सूर्याच्या कथा आणि इतर लोककथा
अप्पय्या
शंभर अपूप
या गोष्टीला धरून एक जुना संस्कृत श्लोक आहे. त्याचा अर्थ असा: अपूपाने चोर मारले, तलवारीने सिंह, आणि घोड्याने सैन्य. माणसाचे नशीब जसे, तसे दैव त्याच्या मागे चालते. ते कसे घडले, ते ऐका. एका आडगावात एक गरीब ब्राह्मण आणि त्याची बायको राहत होते. लग्नाला कित्येक वर्षे झाली होती, पण त्यांना मूलबाळ नव्हते. ब्राह्मणाला मुलाची फार ओढ होती. या बायकोपासून मूल होईल, अशी आशा त्याला उरली नव्हती. म्हणून त्याने दुसरे लग्न करायचे ठरवले. काही दिवस बायकोने परवानगी दिली नाही. पण तो हट्टालाच पेटला आहे, हे पाहून ती तयार झाली. मनातून मात्र तिने ठरवले, काहीही करून या सवतीचा काटा काढायचा. ब्राह्मणाने एका सुंदर ब्राह्मण मुलीशी लग्न केले. ती पहिल्या बायकोबरोबर त्याच घरात राहायला आली. पहिली बायको काही दिवस थांबली. लगेच काही केले, तर लोकांना संशय येईल, हे ती जाणून होती. देवालाही हे नवे लग्न पसंत असावे. लग्नाला वर्ष झाले, आणि दुसरी बायको गरोदर राहिली. सहाव्या महिन्यात ती बाळंतपणासाठी माहेरी गेली. पंधरा दिवस नवऱ्याने तिचा विरह धीराने सोसला. मग मात्र त्याला तिला भेटायची ओढ लागली. “मी तिच्याकडे कधी जाऊ?” असे तो पहिल्या बायकोला सारखे विचारू लागला. पहिल्या बायकोने त्याच्याबद्दल कळवळा आल्याचे सोंग केले. “प्राणनाथा,” ती म्हणाली, “तुझी तब्येत दिवसेंदिवस खालावते आहे. उद्याच तिच्याकडे जा. लहान मूल, राजा आणि गरोदर बाई यांच्याकडे रिकाम्या हाती जाऊ नये, असे म्हणतात. म्हणून मी तिच्यासाठी शंभर अपूप एका भांड्यात भरून देते.” अपूप म्हणजे तांदळाचे पीठ आणि साखर घालून केलेले गोड पदार्थ. “ते तुला फार आवडतात,” ती पुढे म्हणाली. “वाटेत तू त्यातले खाशील, अशी मला भीती वाटते. ते खाऊ नकोस. वाटेत खायला मी तुला वेगळे अपूप फडक्यात बांधून देते.”
