सूर्याच्या कथा आणि इतर लोककथा
लक्ष्मी असेपर्यंत
ऋषींकडे पाहुणी
कोणत्याही शहरापासून दूर, एका निर्जन रानात एक संन्यासी राहत होते. तिथे क्वचितच कोणी फिरकत असे. ते ऋषी होते. त्यांनी फार पूर्वीच संसार सोडला होता. ध्यान करण्याखेरीज ते फारसे काही करत नसत. एके दिवशी लक्ष्मी त्यांच्यापुढे येऊन उभ्या राहिल्या. “महाराज,” त्या म्हणाल्या, “मी आपल्या ठायी राज्य करायला आले आहे.” म्हणजे यापुढे भाग्य त्यांच्यात वस्ती करणार होते आणि त्यांचे आयुष्य चालवणार होते. ऋषींनी विचारले, “आपण कोण?” देवींनी सांगितले, “मी लक्ष्मी.” मग ऋषी म्हणाले, “मला आपला काय उपयोग? मी तर संसार सोडला आहे.” “काही काळ मला आपल्यापाशी राहावेच लागेल,” देवी म्हणाल्या. “आपल्या नशिबातच तसे लिहिले आहे. म्हणून माझा स्वीकार करा.” “तसे असेल, तर ठीक,” ऋषी म्हणाले. “येण्याआधी आपण मला सांगितलेत. तसेच जाण्याआधीही सांगायचे. माझ्यापाशी राहण्याचा आपला काळ संपेल, तेव्हा.” जाण्याआधी सांगेन, असे देवींनी कबूल केले. आणि त्या ऋषींच्या ठायी राहिल्या.
लक्ष्मी असेपर्यंत
मुकुट आणि छप्पर
देवी खरे बोलल्या की नाही, ते ऋषींना पाहायचे होते. म्हणून ते लगेच जवळच्या शहरात गेले. राजा दरबारात बसला होता. भोवती मंत्री आणि अधिकारी होते. ऋषी सरळ राजापाशी गेले. त्यांनी उजवा पाय उचलला आणि राजाच्या डोक्यावर लाथ मारली. “कापून काढा त्या उद्धट माणसाला!” अनेक जण ओरडले. पण त्याच क्षणी खाली पडलेल्या मुकुटाखाली सर्वांना एक नाग दिसला. त्याने फणा काढला होता. ऋषींना वाचवायला खुद्द लक्ष्मीदेवींनीच ते रूप घेतले होते. हा चमत्कार पाहून दरबारातले सगळे म्हणू लागले, “हे थोर त्रिकालज्ञ ऋषी आहेत! भूत, वर्तमान आणि भविष्य, यांना सगळे कळते. राजाच्या मुकुटात साप लपला आहे, हे यांनी पाहिले. म्हणून मुकुट लाथेने खाली पाडला.” आपला जीव वाचला, म्हणून राजा फार खूश झाला. त्याने लगेच ऋषींना आपला प्रधान केले आणि सगळे अधिकार दिले. लक्ष्मी अजून त्यांच्या ठायी राज्य करत होत्या. त्यामुळे ऋषींनी आपले काम फार चांगले केले. दोन वर्षे गेली. मग लक्ष्मी अजून आपल्यापाशी आहेत की नाहीत, हे ऋषींना पुन्हा जाणून घ्यावेसे वाटले. जाण्याआधी सांगेन, असे देवींनी वचन दिले होते. तरी त्यांना परीक्षा घ्यायचीच होती. म्हणून एका मध्यरात्री ते राजवाड्याच्या अंतःपुरात गेले. पहारेकरी आपापल्या जागी उभे होते. पण हे प्रधान होते. त्यांना अडवायची पहारेकऱ्यांची हिंमत झाली नाही. राजा राणीबरोबर झोपला होता, त्या खोलीत ते सरळ शिरले. त्यांनी दोघांना धरले आणि झोपेतच खोलीबाहेर ओढू लागले. अर्थात दोघेही जागे झाले. असा उद्धटपणा पाहून त्यांना फार राग आला. पण प्रधानांच्या पकडीतून त्यांना सुटता येईना. आणि तेवढ्यात त्यांच्या डोळ्यांदेखत शयनगृहाचे छप्पर एकाएकी कोसळले. सगळे थक्क झाले. पुन्हा एकदा सगळे लोक प्रधानांची स्तुती करू लागले, “हे त्रिकालज्ञ आहेत!” त्या दिवसापासून राजाचा आपल्या प्रधानांवर सगळ्यांपेक्षा जास्त विश्वास बसला. राज्यातल्या सगळ्या लोकांचाही.
