सूर्याच्या कथा आणि इतर लोककथा
पाच सोन्याच्या वाट्या
भिक्षू आणि त्याची बायको
एका गावात भिक्षू नावाचा एक अगदी गरीब ब्राह्मण राहत होता. पोट भरायला त्याच्याकडे काहीच साधन नव्हते. रोज तो पहाटे उठे. नदीवर जाऊन स्नान करी आणि संध्या करी. मग बायको त्याला घासून लख्ख केलेले तांब्याचे भांडे देई. ते घेऊन तो गल्लोगल्ली, दारोदार भिक्षा मागत फिरे. चालताना वेदमंत्र म्हणत असे. दुपार होत आली, की तो घरी परते. दयाळू लोकांनी घातलेल्या तांदळाने भांडे भरलेले असे. सोबत थोड्या भाज्याही असत. घरी आल्यावर तो पुन्हा स्नान करी आणि घरच्या देवांची पूजा करी. तोवर बायको स्वयंपाक करी. प्रत्येक पदार्थाचा आधी देवाला नैवेद्य दाखवला जाई. मग भिक्षू जेवायला बसे. तो जे उरवी, ते बायको खाई. एका जेवणापुरता होईल त्याहून जास्त तांदूळ आला असेल, तर पुन्हा चूल पेटे आणि दुसरे जेवण होई. नाहीतर दिवसातून एकदाच जेवायचे. रात्र उपाशीपोटी काढायची आणि आपल्या गरिबीवर रडत बसायचे. अशी कित्येक वर्षे गेली. एके दिवशी बायकोला ते सहन होईना. तिने नवऱ्याला जवळ बोलावले. “भिक्षू,” ती म्हणाली, “किती वर्षे आपण असे हाल काढतो आहोत! आता मरण आले तरी बरे. पण मागच्या जन्मीच्या पापांचा हिशेब या गरिबीने पुरा फिटेपर्यंत परमेश्वर आपल्याला स्वर्गात नेणार नाहीत. आणि प्रामाणिकपणे पोट भरता येईल असे काही शिकावे, असे तुला कधी वाटलेच नाही. लहानपणी तू एकच कला शिकलास, भिक्षापात्रात तांदूळ गोळा करायची! माझी एवढीच विनंती आहे. कुठेतरी जा, आणि काहीतरी विद्या शिकून ये.”
पाच सोन्याच्या वाट्या
फांदीला टांगलेली शिदोरी
बायकोचे बोलणे ऐकून भिक्षूला लाज वाटली. उरलेले आयुष्य मानाने जगता येईल, अशी काहीतरी विद्या शोधायला दुसऱ्याच दिवशी सकाळी निघायचे, असे त्याने ठरवले. त्या दिवशी त्याने आणलेला सगळा तांदूळ बायकोने शिजवला नाही. थोडा त्याच्या प्रवासासाठी बाजूला ठेवला. दुसऱ्या दिवशी पहाटे भिक्षू स्नानाला नदीवर गेला. तेवढ्यात बायकोने परसातल्या विहिरीवर भराभर अंघोळ उरकली. ठेवलेला तांदूळ शिजवला आणि त्याची लहानशी शिदोरी बांधली. भिक्षू परत आला. तिची ही माया पाहून तो तिच्याकडे बघून हसला, आणि त्याने शिदोरी डाव्या खांद्यावर टाकली. शकुन चांगला आहे का, ते पाहायला बायको त्याच्या पुढे धावत बाहेर गेली. समोरून एक म्हातारी ताज्या पाण्याचा घडा घेऊन येत होती. तिने नवऱ्याला हाक मारली, “सुवासिनी येते आहे! हा चांगला शकुन आहे. परमेश्वर तुझ्या प्रवासाला आशीर्वाद देत आहेत. लगेच नीघ!” आणि तो निघाला. विद्या शिकायला कुठल्यातरी परक्या देशी जायचे होते. त्यासाठी भिक्षूला एक रान पार करावे लागले. त्या रानात वाटा नव्हत्या. उन्हाने तो होरपळला आणि फार थकला. भुकेकडे मात्र त्याने लक्ष दिले नाही. चालता चालता तो एका कोरड्या नदीपात्रापाशी आला. तिथे एका जागी अजून एक बारीक झरा हळूहळू वाहत होता. तो इतका दमला होता, की त्याने आपली शिदोरी इंगुदीच्या झाडाच्या फांदीला टांगली. इंगुदी हे नदीकाठी वाढणारे एक झाड. त्याच्याखाली तो गाढ झोपी गेला.
