वेदांतील कथा
मन आणि वाणी
श्रेष्ठ कोण?
वाणी ही एक देवी आहे. यज्ञातल्या आहुती देवांपर्यंत पोहोचवण्याचे काम ती करते. एकदा वाणी आणि मन यांच्यात भांडण जुंपले. दोघांपैकी श्रेष्ठ कोण, हा वाद होता. दोघेही म्हणत, “मीच श्रेष्ठ.” मनाने आपले कारण सांगितले. “मला आधी समजले नाही, असे तू कधीच काही बोलत नाहीस,” मन म्हणाले. “तू फक्त माझी नक्कल करतेस. माझ्याच पावलांवर पाऊल टाकून चालतेस.” वाणीने आपले कारण सांगितले. “तुला जे कळते, ते मी सगळ्यांना कळवते,” ती म्हणाली. “मी ते इतरांना सांगते.” मग दोघे प्रजापतीकडे गेले. प्रजापती म्हणजे सर्व प्राण्यांचा स्वामी. त्यांनी त्याला निवाडा करायला सांगितले. प्रजापतीने मनाच्या बाजूने निकाल दिला. “मन श्रेष्ठ आहे,” तो वाणीला म्हणाला. “तू फक्त त्याची नक्कल करतेस, त्याच्या पावलांवर पाऊल टाकतेस. आणि नक्कल करणारा कमी प्रतीचा असतो.”
मन आणि वाणी
वाणीचे बाळ
वाणी तेव्हा गर्भवती होती. प्रजापती तिच्याविरुद्ध बोलला, तेव्हा ती खचून गेली, आणि तिच्या पोटातले मूल गेले. मग ती प्रजापतीला म्हणाली, “तुम्ही माझ्याविरुद्ध बोललात. म्हणून तुमच्या आहुती मी तुमच्यापर्यंत कधीच पोहोचवणार नाही.” आणि तेव्हापासून वाणीने प्रजापतीला एकही आहुती पोहोचवली नाही. वाणीपासून पडलेले ते बीज देवांनी उचलले. ते एका कातड्यात घालून त्यांनी नेले. ते पुन्हा पुन्हा विचारत होते, “इथे आहे का? इथे?” संस्कृतमध्ये “इथे” याला “अत्र” म्हणतात. म्हणून त्या बीजापासून जे बाळ झाले, त्याचे नाव अत्री पडले. असा अत्रींचा जन्म वाग्देवीपासून झाला, मनाशी तिचे जे भांडण झाले त्यातून. ही गोष्ट शतपथ ब्राह्मणातून (१.४.५.८-१३) घेतली आहे. वेद आणि त्यांतले विधी समजावणाऱ्या गद्य ग्रंथांपैकी हा एक. तैत्तिरीय संहिता (२.५.११) ही गोष्ट वेगळ्या प्रकारे सांगते. तिथे मन आणि वाणी दोघेही देवांपर्यंत आहुती पोहोचवण्याचा हक्क सांगतात. तेव्हा प्रजापती वाणीला सांगतो, “तू फक्त मनाची दूत आहेस. कारण माणूस जे मनात आणतो, तेच बोलतो.” यज्ञात प्रजापतीसाठी जे काही केले जाते, ते हळू, खालच्या आवाजात का केले जाते, हे समजावण्यासाठी हा ग्रंथ ही गोष्ट सांगतो.