अप्पय्या
छपरीतले चोर
पहिली बायको रात्रभर अपूप करत बसली. सवतीसाठीच्या अपूपांच्या साखरेत आणि पिठात तिने विष कालवले. नवऱ्यावर तिचा काही राग नव्हता. म्हणून त्याच्या अपूपांत विष नव्हते. पहाटेपर्यंत तिने शंभर अपूप एका पितळी भांड्यात भरले. एखादा माणूस सहज डोक्यावर नेऊ शकेल, असे ते भांडे होते. ब्राह्मणाने हलकीशी न्याहारी केली. पितळी भांडे डोक्यावर घेतले. स्वतःचे अपूप फडक्यात बांधून घेतले आणि तो निघाला. दुसऱ्या बायकोचे गाव दोन दिवसांच्या वाटेवर होते. दिवसभर तो भराभर चालला. रात्र पडली, तेव्हा तो थकून गेला होता आणि त्याला कडकडून भूक लागली होती. वाटेच्या कडेला त्याला एक छपरी आणि पाण्याचे एक तळे दिसले. तळ्यात त्याने अंघोळ केली. सूर्य मावळत होता, तेव्हा त्याने संध्या केली. मग फडके सोडून त्याने आपले सगळे अपूप खाल्ले. थोडे पाणी प्यायला. आणि विषाच्या अपूपांचे पितळी भांडे डोक्याखाली घेऊन तो छपरीत गाढ झोपी गेला. तिथून जवळच एक नामांकित राजा राज्य करत होता. त्याला एक अतिशय सुंदर मुलगी होती. तिच्याशी लग्न करायला अनेक जण उत्सुक होते. त्यांपैकी एक होता चोरांचा म्होरक्या. आपल्या एकुलत्या एका मुलासाठी त्याला ती हवी होती. मुलगा देखणा होता, म्हणून राजाला तो आवडत होता. पण एका चोराला मुलगी द्यायला राजाचे मन धजेना. चोरांचा म्होरक्या मात्र हट्टाला पेटला होता. म्हणून त्याने आपली शंभर माणसे पाठवली. रात्री राजकन्या झोपली असताना तिला उचलून रानातल्या आपल्या महालात आणायचे, असा त्याचा बेत होता. त्याच रात्री चोर राजवाड्यात शिरले. झोपलेल्या राजकन्येला त्यांनी पलंगासकट उचलून नेले. ते छपरीपाशी आले, तेव्हा त्यांना फार तहान लागली होती. पलंग खाली ठेवून ते पाणी प्यायला तळ्यात उतरणार, तोच त्यांना अपूपांचा वास आला. विष असो वा नसो, अपूपांचा वास फार गोड होता. चोरांनी छपरी धुंडाळली. एका बाजूला ब्राह्मण झोपलेला त्यांना दिसला. पितळी भांडे त्याच्यापासून जरा दूर पडले होते. कारण झोपेत त्याने ते डोक्याखालून सरकवले होते. चोरांनी ते उघडले. पाहतात तो काय, आत बरोबर शंभर अपूप! त्यांना फार आनंद झाला.
अप्पय्या
झोपलेली राजकन्या
“प्रत्येकाला एक एक,” त्यांचा नाईक म्हणाला. “नुसत्या पाण्यापेक्षा हे बरे. आधी खाऊ, मग पाणी पिऊ.” प्रत्येकाने आपला अपूप गपागप खाल्ला, आणि सगळे तत्काळ मरून पडले. पहिल्या बायकोची ही युक्ती कोणालाच ठाऊक नव्हती. चोरांना जरा जरी संशय आला असता, तर त्यांनी ते अपूप कधीच खाल्ले नसते. रात्रभर ब्राह्मणाला दुसऱ्या बायकोची स्वप्ने पडत होती. पुढे जायच्या घाईने तो जागा झाला. पाहतो तो पितळी भांडे गायब! जवळच रानातली बरीच माणसे पडली होती. त्यांच्या चेहऱ्यावरून ते चोर आहेत, हे त्याने ओळखले. ते झोपले आहेत, असे त्याला वाटले. भांडे गेल्याच्या रागाने त्याने एका मेलेल्या चोराची तलवार घेतली आणि सगळ्यांची मुंडकी उडवली. हे करताना त्याला वाटत होते, आपल्या अपूपांवर ताव मारून झोपलेले शंभर जिवंत चोर आपण मारतो आहोत. मग त्याचे लक्ष राजकन्येच्या पलंगाकडे गेले. पलंगावर एक अतिशय सुंदर स्त्री गाढ झोपली होती. ब्राह्मण चलाख होता. आपण मारलेले लोक हिला पळवून आणणारे चोरच असणार, हे त्याने ओळखले. आपला अंदाज बरोबर आहे, हे त्याला लवकरच कळले. थोड्या अंतरावरून एक सैन्य भराभर येत होते. पुढे एक राजा होता. “माझ्या मुलीला पळवणाऱ्या चोराला ठार करा!” असे सगळे ओरडत होते. हे झोपलेल्या स्त्रीचे वडील असणार, हे ब्राह्मणाने ताडले. त्याने लगेच तिला उठवले. “हे पाहा,” तो म्हणाला, “काही तासांपूर्वी तुम्हाला महालातून पळवून आणणारे हे शंभर चोर. मी एकट्याने त्यांच्याशी लढलो आणि सगळ्यांना ठार मारले.” राजकन्येला फार आनंद झाला. कारण आधी तिला पळवायला चोरांनी केलेल्या सगळ्या युक्त्या तिला ठाऊक होत्या. तिने त्याच्या पाया पडून नमस्कार केला. “मित्रा,” ती म्हणाली, “शंभर चोरांशी एकट्याने लढणारा वीर मी कधी ऐकला नाही. तुमच्यासारखा शूर कोणी नाही. या गुंडांपासून तुम्ही मला वाचवलेत, एवढ्यासाठी तरी मी तुमची बायको होईन.”
