सूर्याच्या कथा आणि इतर लोककथा
गर्वाचे घर खाली
रानातले दहा व्यापारी
तमिळमध्ये एक म्हण आहे, “अहंभावम अलै अलिक्कुम.” म्हणजे “गर्व माणसाचा नाश करतो.” आपल्याकडेही म्हणतात, गर्वाचे घर खाली. ही म्हण समजावून सांगायला साधी माणसे ही गोष्ट सांगतात. एका गावात कापडाचे दहा व्यापारी राहत होते. ते नेहमी बरोबरच फिरत. एकदा ते लांबचा प्रवास करून परत येत होते. माल विकून त्यांनी भरपूर पैसा कमावला होता. गावाजवळ एक दाट रान होते. एके दिवशी भल्या पहाटे ते त्या रानात पोहोचले. त्या रानात तीन नामचीन चोर राहत होते. पण व्यापाऱ्यांनी त्यांचे नावही ऐकले नव्हते. व्यापारी रानाच्या मधोमध आले, आणि ते तिघे हातात तलवारी आणि सोटे घेऊन समोर उभे ठाकले. “जे असेल ते सगळे खाली ठेवा,” त्यांनी हुकूम सोडला. व्यापाऱ्यांकडे शस्त्र नव्हते. संख्येने ते कितीतरी जास्त होते, तरी त्यांना शरण जावे लागले. चोरांनी सगळे लुटले. अंगावरचे कपडेसुद्धा काढून घेतले. प्रत्येकाला फक्त एक लंगोटी ठेवली. वीतभर रुंद आणि हातभर लांब. आता चोर गर्वाने अगदी फुगून गेले. दहा माणसांना हरवले होते! त्यांचे सगळे लुटले होते! लुटलेल्या माणसांपुढे ते तिघे जणू तीन राजे सिंहासनावर बसावेत तसे ऐटीत बसले. आणि हुकूम सोडला, “घरी जाण्याआधी आमच्यापुढे नाचून दाखवा.” व्यापारी आपल्या नशिबाला रडत होते. लंगोटी सोडून सगळे गेले होते. तरी चोरांचे समाधान झाले नव्हते. आता नाचायचेसुद्धा!
गर्वाचे घर खाली
सांकेतिक गाणे
पण त्या दहांपैकी एक व्यापारी फार हुशार होता. त्याने विचार केला. आपण कसल्या संकटात सापडलो आहोत, कसला नाच नाचायचा आहे, आणि ते तीन चोर गवतावर कसे ऐटीत बसले आहेत. त्याने आणखी एक गोष्ट हेरली. चोरांनी आपली शस्त्रे जमिनीवर ठेवली होती. व्यापारी इतके घाबरले आहेत, ते काही करणार नाहीत, अशी त्यांना खात्री होती. म्हणून नाचाचे पुढारपण त्याने घेतले. अशा नाचात पुढारी नेहमी गाणे म्हणतो. बाकीचे हातपाय हलवून ताल धरतात. व्यापाऱ्यांची एक रीत असते. गिऱ्हाइकासमोर दोन व्यापाऱ्यांना किमतीबद्दल बोलायचे असले, की ते एक सांकेतिक भाषा वापरतात. एक विचारतो, “या कापडाची किंमत काय?” दुसरा सांगतो, “पुली रुपये.” म्हणजे दहा रुपये. व्यापाऱ्यांचे हे शब्द ठाऊक नसतील, तर गिऱ्हाइकाला काहीच कळत नाही. या भाषेत पुली म्हणजे दहा. तिरु म्हणजे तीन. आणि सावन, किंवा थोडक्यात सा, म्हणजे एक. पुढारी गाऊ लागला, आणि बाकीचे नाचू लागले. “आपण पुली जण, ते तिरु जण. / एकेका सा भोवती तिरु जण, / बांधायला उरला सा जण. / ता, तै, तोम, तडिंगणा!” ता, तै, तोम, तडिंगणा हे नुसते नाचाचे बोल होते. बाकीच्या गाण्याचा अर्थ असा: “आपण पुली, म्हणजे दहा. ते तिरु, म्हणजे तीन. प्रत्येक सा भोवती, म्हणजे एकेका चोराभोवती, आपले तिरु, म्हणजे तिघे. असे त्यांना दाबून धरायला आपले नऊ जण. उरला सा, म्हणजे एक जण. तो त्यांचे हातपाय बांधील.”
गर्वाचे घर खाली
तांदळाची तीन पोती
चोर काही शिकलेले नव्हते. त्यांना वाटले, पुढारी नेहमीचेच एखादे गाणे गातो आहे. तसे पाहिले तर ते गाणेच होते! नाचणारे चोरांपासून थोडे लांबून नाचायला लागले होते. पुढाऱ्याने दोनदा पूर्ण गाणे म्हटले. त्यानंतरच नाचणारे हळूहळू जवळ सरकू लागले. बाकीच्या व्यापाऱ्यांना त्याचा अर्थ नीट कळला होता. पण धंद्याबाहेरचा कोणी, मग तो कितीही विद्वान असो, त्याला हे गाणे कोडेच वाटले असते. ते तीन चोर विजयाच्या गर्वात बसले होते. पान आणि तंबाखू चघळत होते. गाण्याचा अर्थ काय, नाचणारे काय करणार आहेत, याची त्यांना कल्पनाही नव्हती. मग गाणे तिसऱ्यांदा सुरू झाले. “ता, तै, तोम” गाणाऱ्याच्या तोंडातून बाहेर पडले. आणि “तडिंगणा” पुरते बाहेर पडायच्या आतच व्यापारी तिघातिघांच्या टोळ्यांत विभागले. प्रत्येक टोळी एकेका चोरावर तुटून पडली. दहावा होता पुढारी स्वतः. शेवटचे काम बाकीच्या नऊ जणांनी त्याच्यावर सोडले होते. त्याने सहा हात लांबीचे एक मोठे कापड फाडून त्याच्या लांब अरुंद पट्ट्या केल्या. आणि चोरांचे हातपाय बांधले. आता चोरांचा गर्व पार उतरला. ते तांदळाच्या तीन पोत्यांसारखे जमिनीवर लोळत पडले! आपले होते ते सगळे दहा व्यापाऱ्यांनी परत घेतले. चोरांच्या तलवारी आणि सोटे स्वतः हातात घेतले. गावी पोहोचल्यावर ते आपल्या मित्रांना, नातेवाइकांना कितीतरी वेळा ही हकिगत सांगत. ती ऐकून सगळ्यांची चांगलीच करमणूक होई. श्रीमती हॉवर्ड किंग्जकोट आणि पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १८९० मध्ये दक्षिण भारतातल्या लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. त्यातल्या पंधराव्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे. “अहंभावम अलै अलिक्कुम,” म्हणजे “गर्व माणसाचा नाश करतो,” या तमिळ म्हणीमागची ही गोष्ट आहे.