सूर्याच्या कथा आणि इतर लोककथा
भिकाऱ्यासाठी ठेव
सकाळसाठी नको
दक्षिण भारतात आई कधीकधी रात्रीच्या जेवणाला काहीतरी गोड करते. मुले पोटभर खातात आणि मग म्हणतात, “अम्मा, ही खीर किती गोड झाली आहे! सकाळसाठी ठेव.” अम्मा म्हणजे आई. आई लगेच म्हणते, “भिकाऱ्यासाठी ठेव, असे म्हणा. मग ठेवीन.” “सकाळसाठी ठेव, असे का म्हणायचे नाही, अम्मा?” मुले उत्सुकतेने विचारतात. आणि आई त्यांना ही गोष्ट सांगते. एका गावात एक नवरा-बायको राहत होते. दोघांचे एकमेकांवर फार प्रेम होते. रोज नवरा शेती आणि बाग पाहायला जाई. येताना भरपूर भाजी घेऊन येई. बायको ती शिजवे आणि त्याचे पोट भरेपर्यंत त्याला वाढे. रात्रीचे जे उरेल, ते गार झालेले अन्न तो रोज सकाळी बाहेर जाण्याआधी न्याहारीला खाई. त्याला वरण फार आवडे. म्हणून बायको रोज रात्री भरपूर वरण करे. आणि रात्रीच्या शिळ्या भाताबरोबर खायला त्यातले चांगलेसे वरण न्याहारीसाठी बाजूला ठेवी. हे ती कधी विसरत नसे. तरी त्याला शिळा भात आणि वरण इतके आवडत, की रोज रात्री तो तिला आठवण करून देई. “यातले थोडे वरण उद्या सकाळसाठी ठेव,” तो म्हणे. “हो, ठेवते,” ती म्हणे. असे कितीतरी वर्षे चालले. रोज रात्री जेवणाला वरण होई. त्यातले चांगलेसे शिळ्या भातासाठी ठेवले जाई. आणि रोज रात्री, एकही दिवस न चुकता, नवरा बायकोला थोडे ठेवायला सांगे.
भिकाऱ्यासाठी ठेव
उंबऱ्यापाशी हसू
एका रात्री नवऱ्याचे जेवण झाले. त्याच्यानंतर बायको त्याच्याच पत्रावळीवर आपले जेवण करायला बसली होती. त्या रात्रीही नवरा नेहमीसारखा म्हणाला, “यातले थोडे वरण सकाळसाठी ठेव.” त्याबरोबर उंबऱ्याजवळून कोणीतरी खळखळून हसल्याचा आवाज आला. दोघे चकित झाले. त्यांनी सगळे घर शोधले. पण कोणी सापडले नाही. “यातले थोडे वरण सकाळसाठी ठेव,” नवरा पुन्हा म्हणाला. पुन्हा तसेच हसू आले. प्रत्येक वेळी त्याच्या बोलण्यामागोमाग हसू येत होते. म्हणून तो तिसऱ्यांदा तेच म्हणाला. आणि तिसऱ्यांदा हसू फुटले. घरात तीनदा कोणीतरी हसल्याचे त्यांनी ऐकले होते. तरी कोणीच दिसत नव्हते. त्याला वाटले, एखादा शेजारी आपली थट्टा करत असेल. म्हणून त्याने बारकाईने चौकशी केली. कोणीही तसे केले नव्हते, याची त्याने खात्री करून घेतली. घराच्या एकाच भागातून तीनदा, स्पष्ट हसू ऐकू आले होते. आता तो घाबरला. त्याच रात्री कोणाला वाटलेही नसेल असे घडले. तो मागच्या दाराची कडी लावत होता. तेवढ्यात त्याच्या बोटाला साप चावला. शेजारच्या घरात साप निघाला, हे शेजाऱ्यांना कळले. ते जाडजूड सोटा घेऊन धावत आले. पण तोपर्यंत वरणावर एवढे प्रेम करणारा तो घरधनी बेशुद्ध होऊन पडला होता.
