सूर्याच्या कथा आणि इतर लोककथा
दिवा तिथे लक्ष्मी
विसरलेले वचन
तमिळमध्ये एक म्हण आहे, “दीपम लक्ष्मीकरम.” म्हणजे “दिवा लक्ष्मी आणतो.” ही म्हण समजावून सांगायला ही गोष्ट सांगतात. गोविंदपथी गावात पशुपती सेट्टी नावाचा एक व्यापारी राहत होता. त्याला एक मुलगा होता, विनीत, आणि एक मुलगी, गर्वी. लहानपणी खेळता खेळता बहीणभावांनी एकमेकांना वचन दिले होते. पुढे आपल्याला होणाऱ्या मुलांची एकमेकांशी लग्ने होण्यासारखी असतील, तर ती लग्ने आपण लावून द्यायची. गर्वी मोठी झाली. तिचे लग्न एका खूप श्रीमंत व्यापाऱ्याशी झाले. कालांतराने तिला तीन मुली झाल्या. विनीताला तीन मुलगे झाले. पण ते वचन पाळायची वेळ येण्याआधीच असे काही घडले, की त्यांच्या सगळ्या आशांवर सावट आले. पशुपती सेट्टी वारला. त्याने पुष्कळ लोकांचे कर्ज घेतले होते. ते लोक पैशासाठी तगादा लावू लागले. कर्ज फेडायला सगळी मालमत्ता विकावी लागली. वडील गेल्यावर महिना-दोन महिन्यांतच विनीताजवळ एक पैसाही उरला नाही. पण तो समजूतदार माणूस होता. त्याने हे दुर्दैव शांतपणे सोसले. जे थोडेफार उरले होते, त्यावर प्रामाणिकपणे जगण्याचा त्याने पुरेपूर प्रयत्न केला. भाऊ किती गरीब झाला, ते गर्वीने पाहिले. आणि ते वचन तिला सलू लागले. आपल्या मुली भावाच्या मुलांना द्याव्यात, की देऊ नयेत? कितीतरी महिने ती मनात हाच विचार करत राहिली. शेवटी तिने ठरवले, आपल्या मुलींना गरीब नवरे कधीच द्यायचे नाहीत. योगायोगाने चांगल्या घराण्यातल्या दोन तरुण व्यापाऱ्यांनी तिच्या दोन थोरल्या मुलींना मागणी घातली. तिने आनंदाने होकार दिला आणि त्यांची लग्ने लावून दिली. आता फक्त धाकटी मुलगी, सुगुणी, अविवाहित उरली.
दिवा तिथे लक्ष्मी
सुगुणीचा निर्णय
विनीताला फार दुःख झाले. आपण गरीब झालो म्हणून बहीण आपल्याला कमी लेखील, असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. पण तो समजूतदार होता. त्याने मध्ये पडायचे टाळले. एक शब्दही काढला नाही. तरी दोघांनी लहानपणी दिलेले वचन सगळ्यांना ठाऊक होते. काही लोक त्याचे सांत्वन करायला आले. काही गर्वीला दोष देऊ लागले. भाऊ स्वतःच्या काही चुकीमुळे गरीब झाला नव्हता. तरी केवळ त्याच्या गरिबीमुळे तिने आपले वचन मोडले! हे बोलणे सुगुणीच्या कानावर गेले. ती शिकलेली आणि समजूतदार मुलगी होती. विनीतमामा तिला नेहमी फार सौजन्याने आणि आदराने वागताना दिसले होते. त्यांचे तिन्ही मुलगे चांगले आणि प्रेमळ होते. टिकत नाही अशा पैशासाठी आईने हे दुर्मिळ गुण विसरावेत, याचे तिला फार वाईट वाटले. मुलीने आपला नवरा स्वतः निवडणे फार अयोग्य समजले जाई. तरीसुद्धा ती आईकडे गेली. “आई,” ती म्हणाली, “तुझ्या आणि मामाच्या वचनाची सगळी हकिगत मी ऐकली आहे. आम्हा तिघी बहिणींची लग्ने मामाच्या मुलांशी, आमच्या मामेभावांशी, लावायची, असे तुम्ही ठरवले होते. माझ्या बहिणींच्या बाबतीत तू ते वचन काही कारण नसताना मोडलेस. मला त्याची लाज वाटते. ती लाज मला सहन होत नाही. माझ्या तीन मामेभावांपैकी एकाशीच मी लग्न करीन. जगात दुसऱ्या कोणाशीही नाही. तुला परवानगी द्यावीच लागेल.” धाकटी मुलगी असे बोलते आहे, हे ऐकून गर्वी थक्क झाली. “भिकाऱ्याशी लग्न करायचे आहे तुला?” ती म्हणाली. “आम्ही कधीच कबूल होणार नाही. तू हट्टच धरलास, तर तुला त्या कफल्लक भिकाऱ्याला देऊन टाकू. पण पुन्हा तुझे तोंड कधी पाहणार नाही.”