पाच सोन्याच्या वाट्या
देवांची देणगी
तो झोपला असताना पार्वतीदेवी आणि त्यांचे पती थोर परमेश्वर, म्हणजे साक्षात शिव, सहज त्या वाटेने चालले होते. देवींना फार भूक लागली होती. “स्वामी,” त्या म्हणाल्या, “इथे एक गरीब ब्राह्मण झोपला आहे. त्याने जेवणासाठी आणलेला भात त्या झाडाला टांगला आहे. मला फार भूक लागली आहे. आपण दोघे त्याच्या शिदोरीतले खाऊ आणि मग पुढे जाऊ.” परमेश्वरांना नाही म्हणवेना. त्यांनी स्वतः शिदोरी खाली काढली आणि ते झऱ्यापाशी गेले. पार्वतीदेवी मागोमाग गेल्या. दोघांनी पोटभर खाल्ले आणि ते परत आले. भिक्षू अजून झोपलेलाच होता. “बिचारा!” पार्वतीदेवी म्हणाल्या. “किती गाढ झोपला आहे. आपण त्याची शिदोरी रिकामी केली, हे त्याला ठाऊकही नाही. जागा झाल्यावर तो काय खाईल?” परमेश्वर म्हणाले, “काळजी करू नकोस.” त्यांनी आपल्या पायाखालून सोन्याच्या पाच वाट्या काढल्या आणि त्या रिकाम्या फडक्यात बांधल्या. देवींचा चेहरा आनंदाने उजळला. भाताची शिदोरी जिथे टांगली होती, तिथेच त्यांनी ते गाठोडे पुन्हा टांगले. मग त्या आपल्या स्वामींच्या मागोमाग कैलास पर्वतावर घरी गेल्या. संध्याकाळी, सूर्य मावळायला दोनेक तास उरले असताना भिक्षू जागा झाला. त्याने घाईघाईने गाठोडे खाली काढले आणि तो झऱ्याकडे गेला. गाठोडे जरा जड लागले. असे का, ते त्याला कळेना. म्हणून त्याने ते सोडले. आत सोन्याच्या पाच वाट्या एकात एक ठेवलेल्या होत्या. त्याने त्या वेगळ्या केल्या, तेव्हा प्रत्येक वाटीतून एक अप्सरा बाहेर आली. त्यांनी त्याला हजार प्रकारचे पदार्थ वाढले. ही देवांची देणगी आहे, हे त्याने लगेच ओळखले. वाट्या पुन्हा एकात एक ठेवल्या, तेव्हा अप्सरा नाहीशा झाल्या. आपली गरिबी या क्षणी संपली, अशी भिक्षूची खात्री झाली. बायकोला भेटायला तो आनंदाने लगेच घरी निघाला.
पाच सोन्याच्या वाट्या
सगळ्या गावाला जेवण
त्याच्या बिचाऱ्या बायकोने त्या सकाळी उरलेला शेवटचा तांदूळ त्याला दिला होता. तिला मूठभर तांदूळ देणारे दुसरे कोणी नव्हते. म्हणून तिला रात्रभर उपाशीच राहावे लागले. “मला मरण दे, नाहीतर माझ्या नवऱ्याला परत आण आणि हे हाल संपव,” अशी ती देवाची प्रार्थना करत होती. घरी परतायला कित्येक तास लागले. रात्र झाली होती. तेवढ्यात दारावर दोनदा टकटक झाली आणि हाक आली, “अगं!” तिने नवऱ्याचा आवाज ओळखला. डाव्या हातात बारीक वातीचा एक लहानसा दिवा घेऊन ती धावत गेली आणि तिने कडी काढली. दारात तो हसत उभा होता. “इतक्या लवकर परत आलास?” तिने विचारले. “हो ग,” भिक्षू म्हणाला. “परमेश्वरांची देणगीच इतकी मोठी आहे!” त्याने दाराला नीट कडी लावली आणि तो आत गेला. ती मागोमाग गेली. परमेश्वरांनी अद्भुत शक्तीच्या पाच सोन्याच्या वाट्या कशा दिल्या, ते त्याने तिला सांगितले. आपण खरे बोलतो आहोत, हे दाखवायला त्याने त्या वाट्यांतून तिला जेवू घातले. देवांची ही कृपा पाहून ती आनंदून गेली. त्या कृपेचा मान म्हणून तिला सगळ्या गावाला जेवण द्यायचे होते. भिक्षूने होकार दिला. आपल्या बायकोचे मन इतके उदार आहे, याचा त्याला आनंद झाला. शिवाय त्यांचे काही जाणार नव्हते. या वाट्या कितीही लोकांना जेवू घालू शकत होत्या! म्हणून सकाळी त्याने गावातल्या सगळ्या पुरुषांना आमंत्रण द्यायचे आणि तिने सगळ्या बायकांना, असे ठरले.
