सूर्याच्या कथा आणि इतर लोककथा
तीन बहिऱ्यांची गोष्ट
चिंचेची भाजी
कोणी गैरसमजाने काहीतरी करतो आणि शेवटी फजिती होते. अशा वेळी तमिळ लोक एक म्हण वापरतात, “मुच्चेविडन कडैयाय मुडिंददु.” म्हणजे, “तीन बहिऱ्यांच्या गोष्टीसारखे झाले.” ही ती गोष्ट. यातले तिघे बहिरे म्हणजे एक नवरा, त्याची बायको आणि एक गुराखी. एका दूरच्या गावात एक नवरा-बायको राहत होते. दोघेही चांगलेच बहिरे होते. बायको रोज एक पालेभाजी आणि एक सार करी. दोन्हीपैकी एकातच चिंच असे, आलटून पालटून. एके दिवशी भाजीत चिंच, दुसऱ्या दिवशी सारात. एके दिवशी जेवताना नवऱ्याला चिंचेची भाजी फार चविष्ट लागली. उद्याही हीच भाजी हवी, असे त्याने बायकोला सांगितले. पण ती बहिरी. तिला काही समजले नाही. दुसऱ्या दिवशी तिने नेहमीप्रमाणे बिनचिंचेची भाजी केली. नवरा जेवायला बसला. आपले सांगणे बायकोने धुडकावले, हे त्याच्या लक्षात आले. त्याचा पारा चढला. त्याने भाजी भिंतीवर फेकली आणि तणतणत घराबाहेर पडला. बायकोने पोटभर जेवून घेतले. मग नवऱ्यासाठी चिंचेची भाजी करून ठेवली. राग शांत व्हावा म्हणून नवरा तिठ्यावर जाऊन बसला. तेवढ्यात तिथे एक गुराखी आला. त्याची एक चांगली गाय आणि तिचे वासरू हरवले होते. कित्येक दिवस तो त्यांना शोधत होता. रस्त्याकडेला बसलेला माणूस पाहून त्याला वाटले, हा कोणी ज्योतिषी असावा. म्हणून त्याने विचारले, “माझी गाय कुठे सापडेल?”
तीन बहिऱ्यांची गोष्ट
तिठ्यावरचा ज्योतिषी
आता हा गुराखीसुद्धा चांगलाच बहिरा होता. गुराखी काय म्हणाला, त्यातला एक शब्दही नवऱ्याला ऐकू आला नाही. तो गुराख्याला शिव्या देऊ लागला. “चालता हो, मला शांतपणे बसू दे,” असे ओरडला. ओरडता ओरडता त्याने हात लांब करून गुराख्याच्या तोंडाकडे बोट दाखवले. गुराख्याला वाटले, ज्योतिषी हाताने गाय-वासराची दिशा दाखवतो आहे. तो त्या दिशेने निघाला. जाताना वचन दिले, “गाय-वासरू सापडले, तर वासरू तुमचे.” आणि काय योगायोग! ती दोघे खरोखरच तिथे सापडली! गुराखी खूश झाला. “काय पण ज्योतिषी आहे!” त्याला वाटले. “वासरू त्याला द्यायलाच हवे.” म्हणून तो गाय-वासरू घेऊन त्या बहिऱ्यापाशी परत आला. वासराकडे बोट दाखवून “घ्या” म्हणून विनवू लागला. दुर्दैवाने वासराची शेपटी मोडलेली आणि वाकडी होती. नवऱ्याला वाटले, शेपटी मोडल्याचा आळ हा गुराखी आपल्यावर घेतो आहे. त्याला त्यातले काहीच ठाऊक नव्हते. म्हणून त्याने “नाही नाही” म्हणून हात हलवला. गुराख्याला वाटले, याला वासरू नको, गाय हवी आहे. “किती हावरट आहात तुम्ही!” गुराखी म्हणाला. “मी वासरू द्यायचे कबूल केले, गाय नाही.” “मुळीच नाही!” नवरा म्हणाला. “तुझी गाय काय आणि वासरू काय, मला काही ठाऊक नाही. वासराची शेपटी मी मोडली नाही. दुसऱ्या कोणीतरी मोडली असेल.” असे दोघे बराच वेळ भांडत राहिले. एकाचे दुसऱ्याला काही कळेना. तेवढ्यात तिथून एक तिसरा माणूस आला. त्याला चांगले ऐकू येत होते. भांडण कशाचे आहे, ते त्याने लगेच ओळखले. आणि या दोघांच्या मूर्खपणाचा फायदा घ्यायचा, असे ठरवले.
