सूर्याच्या कथा आणि इतर लोककथा
गाढव झालेली सासू
देवीचा आंबा
तमिळमध्ये एक म्हण आहे, “वरा वरा मामी कलुदै पोल अनल.” म्हणजे, “हळूहळू सासू गाढव झाली.” कोणी दिवसेंदिवस खाली घसरत चालला, अभ्यासात असो, हुद्द्यात असो की आयुष्यात, तर तमिळ लोक असे म्हणतात. या म्हणीमागची ही गोष्ट. एका गावात एक ब्राह्मण राहत होता. घरात त्याची बायको, त्याची स्वतःची आई आणि बायकोची आई होती. ब्राह्मण फार भला होता. तिघींशीही तो प्रेमाने वागे. पण बायको फार तापट होती. सासूला ती दिवसभर कुठल्या ना कुठल्या कामाला जुंपून ठेवी. आणि संध्याकाळी तिला अगदी थोडेसे खायला देई. बिचारी म्हातारी दुःखाने अर्धमेली झाली होती. बायकोच्या स्वतःच्या आईची मात्र खूप बडदास्त ठेवली जाई, हे सांगायला नकोच. नवरा बायकोच्या एवढा मुठीत होता, की आईची बाजू घ्यायची ताकदच त्याच्यात नव्हती. एकदा संध्याकाळी, सूर्य मावळायच्या जरा आधी, बायकोने सासूला एवढ्या रागाने शिव्या दिल्या, की मार चुकवायला म्हातारीला पळून जावे लागले. हताश होऊन ती गावाबाहेर पळाली. रात्र झपाट्याने पडत होती. म्हणून रात्र काढायला ती एका पडक्या देवळात शिरली. ते गावदेवी कालीचे घर होते. रोज मध्यरात्री देवी बाहेर पडत आणि आपल्या गावावर नजर फिरवत. त्या रात्री देवींना त्यांच्या देवळाच्या आवारात ती म्हातारी दिसली. काली देवी फार दयाळू होत्या. “एवढ्या अंधाऱ्या रात्री घर सोडून आलीस, असे कोणते दुःख आहे तुला?” असे त्यांनी विचारले. म्हातारीने थोडक्यात आपली कहाणी सांगितली. ती बोलत असताना, हे खरे आहे का, ते देवींनी आपल्या शक्तीने पाहिले. ते खरेच होते. “आई, मला तुझी दया येते,” काली देवी प्रेमाने म्हणाल्या. “आता तू म्हातारी झालीस, अंगात त्राण उरले नाही, म्हणून सून तुला छळते. हा आंबा घे.” कमरेला खोचलेला एक पिकलेला आंबा काढून त्यांनी हसत तिच्या हातात दिला. “हा खा. म्हणजे लवकरच तू तिच्यासारखी तरुण होशील. मग ती तुला त्रास देणार नाही.” एवढे बोलून देवी निघून गेल्या.
गाढव झालेली सासू
पुन्हा तरुण
उरलेली रात्र म्हातारी देवळातच राहिली. तिचा मुलावर फार जीव होता. त्याला थोडा न देता सगळा आंबा एकटीने खायचा, हे तिच्या मनाला पटेना. त्या संध्याकाळी मुलगा घरी आला, तेव्हा आई घरात नव्हती. बायकोने नेहमीप्रमाणे सगळा दोष म्हातारीवर ढकलून काहीतरी सांगितले. शोधायला फार अंधार होता. म्हणून तो उजाडायची वाट पाहत थांबला. पहाटे तो निघाला. थोडे अंतर जातो न जातो, तोच कालीच्या देवळात त्याला आई दिसली. त्याला फार आनंद झाला. “आई, एवढी थंडीची रात्र कशी काढलीस?” तो म्हणाला. “काय खाल्लेस? मी किती अभागी! असल्या कुत्रीशी लग्न केले! तिचे सगळे दोष विसर आणि घरी चल.” आई आनंदाने आणि दुःखानेही रडली. रात्री काय घडले, ते तिने त्याला सांगितले. आंब्यातला थोडा त्याला देऊ केला. “क्षणभरही थांबू नकोस,” तो म्हणाला. “आत्ताच्या आत्ता तो आंबा खा. मला त्यातले काहीही नको. तू तरुण होऊन त्या दुष्ट कुत्रीला तोंड देण्याइतकी खंबीर झालीस, की मला बाकी काही नको.” मग आईने सगळा आंबा खाल्ला. मुलाने तिला खांद्यावर घेतले आणि घरापर्यंत वाहून आणले. तिथे त्याने तिला जमिनीवर उतरवले. पाहतो तो काय, ती आता म्हातारी राहिली नव्हती! ती सोळा वर्षांची मुलगी झाली होती. आणि बायकोपेक्षाही ताकदवान होती. आता बायकोला तिच्यावर दादागिरी करता येईना. सासूपुढे तिचे काही चालेना.
