सूर्याच्या कथा आणि इतर लोककथा
तोंडबहाद्दर आणि हातबहाद्दर
दोन बहाद्दर
शेजारशेजारच्या दोन गावांत दोन नामांकित माणसे राहत होती. एकाचे नाव तोंडबहाद्दर. नुसत्या शब्दांनी तो चमत्कार करून दाखवी. दुसऱ्याचे नाव हातबहाद्दर. तोंडाने त्याला काहीच साधता येत नसे. पण ओझी वाहणे, लाकडे फोडणे, असले कोणतेही कष्टाचे काम तो करू शके. दोघांपैकी खरा वरचढ कोण, हे पाहण्यासाठी तोंडबहाद्दराच्या घरी एकत्र राहायचे, असे दोघांनी ठरवले. कित्येक महिने ते एकत्र राहिले. मग नवरात्राचा मोठा सण आला. सणाच्या पहिल्या दिवशी कालीदेवीला एक बकरा बळी द्यावा, असे हातबहाद्दराला वाटले. “मित्रा,” तो तोंडबहाद्दराला म्हणाला, “आपण दोघेही आपापल्या परीने बहाद्दर. बळीच्या बकऱ्यासाठी पैसे मोजणे म्हणजे आपल्याला लाजिरवाणे. आपण तो फुकटच मिळवला पाहिजे.” “हो, मिळवायलाच हवा,” तोंडबहाद्दर म्हणाला. “आणि कसा, ते मला ठाऊक आहे.” संध्याकाळपर्यंत थांब, असे त्याने मित्राला सांगितले. त्यांच्या घरापासून चालत अर्धा तासही लागणार नाही, इतक्या जवळ एक धनगर राहत होता. त्या रात्री त्याच्या वाड्यावर जाऊन एक बकरा चोरायचा, असे दोघा मित्रांनी ठरवले. अंधार पडला, तेव्हा ते दबकत दबकत वाड्यापाशी गेले. धनगराचे कळपाचे काम नुकतेच आटपले होते. गरम गरम भात खायला त्याला घरी जायचे होते. पण कळपावर लक्ष ठेवायला कोणी नव्हते. आणि जेवण चुकवायचे त्याच्या मनात नव्हते. म्हणून त्याने वाड्यासमोर आपली काठी जमिनीत रोवली आणि तिच्यावर आपली घोंगडी टाकली.
तोंडबहाद्दर आणि हातबहाद्दर
भूत-बित
मग तो काठीशी बोलला. “बाळा, मला फार भूक लागली आहे. मी भात खाऊन येतो. मी परत येईपर्यंत कळपावर लक्ष ठेव. या रानात वाघ आणि भुते खूप आहेत.” आपण मराठीत “चहा-बिहा” म्हणतो, तसे तमिळ लोकही एखाद्या शब्दाला यमक जुळणारा, पण काहीच अर्थ नसलेला शब्द जोडतात. म्हणून धनगर पुढे म्हणाला, “एखादा दुष्ट चोर, किंवा भूत-बित येईल आणि बकऱ्या चोरून नेईल. नीट लक्ष ठेव.” बित नावाची चीज जगात कुठेच नाही. एवढे बोलून धनगर निघून गेला. दोघा मित्रांनी हे सगळे ऐकले होते. धनगराची युक्ती पाहून तोंडबहाद्दर मनातल्या मनात हसला. चोरांना वाटावे, इथे पहारेकरी बसवला आहे, असा धनगराचा डाव होता. आणि प्रत्यक्षात होती फक्त जमिनीत रोवलेली काठी आणि तिच्यावर घोंगडी! पण हातबहाद्दराला ही युक्ती कळली नाही. त्याला वाटले, वाड्यासमोर खरोखरचा पहारेकरी पहारा देत बसला आहे. “आता काय करायचे?” तो मित्राला म्हणाला. “वाड्यासमोर पहारेकरी आहे.” तोंडबहाद्दराने सांगितले, “तो पहारेकरी नाही, नुसती काठी आहे.” मग दोघे वाड्यात शिरले. आता त्याच रात्री एक भूतसुद्धा बकरा चोरायला त्या वाड्यात आले होते. धनगराच्या तोंडून बितांचे नाव ऐकले, तेव्हा ते भीतीने थरथर कापू लागले. त्याने बितांचे नाव कधीच ऐकले नव्हते. बिते भुतांपेक्षाही ताकदवान असणार, असे त्याला वाटले. एखादे बित केव्हाही वाड्यात येईल! बिते म्हणजे काय, ते कळेपर्यंत त्याला कोणासमोर यायचे नव्हते. म्हणून ते बकरा बनले आणि कळपात जाऊन बसले.
