सूर्याच्या कथा आणि इतर लोककथा
माळ्याची हुशार बायको
आंबा आणि मासे
एका गावात एक गरीब माळी आणि त्याची बायको राहत होते. घरामागे त्याचे पालेभाजीचे तीस लहान वाफे होते. रोज सकाळी सुमारे चार तास तो त्यातल्या निम्म्या वाफ्यांना पाणी देई. रोज संध्याकाळी बायको टोपलीभर भाजी कापून ठेवी. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ती गावात विकायचा. त्याचे एकदोन मापे तांदूळ मिळत. त्यावरच घर चालायचे. कधीमधी संध्याकाळी त्याला वरकड काम मिळे. मग इतर गरजांसाठी चार पैसे हाती येत. त्या गावात कालीदेवीचे एक देऊळ होते. देवळासमोर एक सुंदर तळे होते. तळ्याच्या काठी एक आंब्याचे झाड होते. तळ्यातले मासे आणि झाडाचे आंबे देवीचे होते. गावकऱ्यांना त्यांना हात लावायची सक्त मनाई होती. कोणी आंबा तोडताना किंवा मासा धरताना सापडला, तर त्याला लगेच गावाबाहेर काढत. एके दिवशी सकाळी माळी भाजी विकून घरी परत येत होता. वाटेत ते देऊळ लागले. झाडाला आंबे लगडले होते. माळ्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने चहूकडे पाहिले. नजर जाईल तिथवर कोणी दिसत नव्हते. म्हणून त्याने झटकन एक आंबा तोडला. आणि तो धुवायला तळ्यात उतरला. तेवढ्यात त्याला माशांचा एक सुंदर थवा दिसला. धोक्याची त्यांना कल्पनाही नव्हती. ते निवांत खेळत होते. माळ्याने पुन्हा चहूकडे पाहिले. कोणी दिसले नाही. एकाच झडपेत त्याने सहा गुबगुबीत मासे पकडले. मासे आणि आंबा त्याने टोपलीतल्या तांदळाखाली लपवले. आणि आपण सापडलो नाही, म्हणून खुशीत घरी गेला. माळ्याला मासे विशेष आवडत. घरी आल्यावर आणलेले सगळे त्याने बायकोला दाखवले. “ताजे मासे आणि हा आंबा, यांचे काहीतरी छान कर,” तो म्हणाला. आंबा तर त्यांनी आयुष्यात कधी चाखला नव्हता.
माळ्याची हुशार बायको
पिकोट्यावर वरखाली
मग तो परसात बागेला पाणी द्यायला गेला. हे काम तो नेहमी शेजाऱ्याच्या मुलाबरोबर करायचा. तो त्याचा मित्रच होता. पाणी काढायला ते पिकोटा वापरत. पिकोटा म्हणजे विहिरीशेजारी एका उंच खांबावर तोललेला एक लांब वासा. तराजूच्या दांडीसारखा तो एकीकडे खाली, दुसरीकडे वर होतो. त्याच्या एका टोकाला बादली टांगलेली असते. माळी त्या वाशावर चढला आणि त्याच्यावरून इकडून तिकडे धावू लागला. त्याच्या वजनाने वासा एका बाजूला झुकला, की बादली विहिरीत जाई. वासा परत उलटा झुकला, की बादली भरून वर येई. मित्र विहिरीपाशी उभा राहून पाणी काढून घेई आणि वाफ्यांना देई. इकडे बायकोने आंबा आणि मासे एका भांड्यात शिजायला ठेवले. त्याचा वास इतका गोड सुटला, की मासे अर्धवट शिजले असतानाच तिने एक तुकडा चाखून पाहिला. मग दुसरा. मग तिसरा. बघता बघता निम्म्याहून जास्त तिच्या पोटात गेले! शेवटी पदार्थ शिजला. उरलेले थोडे तुकडे तिने चुलीवरून उतरवले. ती ओसरीवर आली. नवरा पिकोट्यावरून वरखाली धावत होता. “पदार्थ तयार आहे, आत येऊन चव बघ,” अशी तिने त्याला खूण केली. त्याचे लक्षच नव्हते. तो धावतच राहिला. आणि धावताना त्याला हात हलवावे लागत होते. बायकोने त्याचा अर्थ असा घेतला, की तू तुझा वाटा खाऊन घे. निदान तिने तरी तसे समजून घेतले. म्हणून ती आत गेली आणि एक तुकडा खाल्ला. मग पुन्हा बाहेर येऊन त्याला बोलावले. पुन्हा तो हात हलवून सांगतो आहे, तू खात राहा, असे तिला वाटले. पुन्हा ती आत गेली आणि एक तुकडा खाल्ला. असे एक घटकाभर, म्हणजे चोवीस मिनिटे चालले. शेवटचा तुकडाही संपला.