भिकाऱ्यासाठी ठेव
यमदूत
बायको त्याच्याशेजारी बसून आक्रोश करू लागली. “अरे,” ती रडत म्हणाली, “एवढ्यात तुझे वरण कसे विसरलास? आम्हा सगळ्यांना सोडून परलोकी कसा निघून गेलास? आत्ताच तर मला ते ठेवायला सांगितले होतेस. आणि चवसुद्धा न घेता गेलास!” शेजाऱ्यांनी साप शोधला. पण तो सापडला नाही. तेवढ्यात रिकाम्या हवेतून एक आवाज आला. तो यमाचा दूत होता. मघाशी हसणाराही तोच होता. “या माणसाचे आज रात्री ठरलेल्या वेळी मरण लिहिलेले होते,” तो आवाज म्हणाला. “त्याला यमलोकात न्यायला यमदेवांनी मला पाठवले. त्या वेळेच्या सुमारे दीड तास आधी मी या घरी पोहोचलो. नेमका तेव्हा हा बायकोला सांगत होता, माझे आवडते वरण सकाळसाठी ठेव. मला हसू आवरले नाही. ते खळखळून बाहेर फुटले. मी देवलोकातला आहे. म्हणून मी कोणाला दिसत नाही. त्यामुळेच हसू ऐकल्यावर कोणाला मी इथे सापडलो नाही. मग मी साप झालो आणि माझे भयंकर काम करायच्या वेळेची वाट पाहत थांबलो. आता हा बिचारा राहिला नाही. दीड तासापूर्वी त्याला पक्की खात्री होती, की उद्या सकाळी आपण शिळा भात खायला जिवंत असणार. या जगात काहीच निश्चित नाही. तरी माणसांना स्वतःबद्दल किती खात्री असते! म्हणून मला हसू आले. न्याहारीसाठी वरण ठेव, असे तो बायकोला किती खात्रीने सांगत होता!” एवढे बोलून यमदूत नाहीसा झाला. आपण धन्याचा हुकूम कसा पार पाडला, हे यमाला सांगायला गेला असेल.
भिकाऱ्यासाठी ठेव
भिकाऱ्यासाठी
“आणि बाळांनो,” आई म्हणते, “तेव्हापासून हे ठरले, की या जगात आपले आयुष्य कधीच निश्चित नसते. या क्षणी जिवंत असलेला माणूस पुढच्या क्षणी जिवंत असेल, याची खात्री नसते. मग खीर उद्या सकाळसाठी ठेव, असे तुम्ही कसे म्हणता? आपल्या आयुष्याची कधीच खात्री नसते, हे तुम्ही या गोष्टीत ऐकलेत. म्हणून ‘उद्या सकाळसाठी’ असे न म्हणता ‘भिकाऱ्यासाठी’ म्हणायचे. भिकाऱ्यासाठी ठेवली, आणि सकाळपर्यंत जगण्याचे भाग्य लाभले, तर थोडी आपणही खाऊ. उरलेली भिकाऱ्याला देऊ. म्हणून आतापासून रात्रीचे काही सकाळसाठी ठेवायचे असले, की नेहमी म्हणायचे, ‘अम्मा, भिकाऱ्यासाठी ठेव.’” “हो, आई,” मुले म्हणतात. “आतापासून तसेच म्हणू.” भारतात ब्राह्मणांमध्ये बायकोने नवऱ्याच्या आधी कधी जेवायचे नसते. ती गरोदर असेल किंवा आजारी असेल, तरच तिला सूट असते. तरीसुद्धा जमेल तेव्हा ती नवऱ्यासाठी थांबते. शरीराला सोसवेनासे झाले, तरच ती आधी जेवते. आणि जेवताना नवऱ्याने नुकत्याच जेवलेल्या पत्रावळीवरच ती बसते. बहुतेक नवरे आपली पाने स्वच्छ ठेवतात. काही जण बायकोवरच्या निखळ प्रेमापोटी, तिचे मन दुखावू नये म्हणून तसे करतात. पण काही नवरे इतर सवयींत गलिच्छ असतात, तसेच जेवतानाही गलिच्छ असतात. त्यांचे जेवण झाले, की त्यांची पाने रस्त्यावर टाकलेल्या आणि कावळ्या-कुत्र्यांनी फाडलेल्या पत्रावळींसारखी दिसतात. तरी बायका जोपर्यंत जुने रिवाज पाळतात, तोपर्यंत त्यांना त्याच पानांवर जेवावे लागते. आणि असला नवरा मिळाला, म्हणून त्या आपल्या नशिबाला दोष देत राहतात. श्रीमती हॉवर्ड किंग्जकोट आणि पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १८९० मध्ये दक्षिण भारतातल्या लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. त्यातल्या बाविसाव्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.