लक्ष्मी असेपर्यंत
वडावरचा पक्षी
वर्षभराने प्रधान राजाबरोबर शिकारीला गेले. मोठा लवाजमा बरोबर होता. लांबच्या पाठलागाच्या शेवटी एकाएकी एक हरीण पुढे आले. त्याच्यामागे लागून राजा आणि प्रधान बाकीच्यांपासून दूर गेले. बराच लांबवर पाठलाग केला, पण हरीण हाती लागले नाही. घनदाट जंगलात दोघे एकटेच उरले. सूर्य अगदी डोक्यावर आला होता. ऊन रणरणत होते. राजा थकून गेला होता. “हरणाचा नाद सोडू. थोडा वेळ विसावा घेऊ आणि मग आपल्या लोकांकडे परत जाऊ,” असे तो म्हणाला. प्रधानांनी होकार दिला. दोघे घोड्यांवरून उतरले. घोड्यांना गवत-पाणी शोधायला मोकळे सोडले. मग ते एका मोठ्या वडाच्या सावलीत बसले. जवळच एक स्वच्छ ओढा होता. त्याचे पाणी ते प्याले. राजाने प्रधानांना मांडी घालून बसायला सांगितले. त्यांच्या उजव्या मांडीवर डोके ठेवून त्याला आरामात झोपायचे होते. थोड्याच वेळात राजा घोरू लागला. तेवढ्यात एक मोठा गरुड, पक्ष्यांचा राजा, राजाच्या डोक्यावरच्या फांदीवर येऊन बसला. एका मोठ्या वारुळातून त्याने एक विषारी साप आणला होता. आणि आता तो त्या सापाला खाऊ लागला. सापाच्या विषाचा एक थेंब राजाच्या गळ्यावर पडला.
लक्ष्मी असेपर्यंत
गळ्याला सुरी
प्रधानांनी ते पाहिले. विष कातडीतून आत जाईल आणि राजा मरेल, अशी त्यांना भीती वाटली. त्यांच्याजवळ एक लहान सुरी होती. तो विषारी थेंब हलक्या हाताने काढावा, म्हणून त्यांनी ती बाहेर काढली. त्याच क्षणी, दिलेल्या वचनाप्रमाणे, लक्ष्मीदेवी त्यांच्यापुढे उभ्या राहिल्या आणि जायची परवानगी मागू लागल्या. प्रधानांनी त्यांना जाऊ दिले. आणि त्यांनी सुरी राजाच्या गळ्याला लावली. राजा एकदम जागा झाला. पाहतो तो प्रधानांनी त्याच्या गळ्याला सुरी लावलेली! तो त्यांना दगाबाज म्हणू लागला. “महाराज, आपल्याला मारायचेच असते, तर मी कधीच मारले असते,” प्रधान म्हणाले. “वर पाहा. तो पक्ष्यांचा राजा गरुड, आणि तो खातो आहे तो साप. त्या सापाच्या विषाचा एक थेंब आपल्या गळ्यावर पडला. तो काढायला मी जात होतो. आणि त्यासाठी मला दगाबाज म्हणता! पण आता मी आपल्यापाशी राहून काही उपयोग नाही.” मग आत्तापर्यंत लक्ष्मी त्यांच्या ठायी कशा राज्य करत होत्या, ते त्यांनी राजाला सांगितले. “त्या माझ्यात होत्या, तोपर्यंत माझे उद्धटातले उद्धट वागणेही आपल्याला आवडले. मी आपल्या मुकुटाला लाथ मारली, तेव्हा मुकुटाखाली साप होऊन त्यांनी मला वाचवले. मी आपल्याला आणि राणीसाहेबांना पलंगावरून ओढले, तेव्हा त्यांनी छप्पर पाडले. आत्ता क्षणापूर्वी त्या मला सोडून गेल्या. आणि आता चांगल्या कामाचाही उलटा अर्थ घेतला जातो.”
लक्ष्मी असेपर्यंत
पुन्हा रानात
रानात जाऊन तपश्चर्या करायची परवानगी त्यांनी राजाकडे मागितली. पण राजाचे मन नेहमीसारखेच मोठे होते. त्याने त्यांना पुन्हा प्रधानपद देऊ केले. ऋषींनी ते घेतले नाही. लक्ष्मी आता सोडून गेल्या होत्या. अशा वेळी कोणतेही पद घेणे शहाणपणाचे ठरणार नाही, अशी त्यांना भीती वाटली. म्हणून त्यांनी रानातच राहायचे ठरवले. दक्षिण भारतात लोक या गोष्टीतून असा बोध घेतात: सुबत्तेची देवी लक्ष्मी आपल्यापाशी असते, तोपर्यंतच आपले भले होते. पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी दक्षिण भारतातल्या लोककथा मुंबईच्या एका इंग्रजी मासिकात मालिकेने प्रसिद्ध केल्या. डिसेंबर १८८८ च्या अंकातल्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.