले. मत्स्याने सांगितलेले राजाने मनात घट्ट धरून ठेवले. आणि पाहतो तर समोर नाव उभी! त्याने औषधी आणि इतर वनस्पती घेतल्या आणि तो नावेत चढला. सातही ऋषी त्याच्याबरोबर चढले. ऋषींना आनंद झाला. ते म्हणाले, “राजा, विष्णूचे ध्यान कर. या संकटात तोच आपले रक्षण करील आणि आपल्याला सुखरूप पार नेईल.”
मत्स्यावतार: मनू आणि मासा
सोनेरी मत्स्य
राजाने विष्णूचे ध्यान केले. आणि त्या महासागरात मत्स्य प्रकट झाला. तो सोनेरी होता. त्याला एकच शिंग होते. आणि तो लाखो मैल लांब होता. सत्यव्रताने सांगितल्याप्रमाणे केले. त्याने नाव मत्स्याच्या शिंगाला बांधली, आणि एक मोठा नाग हाच त्याचा दोर झाला. मग त्याचे मन आनंदले, आणि त्याने विष्णूची स्तुती केली. तो म्हणाला, “आपणच आमचे सगळ्यांत श्रेष्ठ गुरू आहात. ज्या गुरूला सत्य ठाऊक नाही, तो आंधळ्यांना वाट दाखवणाऱ्या आंधळ्यासारखा असतो. पण सूर्य पाहतो तसे आपण पाहता. मला जागे करावे म्हणून मी आपल्याकडे आलो आहे. प्रभू, मला शिकवा, आणि आपल्या धामाची वाट मला दाखवा.”
मत्स्यावतार: मनू आणि मासा
राजा मनू झाला
मत्स्य महासागरातून पुढे जात राहिला, आणि जाता जाता विष्णूने राजाला उपदेश केला. सत्यव्रत ऋषींबरोबर नावेत बसून ऐकत राहिला. शेवटी त्याच्या मनात एकही शंका उरली नाही. अखेर महापूर ओसरला, आणि ब्रह्मदेव झोपेतून उठला. इतका सगळा काळ हयग्रीव दैत्याने चोरलेले वेद आपल्याजवळच ठेवले होते. आता विष्णूने त्याला ठार मारले. त्याने वेद परत घेतले आणि ब्रह्मदेवाला परत दिले. आणि ज्ञानाने संपन्न झालेला राजा सत्यव्रत विष्णूच्या कृपेने मनू झाला. मनू म्हणजे सृष्टीच्या एका युगातला मानवजातीचा पिता आणि पहिला राजा. आपण आज ज्या युगात राहतो, त्या युगाचा मनू म्हणजे सत्यव्रत. भागवत पुराण, स्कंध ८, अध्याय २४ यावरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे. राजाचे लांबलचक स्तोत्र इथे थोडक्यात दिले आहे. महाभारतात (वनपर्व, विभाग १८६) हीच गोष्ट वेगळ्या प्रकारे सांगितली आहे; तिथे वेदांची चोरी नाही. ही गोष्ट प्रथम शतपथ ब्राह्मणात (१.८.१) सांगितली आहे.