तीन बहिऱ्यांची गोष्ट
कढईला चिकटलेली भाजी
तो अनोळखी माणूस गुराख्याशी मोठ्याने बोलला, पण बहिऱ्या नवऱ्याला ऐकू जाणार नाही असे. “हे बघ गुराख्या, तू गाय घेऊन घरी जा. हे ज्योतिषी नेहमीच हावरट असतात. वासरू माझ्याकडे ठेव. मी याला ते घ्यायला लावतो.” गाय वाचली म्हणून गुराखी खूश झाला. वासरू त्या माणसापाशी सोडून तो घरी गेला. गुराखी गेल्यावर तो माणूस नवऱ्याकडे वळला. “बघितलेत ना, या गुराख्याचे वागणे किती चुकीचे?” तो म्हणाला. “तुम्ही न केलेल्या गोष्टीचा आळ तुमच्यावर घेतो. गुराखी असलेच असतात. जगातले सगळ्यात मोठे मूर्ख! पण काळजी करू नका, मी तुमचा मित्र आहे ना. तुम्ही निर्दोष आहात, हे मी त्याला कसेही करून पटवीन. आणि त्याचे वासरू त्याला परत देईन.” नवऱ्याच्या जिवात जीव आला. मोडक्या शेपटीचा आळ नको म्हणून तो पळतच घरी गेला. अशा रीतीने, त्या दोघांच्या मूर्खपणामुळे आणि बहिरेपणामुळे, तो माणूस वासरू घेऊन घरी गेला. घरी नवरा जेवायला बसला. बायकोने त्याला चिंचेची भाजी वाढली. योगायोगाने त्याचे बोट पत्रावळीवरच्या त्याच जागी लागले, जिथे मागच्या जेवणात बिनचिंचेची भाजी वाढली होती. त्याने ते बोट चाटले. ती चव इतकी छान लागली, की आता त्याला तीच भाजी हवीशी झाली. तीच, जी त्याने भिंतीवर फेकली होती. बायको म्हणाली, “ती कढई तर मी केव्हाच रिकामी केली.” “मग निदान कढईला चिकटलेली भाजी तरी खरवडून आण!” नवरा म्हणाला. आणि तिने ती आणली. त्याच्या याच शब्दांवरून तमिळमध्ये दुसरी एक म्हण आली, असे म्हणतात. “सेवुरु किरैयै वलिच्चु पोडुडी सुनैकेट्ट मुली.” म्हणजे, “अगं अक्कलशून्य बहिरे, निदान कढईला चिकटलेली भाजी तरी वाढ.” अडाणी लोकांत ही म्हण हट्टी बायकोला उद्देशून म्हणतात. जी नवऱ्याचे मुकाट ऐकत नाही, आपल्याच मनाचे करते, तिला. श्रीमती हॉवर्ड किंग्जकोट आणि पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १८९० मध्ये दक्षिण भारतातल्या लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. त्यातल्या पहिल्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे. ती “मुच्चेविडन कडैयाय मुडिंददु” आणि “सेवुरु किरैयै वलिच्चु पोडुडी सुनैकेट्ट मुली” या दोन तमिळ म्हणींमागची गोष्ट आहे.