पाच सोन्याच्या वाट्या
कोणीच न जेवलेली पंगत
दुसऱ्या दिवशी सकाळी संध्या आटोपून भिक्षू घरोघर गेला. त्याने पुरुषांना जेवायचे आमंत्रण दिले, आणि त्याच्या बायकोने बायकांना. गावकरी थक्क झाले. “भिकारी कसले जेवण देणार?” ते म्हणाले. “पण आपण गेलो नाही, तर आपण त्याच्या गरिबीची थट्टा करतो, असे त्याला वाटेल. रीत म्हणून तरी जायला हवे. आपण आधी घरीच जेवून जाऊ.” म्हणून सगळे भिक्षूच्या घरी आले. कुठेच स्वयंपाकाची काही खूण दिसत नव्हती. घरी जेवून आलो ते बरे झाले, असे त्यांना वाटले. भिक्षूने पुरुषांना त्यांच्या त्यांच्या जागी बसवले. बायकोने बायकांना बसवले. मग भिक्षू आत गेला. त्याने गाठोडे सोडले आणि पाचही वाट्या वेगळ्या केल्या. प्रत्येक वाटीतून कितीतरी अप्सरा बाहेर आल्या. त्यांनी सुंदर वस्त्रे नेसली होती. केसांत सुवासिक मोगऱ्याचे गजरे होते. प्रत्येक हातात एकेक पात्र होते. पहिलीने पत्रावळी मांडल्या. दुसरीने पाणी शिंपडले आणि प्रत्येक पाहुण्याजवळ पाण्याचे भांडे ठेवले. बाकीच्यांनी आपल्या पात्रांतले पदार्थ पत्रावळींवर वाढले. प्रत्येक पाहुण्याचे वाढून होईपर्यंत अप्सरांची ती लगबग पाहून डोळ्यांचे पारणे फिटत होते. पण मूर्ख पाहुण्यांना जेवता येईना. ते घरून आधीच पोटभर जेवून आले होते! म्हणून जेवणापेक्षा ते दृश्य पाहण्यातच त्यांना जास्त मजा आली. देवांच्या कृपेबद्दल भिक्षूचे अभिनंदन करत ते घरी गेले.
पाच सोन्याच्या वाट्या
आसवनची पाळी
त्या गावात आसवन नावाचा एक श्रीमंत जमीनदार होता. सगळे काही आपल्यालाच हवे, अशा स्वभावाबद्दल तो गावभर प्रसिद्ध होता. तो भिक्षूकडे आला आणि वाट्या कशा मिळाल्या, ते त्याने विचारले. भिक्षूने त्याला सगळी हकिगत सांगितली. आपल्याला त्याचे काही देणेघेणे नाही, अशा आविर्भावात आसवनने ती ऐकली आणि तो निघून गेला. मग त्याने बायकोकडून एका गाठोड्यात जेवण बांधून घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते घेऊन तो त्या इंगुदीच्या झाडापाशी गेला. भिक्षूने केले होते, तसाच त्यानेही आपला भात फांदीला टांगला आणि झोपेचे सोंग घेतले. डोळे मिटले होते, पण तो पुरा जागा होता. त्या दिवशीही पार्वती आणि परमेश्वर त्या वाटेने गेले आणि त्यांनी त्याच्या शिदोरीतले खाल्ले. झऱ्यावरून परत आल्यावर परमेश्वरांनी भिक्षूसाठी केले होते, तशाच पाच वाट्या आसवनच्या गाठोड्यात ठेवल्या. आसवनने हे सगळे पाहिले. तो खूश झाला. त्याने गाठोडे उघडूनसुद्धा पाहिले नाही. तो तसाच धावत घरी आला. आता त्याचा मोठा बेत होता. स्वतः वाट्या वापरून पाहण्याआधी सगळ्या गावाला मोठी मेजवानी द्यायची. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने सगळ्यांना आमंत्रण दिले. या वेळी सगळे उपाशीपोटी आले. स्वर्गातली पक्वान्ने चाखायला पंगतीला बसले. आसवनने सगळ्यांचे अदबीने स्वागत केले. मग तो आत गेला आणि त्याने वाट्या उघडल्या. प्रत्येक वाटीतून कितीतरी न्हावी बाहेर आले, आणि त्यांनी सगळ्या पाहुण्यांचे चमनगोटे केले! ते न्हावी स्वर्गातले होते. त्यामुळे एकही पाहुणा त्यांच्या हातून सुटला नाही. आणि प्रत्येक जण आसवनला शिव्या देतच त्याच्या घरातून बाहेर पडला. पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १८८८ मध्ये दक्षिण भारतातल्या लोककथांच्या इंग्रजी पुस्तकाचा तिसरा भाग प्रसिद्ध केला. त्यातल्या अठराव्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.