सूर्याच्या कथा आणि इतर लोककथा
जे होते ते भल्यासाठीच
तुटलेले बोट
एका देशात एक राजा होता. त्याचा प्रधान जरा वेगळाच होता. राजाने काहीही विचारले, तरी प्रधानाचे उत्तर एकच असे, “जे होते ते भल्यासाठीच.” एके दिवशी एक धारदार हत्यार हाताळताना राजाचे एक बोट तुटले. त्याने प्रधानाला बोलावले आणि हात दाखवला. “बघ, केवढे संकट आले माझ्यावर,” तो दुःखाने म्हणाला. “माझे एक बोट गेले.” प्रधानाने शांतपणे एवढेच उत्तर दिले, “जे होते ते भल्यासाठीच.” राजा संतापला. “दुष्टा! बोट तुटले ते भल्यासाठी, असे म्हणायची तुझी हिंमत कशी झाली? तुझे हे मूर्ख पालुपद तुला कुठे नेते, ते आता बघशीलच. वीस वर्षे तुरुंगात राहशील!” पण प्रधान पुन्हा एवढेच म्हणाला, “जे होते ते भल्यासाठीच.” “काय हा उद्धटपणा!” असे ओरडून राजाने त्याला तुरुंगात पाठवले. प्रधानाला कोठडीत डांबले. दुसऱ्या दिवशी राजा रानात शिकारीला गेला. एरवी तो प्रधानाला नेहमी बरोबर नेई. पण आता प्रधान तुरुंगात होता. म्हणून राजाला एकट्यानेच जावे लागले. लांबच्या, दमवणाऱ्या शिकारीनंतर तो जरा झोप काढायला एका झाडाखाली आडवा झाला. हिंदू मानतात, ज्या माणसाचा एखादा अवयव कमी आहे, त्याला सिंह खात नाही. थोड्याच वेळात राजाला सिंहाची गर्जना ऐकू आली. पशूंच्या राजाने माणसांच्या राजाला पाहिले होते आणि आपले भक्ष्य म्हणून निवडले होते. आता आपण मेलोच, असे राजाला वाटले, आणि तो बेशुद्ध पडला.
जे होते ते भल्यासाठीच
सिंह निघून जातो
सिंह जवळ आला. बेशुद्ध राजाला त्याने नीट न्याहाळले. एक बोट नसलेला हात त्याने पाहिला, आणि तो राजाला सोडून निघून गेला. अवयव कमी असलेला राजा सिंहाचे भक्ष्य होऊ शकत नव्हता. राजा शुद्धीवर आला, तेव्हा त्याच्या मनात आले, “माझा चांगला प्रधान बरोबर बोलत होता. पण मी फक्त स्वतःचा विचार केला. त्याच्या बोलण्याचा उलटा अर्थ घेतला आणि त्याला तुरुंगात टाकले. ते बोट तुटले नसते, तर सिंहाने मला खाऊन टाकले असते. म्हणजे माझे नुकसान माझ्या भल्याचेच ठरले. पण तो तुरुंगात आहे, त्यात कसले भले? त्याला काय म्हणायचे होते, ते त्याच्याच तोंडून ऐकून घेतो.” म्हणून राजा परत आला. प्रधानाला सोडून आपल्यापुढे आणायचा त्याने लगेच हुकूम दिला. मग सिंहाची सगळी हकिगत त्याला सांगितली. प्रधानाचे शब्द आतापर्यंत कसे खरे ठरले, तेही सांगितले. “पण तुला तुरुंगात पाठवले, ते भल्यासाठी कसे?” राजाने विचारले. “महाराज,” प्रधान म्हणाला, “मी तुरुंगात नसतो, तर आपल्याबरोबर रानात आलो असतो. अवयव कमी म्हणून सिंहाने आपल्याला सोडले असते आणि माझी मेजवानी केली असती. मी मेलो असतो. म्हणून माझा तुरुंगातला दिवससुद्धा भल्यासाठीच होता.” हे उत्तर ऐकून राजा फार खूश झाला. त्याचा आपल्या प्रधानावरचा विश्वास आणखीच वाढला. पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी दक्षिण भारतातल्या लोककथा मुंबईच्या एका इंग्रजी मासिकात मालिकेने प्रसिद्ध केल्या. डिसेंबर १८८८ च्या अंकातल्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.