दिवा तिथे लक्ष्मी
धाकटी सून
पण सुगुणी ऐकेना. म्हणून विनीताच्या धाकट्या मुलाशी तिचे लग्न ठरले. विनीताने वचनाबद्दल बहिणीकडे कधी एक शब्दही काढला नव्हता. पण बहिणीच्या सगळ्या मुलींची लग्ने होईपर्यंत त्याने आपल्या मुलांसाठी मुली पाहिल्या नव्हत्या. सुगुणीला आपल्या धाकट्या मुलाशीच लग्न करायचे आहे, हे ऐकून त्याला फार आनंद झाला. मग थोरल्या दोन मुलांसाठी त्याने एका गरीब घरातल्या दोन मुली पसंत केल्या. आपल्या ऐपतीप्रमाणे, जमेल तशी त्याने तिन्ही लग्ने लावली. सुगुणीचे वागणेही तिच्या गरीब मामेभावावरच्या प्रेमासारखेच थोर होते. श्रीमंत घरातून आली म्हणून ती कधी गर्वाने किंवा उद्धटपणे वागली नाही. नवऱ्याचा, दिरांचा किंवा सासऱ्यांचा तिने कधी अपमान केला नाही. रोज सकाळी विनीत आणि त्याचे मुलगे वाळलेली पाने गोळा करायला जात. तिघी सुना त्यांच्या पत्रावळी शिवत. पुरुष त्या बाजारात विकत. एकेका पत्रावळीला सुमारे चार पणम मिळत, कधी जास्त, कधी कमी. पणम हे एक लहानसे नाणे होते. सासरे जे पैसे घरी आणत, ते सुना त्या दिवसाच्या गरजांवर खर्च करत. सुगुणी फार काटकसरीने आणि शहाणपणाने खर्च करी. सासऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना ती पोटभर खायला घाली. जे उरेल, ते दोघी जावांबरोबर वाटून घेई. ती अगदी समाधानी होती. सगळे घर तिला गुणांची खाण मानून तिचा आदर करी. आईवडिलांनी आपली धमकी खरी केली. एकेकाळी एवढी लाडकी असलेली धाकटी मुलगी सासरी कशी आहे, ते पाहायला ते एकदाही आले नाहीत. अशी दोनएक वर्षे गेली.
दिवा तिथे लक्ष्मी
राजाची अंगठी
एके दिवशी त्या गावचा राजा तेल लावून अंघोळ करत होता. त्याने बोटातली अंगठी काढली आणि उघड्या चौकातल्या एका कोनाड्यात ठेवली. त्याच वेळी वर आकाशात एक घार घिरट्या घालत होती. अंगठीतली चमचमणारी माणके तिला मांसाचे तुकडे वाटली. तिने झडप घालून अंगठी उचलली आणि उडून गेली. ते मांस नाही, हे लक्षात आल्यावर तिने ती अंगठी खाली टाकली. ती पडली सुगुणीच्या नवऱ्याच्या घराच्या अंगणात. सुगुणी नेमकी तेव्हा तिथे एकटीच काम करत होती. जावा आणि बाकीचे घराच्या दुसऱ्या भागात होते. तिने ती चमचमती अंगठी उचलली आणि पदरात लपवली. थोड्याच वेळात रस्त्यावर दवंडी ऐकू आली. राजाची एक मौल्यवान अंगठी हरवली होती. जो ती शोधून राजाला परत देईल, त्याला मोठे बक्षीस मिळणार होते. सुगुणीने नवऱ्याला आणि दिरांना बोलावले. “स्वामी, आणि भाऊजी,” ती म्हणाली, “राजाची अंगठी माझ्याजवळ आहे. बरोबर भर दुपारी एका घारीने ती आपल्या अंगणात टाकली. ही पाहा. आपण सगळे राजाकडे जाऊ. तिथे तुम्हा तिघांसमोर मी ती अंगठी राजाला देईन. ती मला कशी मिळाली, तेही सांगेन. राजाने बक्षीस मागायला सांगितले, की मी ते मागेन. मी मागितलेले तुम्हाला फार क्षुल्लक वाटले, तरी कृपा करून मला मध्ये अडवू नका.” दिरांनी ते मान्य केले. सगळे राजवाड्याकडे निघाले. त्यांना सुगुणीबद्दल फार आदर होता. राजाकडे जाण्यातून काहीतरी चांगलेच होईल, अशी त्यांना आशा होती.