अप्पय्या
सिंहीण
राजा बरेच दिवस चोरांच्या म्होरक्यावर नजर ठेवून होता. राजकन्या आणि तिचा पलंग गायब आहेत, हे दासींनी सांगताच तो सैनिक घेऊन सरळ रानाकडे निघाला होता. आता तो छपरीपाशी पोहोचला. मुलगी सुखरूप पाहून त्याला अतिशय आनंद झाला. त्याने तिला मिठी मारली. आणि “यांनी मला वाचवले,” असे म्हणून तिने ब्राह्मणाकडे बोट दाखवले. राजाने ब्राह्मणाला हजार प्रश्न विचारले. लढाईची बरीच माहिती ब्राह्मणाला होती. म्हणून त्याने नीट उत्तरे दिली, आणि या पहिल्या संकटातून तो सुखरूप सुटला. त्याचे शौर्य पाहून राजा थक्क झाला. त्याने त्याला महालात नेले आणि राजकन्या त्याला दिली. शंभर माणसे एकट्याने मारणाऱ्या या नव्या जावयाची चोरांच्या म्होरक्याला एवढी धास्ती बसली, की त्याने राजकन्येला पुन्हा कधी त्रास दिला नाही. अशा रीतीने पहिल्याच साहसात ब्राह्मण राजाचा जावई झाला! राजकन्येच्या देशाजवळच्या एका रानात एक सिंहीण राहत होती. तिला माणसाचे मांस फार आवडे. दर आठवड्याला राजा तिच्या भक्ष्यासाठी एक माणूस रानात पाठवत असे. लोक जमून राजाकडे आले. “महाराज,” ते म्हणाले, “आपल्या जावयांनी तलवारीने शंभर चोर मारले. मग दर आठवड्याला रानात माणूस कशाला पाठवायचा? पुढच्या आठवड्यात जावयांनाच पाठवा, आणि त्यांना सिंहीण मारू द्या.” राजाला हे अगदी योग्य वाटले. त्याने जावयाला बोलावले आणि भरपूर शस्त्रे देऊन रानात पाठवले.
