सूर्याच्या कथा आणि इतर लोककथा
ब्रह्मराक्षस आणि केस
कंजूस जमीनदाराचा नोकर
एका गावात एक फार श्रीमंत जमीनदार राहत होता. कितीतरी गावे त्याच्या मालकीची होती. पण तो इतका कंजूस होता, की कोणतेही कूळ राजीखुशीने त्याच्या जमिनी कसायला तयार नसे. जी कुळे होती, ती त्याला फार त्रास देत. त्यांच्यावर तो इतका वैतागला, की त्याने सगळ्या जमिनी पडीक ठेवल्या. त्याची तळी आणि पाटाचे कालवे कोरडे पडले. त्यामुळे तो दिवसेंदिवस गरीब होत गेला. तरी कुळांसाठी पैसे खर्च करून त्यांचे मन जिंकायला तो तयार नव्हता. तो अशा मनःस्थितीत असताना एक विद्वान संन्यासी त्याच्याकडे आला. जमीनदाराने त्याला आपली सगळी दुःखे सांगितली. “बाळा,” संन्यासी म्हणाले, “मला एक मंत्र ठाऊक आहे. तो मी तुला शिकवीन. तीन महिने रात्रंदिवस त्याचा जप कर. चौथ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तुझ्यापुढे एक ब्रह्मराक्षस उभा राहील. त्याला आपला नोकर कर. मग कुळांच्या तुझ्या या किरकोळ कटकटी संपतील. तो तुझा प्रत्येक हुकूम पाळील. शंभर नोकरांचे काम तो एकटा करील.” जमीनदार त्यांच्या पाया पडला. “आत्ताच शिकवा,” अशी विनवणी करू लागला. मग संन्यासी पूर्वेकडे तोंड करून बसले. शिष्य जमीनदार पश्चिमेकडे तोंड करून बसला. अशा रीतीने विधिपूर्वक त्याला मंत्र मिळाला. मग संन्यासी आपल्या वाटेने निघून गेले.
ब्रह्मराक्षस आणि केस
न संपणारे काम
जमीनदार फार खूश झाला. तो मंत्राचा जप करत राहिला. आणि चौथ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तो प्रचंड ब्रह्मराक्षस त्याच्यापुढे उभा राहिला. “काय हवे आहे, महाराज?” तो म्हणाला. “तीन महिने मला का बोलावत आहात?” समोरचा तो अवाढव्य राक्षस पाहून जमीनदाराची बोबडीच वळली. त्याचा भयंकर आवाज ऐकून तर तो आणखीच गर्भगळीत झाला. तरी तो म्हणाला, “तू माझा नोकर व्हावेस आणि माझे सगळे हुकूम पाळावेस.” “कबूल,” ब्रह्मराक्षस आता अगदी नरमाईने म्हणाला. ठरलेली साधना पूर्ण करणाऱ्याला नोकर हवा असला, की ब्रह्मराक्षसाने आपला रांगडेपणा सोडायचाच, असे त्याचे कर्तव्य होते. “कबूल. पण मला नेहमी काम द्यायचे. एक काम संपले, की लगेच दुसरे. असेच चालू ठेवायचे. चुकलात, तर मी तुम्हाला मारून टाकीन.” जमीनदाराला वाटले, आपल्याकडे असल्या कितीतरी राक्षसांना पुरेल एवढे काम आहे. आपला नवा नोकर मदतीला इतका उत्सुक आहे, हे पाहून त्याला आनंद झाला. तो त्याला लगेच एका मोठ्या तळ्यापाशी घेऊन गेला. ते तळे कित्येक वर्षे कोरडे पडले होते. “हे तळे पाहिलेस?” तो म्हणाला. “दोन ताडांच्या उंचीइतके खोल हे खणायचे. आणि बांध जिथे जिथे फुटला आहे, तिथे दुरुस्त करायचा.” “जी, धनी. आपला हुकूम पाळला जाईल,” नोकराने नम्रपणे उत्तर दिले आणि तो कामाला लागला. ते तळे दोन कोस लांब आणि एक कोस रुंद होते. जमीनदाराला वाटले, या कामाला महिने लागतील, वर्षेसुद्धा लागतील. म्हणून तो खुशीत घरी गेला. घरचे लोक झकास जेवण तयार ठेवून त्याची वाट पाहत होते.