दिवा तिथे लक्ष्मी
गावात एकही दिवा नाही
राजवाड्यात त्यांनी अंगठी परत दिली. ती कशी सापडली, ते राजाला सांगितले. सुगुणीची नम्रता आणि प्रामाणिकपणा पाहून राजा खूश झाला. त्याने तिला बक्षीस मागायला सांगितले. त्या काळी लोक राजाशी जसे नम्रपणे बोलत, तसे ती बोलली. “परम कृपाळू महाराज, राजाधिराज, सार्वभौम स्वामी! आपल्या पायाशी असलेली ही कुत्र्यासमान दासी एवढीच छोटीशी कृपा मागते. एका शुक्रवारी रात्री गावातले सगळे दिवे विझवावेत. राजवाड्यातसुद्धा एकही दिवा लावू नये. फक्त या आपल्या कुत्र्यासमान दासीचे घर उजळलेले असावे, तिला परवडतील तेवढ्या दिव्यांनी.” “मान्य आहे, अतिशय नम्र बाई,” राजा म्हणाला. “आम्ही तुमची मागणी मान्य करतो. येत्या शुक्रवारीच तुम्हाला हा मान मिळेल.” सुगुणीने राजाला वाकून नमस्कार केला. आनंदाने ती नवऱ्याबरोबर आणि बाकीच्यांबरोबर घरी आली. मग तिच्याकडे उरलेला शेवटचा दागिना तिने गहाण ठेवला आणि थोडे पैसे उभे केले. शुक्रवार उजाडला. सुगुणीने दिवसभर उपवास केला. तिन्हीसांजेला तिने दोघा दिरांना बोलावले. “भाऊजी,” ती म्हणाली, “आज रात्री मी आपले घर हजार दिव्यांनी उजळणार आहे. तुमच्यापैकी एकाने पुढच्या दारावर पहारा द्यायचा, दुसऱ्याने मागच्या. क्षणभरही डोळा लागू देऊ नका. एखादी देखणी, राणीसारखी रुबाबदार बाई आत यायला मागेल, तर आधी कधीही इथून न जाण्याची शपथ घेतली, तरच तिला आत येऊ द्या. कोणी बाई बाहेर जायला मागेल, तर पुन्हा कधीही परत न येण्याची शपथ घेतली, तरच तिला जाऊ द्या.” दिरांना हे सगळे हास्यास्पद वाटले. पण त्यांनी तिच्या मनासारखे करू दिले आणि काय होते ते पाहत शांतपणे वाट पाहू लागले.
दिवा तिथे लक्ष्मी
अष्टलक्ष्मी
त्या रात्री सुगुणीचे घर सोडून सगळे गाव अंधारात बुडाले होते. राजाच्या हुकमामुळे दुसऱ्या कोणत्याही घरात दिवा लागला नव्हता. त्या रात्री अष्टलक्ष्मी गावात आल्या. त्या सुखसमृद्धीच्या आठ देवता. प्रत्येक रस्त्याने त्या घराघरात फिरल्या. सगळी घरे अंधारी होती. उजळलेले घर एकच, सुगुणीचे. त्या आत जाऊ लागल्या. पण दारावरच्या दिराने त्यांना अडवले आणि शपथ घ्यायला सांगितले. त्यांनी शपथ घेतली. या बायका म्हणजे अष्टलक्ष्मी आहेत, हे त्याच्या लक्षात आले. तेव्हा भावजयीच्या शहाणपणाचे त्याला फार कौतुक वाटले. त्या आठ जणी आत गेल्या, आणि क्षणातच घरातून एक कुरूप बाई बाहेर आली. मला जाऊ द्या, असे ती म्हणू लागली. कधीही परत न येण्याची शपथ घेईपर्यंत मागच्या दारावरच्या दिराने तिला जाऊ दिले नाही. तिने गंभीरपणे शपथ घेतली. पुढच्याच क्षणी ती कोण आहे, ते त्याला कळले. ती होती मूदेवी. दारिद्र्याची देवी, लक्ष्मीची थोरली बहीण. कारण ती म्हणाली, “माझ्या बहिणी आल्या आहेत. आता मी इथे क्षणभरही थांबू शकत नाही. देव तुमचे आणि तुमच्या माणसांचे भले करो. जे जे पवित्र आहे, त्याची शपथ घेऊन सांगते, मी पुन्हा कधी परत येणार नाही.” तिथे तिचा श्वासच कोंडू लागला. म्हणून मूदेवी पळून गेली. सकाळ झाली, तेव्हा अष्टलक्ष्मी त्या घरात कायमच्या वस्तीला आल्या होत्या. तांदळाचे पोते भरलेले होते. पैशांची पेटी ओसंडून वाहत होती. भांड्यात दूध होते. त्या दिवसापासून सुगुणीच्या घरात सुबत्ता नांदू लागली. तिने आपले दारिद्र्य कायमचे घालवले, म्हणून नवरा, दीर आणि सासरे आनंदून गेले. सुगुणीच्या आईवडिलांनाही आपला गर्व आड आला नाही. ते मुलीकडे येऊन तिची क्षमा मागू लागले. तिने त्यांना क्षमा केली. आणि आपल्या सगळ्या माणसांबरोबर ती सुखासमाधानात खूप वर्षे जगली. म्हणूनच सनातनी हिंदू मानतात, घरात दिवा असला की लक्ष्मी येते, आणि अंधार असला की दारिद्र्य येते. श्रीमती हॉवर्ड किंग्जकोट आणि पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १८९० मध्ये दक्षिण भारतातल्या लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. त्यातल्या सतराव्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे. “दीपम लक्ष्मीकरम,” म्हणजे “दिवा लक्ष्मी आणतो,” या तमिळ म्हणीमागची ही गोष्ट आहे.