सूर्याच्या कथा आणि इतर लोककथा
भला नवरा आणि खाष्ट बायको
मुसळाची पूजा
एका आडगावात एक ब्राह्मण राहत होता. त्याचा चांगुलपणा आणि दयाळूपणा पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. त्याची बायकोही तितकीच प्रसिद्ध होती, पण तापट स्वभाव आणि कंजूषपणासाठी. देवाने त्यांची गाठ बांधली होती. म्हणून एवढे वेगळे असूनही ते एकत्र राहत होते. रोज ब्राह्मणाला तिच्या रागाचा प्रसाद मिळे. त्याने कोणा ब्राह्मणाला जेवायला बोलावले, की ती काहीतरी करून पाहुण्याला पळवून लावी. उन्हाळ्यातली एक छान सकाळ होती. ब्राह्मणाचा एक मित्र त्याच्याकडे आला. तो जरा भोळसट होता. ब्राह्मणाने लगेच त्याला जेवायचे आमंत्रण दिले. बायकोला सांगितले, “जेवण लवकर तयार ठेव.” आणि तो नदीवर अंघोळीला गेला. मित्राला बरे वाटत नव्हते. त्याला नदीऐवजी घरीच गरम पाण्याने अंघोळ करायची होती. म्हणून तो मागे थांबला आणि बाहेरच्या ओसरीवर बसला. दुसरा कोणी पाहुणा असता, तर बायकोने त्याला तोंडावर “खादाड” म्हणून हाकलून दिले असते. पण हा नवऱ्याचा खास मित्र दिसत होता. म्हणून तिने तोंड बंद ठेवले. त्याऐवजी तिने एक युक्ती काढली. पाहुणा आपण होऊनच निघून जाईल, अशी. पाहुण्यादेखत तिने जमीन शेणाने सारवली. मध्यभागी एक मुसळ उभे केले. त्याचे एक टोक भिंतीला टेकवले. मग मोठ्या गंभीरपणे तिने त्याची पूजा केली. ती काय करते आहे, ते पाहुण्याला काहीच कळेना. त्याने नम्रपणे विचारले, “हे काय आहे?” मग तिने एक थाप मारली. “ही मुसळाची पूजा,” ती म्हणाली. “मी रोज करते. आमचे हे एका देवीचे मोठे भक्त आहेत. त्यांच्यासाठी मला हे मुसळ तयार ठेवावे लागते. रोज अंघोळ करून आले, की ते हे मुसळ उचलतात. आणि जेवायला बोलावलेल्या कोणा एका माणसाचे डोके फोडतात. तीच त्यांची देवीला दक्षिणा. आज तुमची पाळी आहे.”
भला नवरा आणि खाष्ट बायको
मागचे दार
पाहुणा फार घाबरला. “काय! पाहुण्याचे डोके फोडायचे! आज मी काही फसणार नाही,” असे मनात म्हणत तो पळायच्या तयारीला लागला. बायकोने त्याची कीव आल्याचे सोंग केले. “मला खरेच तुमची दया येते,” ती म्हणाली. “पण स्वतःला वाचवायला अजून एक उपाय आहे. पुढच्या दाराने रस्त्याने गेलात, तर आमचे हे कदाचित तुमच्या मागे येतील. मागच्या दाराने जा, ते बरे.” पाहुण्याने मनापासून तिचे आभार मानले आणि घाईघाईने मागच्या दाराने निघून गेला. तो गेला आणि लगेचच नवरा अंघोळ करून आला. तो यायच्या आधीच तिने मुसळाच्या पूजेसाठी तयार केलेली जागा साफ करून टाकली होती. घरात मित्र कुठे दिसेना. म्हणून त्याने बायकोला विचारले, “तो कुठे गेला?” तिने रागावल्याचे नाटक केले. “तो हावरट!” ती म्हणाली. “त्याला माझे हे मुसळ हवे होते! चाळीस वर्षांपूर्वी मी हे माहेराहून आणले, माझ्या आंदणात. मी नाही म्हटले, तेव्हा तो घाईघाईने परसातून पळून गेला.” पण तिचा भला नवरा म्हणाला, “पाहुणा जाण्यापेक्षा मुसळ गेलेले बरे. मग ते चाळीसहून जास्त वर्षांपूर्वी तुझ्या आंदणात आलेले का असेना.” आणि हातात मुसळ घेऊन तो मित्राच्या मागे धावला. “ब्राह्मणा! ब्राह्मणा! थांबा, हे मुसळ घेऊन जा!” असे तो ओरडत होता. नवरा हातात मुसळ घेऊन मागे धावतो आहे, हे पाहुण्याने पाहिले. आता तर त्याला बायकोचे बोलणे अधिकच खरे वाटले. “तुम्ही आणि तुमचे मुसळ, कुठेही जा!” तो ओरडला. “माझा पाय पुन्हा तुमच्या घरात पडणार नाही!” आणि तो पळून गेला. श्रीमती हॉवर्ड किंग्जकोट आणि पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १८९० मध्ये दक्षिण भारतातल्या लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. त्यातल्या अकराव्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.