ब्रह्मराक्षस आणि केस
बायकोचे लहानसे काम
पण संध्याकाळ होत आली, आणि ब्रह्मराक्षस धन्याला सांगायला आला, “तळ्याचे काम संपले.” जमीनदार थक्क झाला. त्याला जिवाची भीती वाटू लागली. “काय! ज्या कामाला महिने, वर्षे लागतील असे वाटले, ते याने एका दिवसात केले! असाच वेगाने करत राहिला, तर याला मी कामात गुंतवू तरी कसा? आणि काम देता आले नाही, की हा मला मारून टाकील!” असा विचार करून तो रडू लागला. बायकोने त्याचे डोळे पुसले. “असा धीर सोडू नकोस,” ती म्हणाली. “ब्रह्मराक्षसाकडून जेवढे काम करून घेता येईल, तेवढे करून घे. मग मला सांग. मी त्याला असे काम देईन, की ते त्याला खूप खूप दिवस पुरेल. मग तो आपल्याला पुन्हा त्रास देणार नाही.” नवऱ्याला वाटले, हे नुसते पोकळ बोलणे आहे. ब्रह्मराक्षसाने काय केले, ते पाहायला तो त्याच्यामागोमाग गेला. आणि खरेच, तळे अगदी पुरे झाले होते. मग त्याने त्याला आपल्या सगळ्या जमिनी नांगरायला सांगितल्या. त्या वीस गावांत पसरल्या होत्या. दोन घटकांत, तासाच्या आतच ते काम झाले! मग त्याने त्याच्याकडून सगळ्या बागायती जमिनी खणून लावणी करून घेतली. ते काम तर डोळ्याचे पाते लवते न लवते तोच झाले. आता जमीनदाराने आशा सोडली. “आणखी काय काम आहे माझ्यासाठी?” ब्रह्मराक्षस गरजला. धन्याकडे आता काही काम उरलेले नाही, हे त्याने ओळखले होते. आता धन्याला खायची वेळ जवळ आली होती. “मित्रा,” जमीनदार म्हणाला, “माझ्या बायकोकडे तुझ्यासाठी एक लहानसे काम आहे, असे ती म्हणते. ते आता कर. मला वाटते, मी देऊ शकेन असे हे शेवटचे काम. त्यानंतर तू माझा नोकर झालास, त्या अटीप्रमाणे मला तुझे भक्ष्य व्हावे लागेल!”
ब्रह्मराक्षस आणि केस
एक केस
तेवढ्यात बायको तिथे आली. तिच्या डाव्या हातात एक लांब केस होता. तो तिने नुकताच आपल्या डोक्यातून उपटला होता. “हे बघ, ब्रह्मराक्षसा,” ती म्हणाली. “माझ्याकडे तुझ्यासाठी अगदी हलके काम आहे. हा केस घे. तो सरळ कर आणि मला परत आणून दे.” ब्रह्मराक्षसाने शांतपणे केस घेतला. तो सरळ करायला तो एका पिंपळाच्या झाडावर जाऊन बसला. त्याने केस मांडीवर कितीतरी वेळा वळला. आणि सरळ झाला का, ते वर धरून पाहिले. पण छे, तो अजून कुरळाच होता! मग त्याला आठवले, सोनार धातूची तार सरळ करायची असली, की ती आगीत तापवतात. म्हणून तो एका आगीपाशी गेला आणि केस आगीवर धरला. मग काय! तो चुरचुरून आकसला आणि घाण वास सुटला! ब्रह्मराक्षस हादरूनच गेला. “मालकीणबाईंनी दिलेला केस मी परत आणून दिला नाही, तर त्या काय म्हणतील?” तो इतका घाबरला, की पळून गेला. आजही एक रीत आहे, ती समजावून सांगायला ही गोष्ट सांगतात. ज्या झाडावर भुतांची वस्ती आहे असे मानतात, त्या झाडावर भुते पळून जावीत म्हणून लोक मूठभर केस खिळ्याने ठोकतात. श्रीमती हॉवर्ड किंग्जकोट आणि पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १८९० मध्ये दक्षिण भारतातल्या लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. त्यातल्या सव्विसाव्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.