अप्पय्या
पडलेली तलवार
ब्राह्मणाला नाही म्हणता येईना. नाहीतर पहिल्या पराक्रमाची कीर्ती गेली असती. नशीब साथ देईल, या आशेने त्याने सासऱ्याला सांगितले, “मला सगळ्या प्रकारच्या शस्त्रांसह एका मोठ्या वडाच्या झाडावर चढवून द्या.” आणि तसेच झाले. सिंहिणीची जेवणाची वेळ झाली, पण कोणीच आले नाही. तिच्याकडे पाठवलेली माणसे कधीकधी याच झाडावर थोडा वेळ लपून बसत. म्हणून या वेळी कोणी तसली युक्ती केली नाही ना, हे पाहायला ती झाडापाशी आली. ब्राह्मण भीतीने एवढा थरथरला, की त्याच्या हातातली तलवार खाली पडली. नेमक्या त्याच क्षणी सिंहिणीने जांभई दिली. तलवार सरळ तिच्या उघड्या जबड्यात पडली आणि ती मेली. काय झाले, ते पाहून ब्राह्मण झाडावरून खाली उतरला. भयंकर सिंहिणीशी आपण कसे लढलो आणि तिला कसे हरवले, याच्या त्याने हजार गोष्टी रचल्या. या पराक्रमाने त्याच्या शौर्याची कीर्ती पक्की झाली. त्याच्यासाठी मेजवान्या झाल्या, उत्सव झाले. आसपासचा सगळा देश राजाच्या जावयाला आशीर्वाद देऊ लागला. या राज्याजवळ अप्पय्या राजा नावाचा एक बलाढ्य सम्राट राज्य करत होता. आजूबाजूच्या सगळ्या देशांकडून तो खंडणी घेई. ब्राह्मणाच्या सासऱ्यालाही त्याला खंडणी द्यावी लागे. पण आता जावयाच्या ताकदीवर भरवसा ठेवून त्याने खंडणी देणे बंद केले. लगेच अप्पय्या राजाने त्याच्या देशावर स्वारी केली. राजाने मदतीसाठी जावयाची विनवणी केली.
अप्पय्या
न माणसाळलेला घोडा
पुन्हा बिचाऱ्या ब्राह्मणाला नाही म्हणता येईना. नाहीतर सगळी कीर्ती धुळीला मिळाली असती. माघार घेण्यापेक्षा नशिबावर हवाला ठेवायचा, असे त्याने ठरवले. “मला सगळ्यात चांगला घोडा आणि सगळ्यात धारदार तलवार द्या,” असे सांगून तो शत्रूशी लढायला निघाला. गावाच्या जरा पूर्वेला एक नदी वाहत होती. तिच्या पलीकडच्या तीरावर अप्पय्या राजा आणि त्याचे सैन्य आधीच तळ ठोकून बसले होते. राजाने त्याला एक धारदार तलवार दिली, आणि एक अतिशय रानटी घोडा. त्या घोड्याला कधीच माणसाळवले नव्हते. “मला सुताच्या दोऱ्यांनी खोगिराला घट्ट बांधा,” असे ब्राह्मणाने राजाच्या नोकरांना सांगितले. आणि तो निघाला. घोड्याच्या पाठीवर आजवर कोणी बसले नव्हते. तो एवढ्या भयंकर वेगाने उधळला, की पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटले, स्वार आता मेलाच. ब्राह्मण स्वतः भीतीने अर्धमेला झाला होता. त्याने घोड्याला आवरायचा खूप प्रयत्न केला. पण जितका तो लगाम खेचे, तितका घोडा जास्त वेगाने धावे. शेवटी जगायची आशा सोडून त्याने घोड्याला हवे तिकडे जाऊ दिले. घोड्याने नदीत उडी घेतली आणि पोहत पलीकडे गेला. पाण्याने सुताच्या दोऱ्या भिजल्या. त्या फुगल्या आणि त्याला भयंकर रुतू लागल्या. पण जमेल तितक्या धीराने त्याने ते सोसले.
अप्पय्या
अप्पा! अय्या!