माळ्याची हुशार बायको
देवी बोलते
“अरे देवा!” ती मनात म्हणाली. “नवऱ्याने किती हौसेने मासे आणि आंबा आणला होता! आणि मी खादाड, सगळे फस्त केले. तो आत आला, की त्याच्या रागाला पारावार उरणार नाही. स्वतःला वाचवायचा काहीतरी उपाय लवकर शोधला पाहिजे.” तिने ते भांडे घराबाहेर आणले. त्याच्यावर त्याच मापाचे दुसरे भांडे झाकले. आणि त्याच्यासमोर बसली. मग तिने केस मोकळे सोडले. डोके गरागरा फिरवून ते पार विस्कटून टाकले. आणि मोठमोठ्याने घुमू लागली. अशिक्षित, खालच्या जातीच्या घरातली बाई असे करू लागली, की तिच्या अंगात देवी किंवा भूत आले, असेच नेहमी समजतात. पिकोट्यावरून माळ्याने बायकोची ही अवस्था पाहिली. त्याचे मन त्याला खाऊ लागले. बायकोत झालेला हा बदल पाहून तो घाबरला. तो लगेच खाली उतरला आणि तिच्यासमोर उभा राहिला. त्याला पाहताच ती त्याच्यावर गरजली, “माझा आंबा आणि माझे मासे चोरून आज तू माझा अपराध का केलास? एवढे पाप करायची तुझी हिंमत कशी झाली? या उर्मटपणाचे काय फळ मिळते, ते लवकरच कळेल तुला!” “बायकोच्या अंगात देवी भयंकर संचारली आहे,” बिचारा माळी मनात म्हणाला. “देवीच्या शक्तीने ती मरूनसुद्धा जाईल! आता काय करू?” म्हणून तो देवीच्या पाया पडला. निदान त्याला तरी ती देवीच वाटत होती. “देवी आई,” तो म्हणाला, “आपला हा कुत्र्यासारखा दास आज वाट चुकला. या एका वेळी क्षमा करा. तो पुन्हा कधी असे करणार नाही.” “तर मग चोरीचा माल ज्या भांड्यात आहे, ते भांडे घेऊन धाव,” ती म्हणाली. “आणि माझ्या तळ्यात खोल बुडव. मग मासे जिवंत होतील. आणि आंबा झाडावर आपल्या जागी परत जाईल.” माळ्याने नम्रपणे हुकूम पाळला. भांडे घेऊन तो तळ्याकडे धावला. ते पाण्यात बुडवले आणि घरी परत आला. आपले पाप माफ झाले, शिजलेले मासे पुन्हा जिवंत झाले आणि आंबा परत झाडावर गेला, यावर त्याचा पूर्ण विश्वास बसला. अशा रीतीने त्या हुशार बायकोने स्वतःला नवऱ्याच्या रागापासून वाचवले. श्रीमती हॉवर्ड किंग्जकोट आणि पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १८९० मध्ये दक्षिण भारतातल्या लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. त्यातल्या एकविसाव्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.