गाढव झालेली सासू
दुसरा आंबा
बायकोला हा बदल मुळीच आवडला नाही. कारण आता तिला आपली दादागिरी सोडावी लागली होती. तिने विचार केला, “ती दळभद्री सासू कालीच्या आंब्याने तरुण झाली. मग माझी आई का तरुण होऊ नये? तिला काय बोलायचे ते शिकवते आणि त्याच देवळात पाठवते.” तिने आईला सांगायची गोष्ट पढवली आणि तिला पाठवून दिले. मध्यरात्री बायकोच्या आईला देवी भेटल्या. तिने देवींना खोटे सांगितले. “माझी सून मला फार वाईट वागवते,” ती म्हणाली. खरे तर तिला तक्रार करण्यासारखे काहीच नव्हते. आपल्या दिव्य शक्तीने कालीने ते खोटे ओळखले. त्यामागचा बायकोचा दुष्ट डावही त्यांनी ओळखला. पण दया आल्याचे दाखवून त्यांनी तिलाही एक फळ दिले. बायकोने आईला बजावले होते, “सकाळी जावई दिसेपर्यंत फळ खाऊ नकोस.” पहाटे बायकोने नवऱ्याला हुकूम सोडला. तो तर तिच्या ताटाखालचे मांजरच होता. “आपल्या आईला आणलेस, तसे माझ्या आईलाही देवळातून घेऊन ये.” तो गेला आणि आपल्या सासूला घरी चलायला सांगितले. मुलीने शिकवल्याप्रमाणे तिने त्याला फळातला थोडा भाग खायला सांगितला. पण त्याने नाही म्हटले. मग तिने सगळे फळ गिळून टाकले. घरी पोहोचेपर्यंत आपण तरुण होऊ, असे तिला वाटत होते. त्याने तिला खांद्यावर घेतले आणि निघाला. आपली आई झाली तशी हीसुद्धा तरुण होईल, असे त्याला वाटत होते. अर्ध्या वाटेत बदल पाहायला त्याला धीर धरवेना. त्याने मान वळवून पाहिले. ओझ्याचा जो भाग दिसत होता, तो गाढवासारखा दिसत होता. पण त्याला वाटले, तरुण होण्याची ही पहिली पायरी असेल! त्याने पुन्हा पुन्हा मान वळवली. प्रत्येक वेळी तेच दिसले. जितके तो पाही, तितके ते ओझे जास्तच गाढव होत गेले. शेवटी तो घरी पोहोचला, तेव्हा ते खांद्यावरून खाली उडी मारून गाढवासारखे ओरडत पळून गेले. अशा रीतीने खोटे बोलणाऱ्या आईला गाढव करून कालीने बायकोचा दुष्ट डाव उधळून लावला. आणि ती जावयाच्या खांद्यावरून खाली उडी मारेपर्यंत कोणालाच ते कळले नाही. म्हणूनच तमिळ लोक म्हणतात, “वरा वरा मामी कलुदै पोल अनल,” म्हणजे “हळूहळू सासू गाढव झाली.” आणि बरेच जण पुढे जोडतात, “ऊर वरुम्बोदु उलैयिड तलैप्पट्टाल,” म्हणजे “गाव जवळ येता येता ती गाढवासारखी ओरडू लागली.” श्रीमती हॉवर्ड किंग्जकोट आणि पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १८९० मध्ये दक्षिण भारतातल्या लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. त्यातल्या आठव्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.