पलीकडच्या तीरावर ताडाचे एक मोठे झाड होते. नुकत्याच आलेल्या पुराने ते जवळजवळ उन्मळून गेले होते. जरा धक्का लागला, तरी पडेल, असे झाले होते. ब्राह्मणाला घोडा थांबवता येत नव्हता. म्हणून घोडा आवरेल, या आशेने त्याने ते झाड पकडले. पण झाड मुळासकट त्याच्या हातात आले, आणि घोडा पूर्वीसारखाच बेफाम धावत राहिला. आता झाड सोडणे बरे की धरून ठेवणे बरे, हे त्याला कळेना. तमिळ माणसाला काही लागले, दुखले, की तो ओरडतो, “अप्पा! अय्या!” आपण “आई गं! मेलो!” म्हणतो, तसेच. आणि हा आवाज अगदी शत्रू सम्राटाच्या नावासारखा ऐकू येतो: अप्पय्या. भिजलेल्या दोऱ्या ब्राह्मणाला एवढ्या रुतल्या, की जीव गेल्यासारखा होऊन तो मोठ्याने ओरडला, “अप्पा! अय्या!” घोडा धावतच होता, आणि तो ताडाला घट्ट धरूनच होता. तो फक्त जीव वाचवायची धडपड करत होता. पण लांबून पाहणाऱ्या लोकांना वाटले, हा वीर हातात ताडाचे झाड घेऊन लढाईवर तुटून पडला आहे! शत्रूने “अप्पा! अय्या!” ही आरोळी ऐकली. अप्पय्या हे त्याचेच नाव. त्याला वाटले, हे आपल्याला दिलेले आव्हान आहे. हातात प्रचंड झाड घेतलेला वीर पाहून तो हादरला, आणि पाठ फिरवून पळाला. राजा तशी प्रजा: त्याचे सगळे सैनिकही पळाले. नशीब पुन्हा आपल्याला साथ देते आहे, हे ब्राह्मणाने पाहिले. आणि त्याने शत्रूचा पाठलाग केला, किंवा खरे म्हणजे घोड्याला त्याच्या मनाप्रमाणे बेफाम धावू दिले. क्षणार्धात सम्राट आणि त्याचे प्रचंड सैन्य नाहीसे झाले. घोडा दमला, तेव्हा तो महालाकडे परत फिरला.
अप्पय्या
नशिबाची तीन साहसे
म्हातारा राजा महालाच्या सगळ्यात वरच्या दालनातून नदीपलीकडचे सगळे पाहत होता. जावयाने आपल्या बळावरच शत्रूला हाकलले, असे त्याला वाटले. मोठ्या थाटामाटात तो जावयाला सामोरा गेला. ब्राह्मणाला खोगिराशी बांधणाऱ्या गाठी लोकांनी उत्सुकतेने पटापट कापल्या. म्हाताऱ्या सासऱ्याने आनंदाश्रू ढाळत त्याला मिठी मारली. “सगळे राज्य तुमचे ऋणी आहे,” तो म्हणाला. विजयाची मोठी मिरवणूक निघाली. सगळ्या गावाचे डोळे फक्त ब्राह्मणावर खिळले होते. अशा रीतीने तीनदा, तीन वेगवेगळ्या साहसांत, नशिबाने गरीब ब्राह्मणाला साथ दिली आणि त्याला कीर्ती मिळवून दिली. मग त्याने आपल्या दोन्ही बायकांना बोलावून घेतले आणि आपल्या महालात राहायला आणले. तो दूर असताना दुसऱ्या बायकोला मुलगा झाला होता. ती महालात आली, तेव्हा तो मुलगा वर्षाहून मोठा झाला होता. पहिल्या बायकोने आपले पाप कबूल केले. “मी तुला विषाचे अपूप दिले होते,” असे सांगून तिने त्याची क्षमा मागितली. तेव्हाच त्याला कळले, आपण ज्या शंभर चोरांची मुंडकी उडवली, ते आधीच मेले होते. अपूपांतल्या विषाने ते मेले होते. तिच्या कपटामुळेच त्याच्या आयुष्याला नवी सुरुवात मिळाली होती. म्हणून त्याने तिला क्षमा केली. तिनेही इतर बायकांचा द्वेष सोडला. आणि ते चौघे पुढे कितीतरी दिवस सुखाने आणि समृद्धीत राहिले. श्रीमती हॉवर्ड किंग्जकोट आणि पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १८९० मध्ये दक्षिण भारतातल्या लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. त्यातल्या नवव्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.