तोंडबहाद्दर आणि हातबहाद्दर
जड बकरा
एव्हाना दोघे बहाद्दर वाड्यात शिरून बकरे निरखत होते. काही ना काही खोट काढून ते एकेक बकरा नाकारत गेले. शेवटी ते त्या बकऱ्यापाशी आले. तो खरा म्हणजे भूतच होता. त्यांनी उचलून पाहिला. तो फारच जड लागला. आत भूत असल्यावर जड लागणारच. मग घरी न्यायला ते त्याचे पाय बांधू लागले. त्यांनी त्याला हातांनी गदगदा हलवले, तेव्हा भुताची खात्री झाली, ही दोन माणसे म्हणजेच आपल्याला भीती वाटते ती बिते. “अरेरे, बिते मला न्यायला आली!” ते मनात म्हणाले. “आता काय करू? या वाड्यात आलो, हा केवढा मूर्खपणा!” हातबहाद्दराने ते डोक्यावर घेतले आणि तो निघाला. मागे त्याचा मित्र. पण थोड्याच वेळात सुटण्यासाठी भूत आपली दुष्ट शक्ती वापरू लागले. हातबहाद्दराचे सगळे अंग दुखू लागले. “मित्रा,” तो म्हणाला, “माझे सगळे अंग ठणकते आहे. आपण आणले ते बकरा नसावेच!” हे ऐकून तोंडबहाद्दर मनातून घाबरला. पण त्याला ते दाखवायचे नव्हते. म्हणून नुसता धीटपणा दाखवायला तो म्हणाला, “मग बकरा खाली ठेव. याचे पोट फाडू. म्हणजे आपल्याला अर्धा अर्धाच वाहावा लागेल.” हे ऐकून भूत घाबरले. कारण ते ज्याचे पोट फाडायचे म्हणत होते, ते त्याचेच पोट होते! ते हातबहाद्दराच्या डोक्यावरच विरघळून नाहीसे झाले. ते अभद्र ओझे उतरले म्हणून हातबहाद्दराला हायसे वाटले. आणि दोघे मित्र सुखरूप घरी पोहोचले.
तोंडबहाद्दर आणि हातबहाद्दर
भुते हसतात
भूतही घरी गेले. आपण थोडक्यात कसे वाचलो, ते त्याने बाकीच्या भुतांना सांगितले. सगळी भुते त्याला हसली. “किती रे मूर्ख तू!” ती म्हणाली. “जगात बित नावाचे काही नसते. ती माणसे होती. आणि तू मूर्खासारखा त्यांच्या हाती सापडलास. एवढा गोंधळ घालताना लाज नाही वाटत?” भुताला वाईट वाटले. “तुम्ही ती बिते पाहिली असती, तर असे बोलला नसतात,” ते म्हणाले. “मग दाखव ती तुझी बिते,” ती म्हणाली. “डोळ्याचे पाते लवते न लवते, तोच आम्ही त्यांचा चुराडा करू.” “कबूल,” ते भूत म्हणाले. दुसऱ्या रात्री ते त्यांना बहाद्दरांच्या घराकडे घेऊन गेले. लांबूनच म्हणाले, “ते त्यांचे घर. मला जवळ जायची हिंमत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा.” ते भूत एवढे घाबरलेले पाहून बाकीची भुते चकित झाली. आपल्या जातीतल्या एकाचाही जो शत्रू, त्याचा नायनाट करायचा, असे त्यांनी आपापसात ठरवले. मग मोठा घोळका करून ती बहाद्दरांच्या घरावर चालून गेली. आतल्या कोणाला पळता येऊ नये, म्हणून काही घराबाहेर उभी राहिली. काही परसात पहारा देत राहिली. आणि वीस भुतांनी भिंतीवरून उड्या मारून अंगणात प्रवेश केला. अंगणाला लागून असलेल्या ओसरीवर हातबहाद्दर झोपला होता. उड्यांचा धडधड आवाज ऐकून त्याने डोळे उघडले. अंगणात भुते! तो भीतीने गारठला. तोंडातून एक शब्दही न काढता तो जमिनीवरून घरंगळत गेला. तोंडबहाद्दर बायकोमुलांसह ज्या खोलीत झोपला होता, तिथपर्यंत पोहोचला. दारावर हळूच टकटक करून त्याने मित्राला उठवले.
तोंडबहाद्दर आणि हातबहाद्दर
गोड खाऊ म्हणून तीन भुते
“आता काय करायचे?” तो कुजबुजला. “भुते घरात घुसली आहेत. आपल्याला मारून टाकतील!” तोंडबहाद्दर शांतपणे म्हणाला, “घाबरू नकोस. जा, होतास तिथे जाऊन झोप. भुतांना मी पळवून लावतो.” हातबहाद्दराला काही कळले नाही. पण त्याला वाद घालायचा नव्हता. तो घरंगळत आपल्या जागी परत गेला आणि झोपेचे सोंग घेऊन पडला. पण त्याची छाती भीतीने धडधडत होती. मग तोंडबहाद्दराने बायकोला उठवले. “अगं,” तो म्हणाला, “ही मूर्ख भुते आपल्या घरात घुसली आहेत. पण मी सांगतो तसे केलेस, तर आपण वाचू. ती आपल्याला काहीही इजा न करता निघून जातील. माजघरात जा. दिवा लाव. जमिनीवर पत्रावळी मांड. आणि जेवायला उठवल्यासारखे मला उठव. मी उठून विचारीन, ‘जेवायला काय आहे?’ तू म्हण, ‘फक्त मिरीचे सार आणि भाजी.’ मी रागावल्यासारखे करीन आणि विचारीन, ‘आपल्या मुलाने शाळेतून येताना तीन भुते पकडून आणली होती, ती कुठे गेली?’ आणि तू म्हणायचेस, ‘तो कारटा घरी आला, तेव्हा त्याला गोड खायला हवे होते. घरात गोड काहीच नव्हते. म्हणून त्याने ती तिन्ही भुते भाजली आणि मटकावली.’”
तोंडबहाद्दर आणि हातबहाद्दर
बिताचा मुलगा
तोंडबहाद्दराने पुन्हा झोपल्याचे सोंग केले. बायकोने पत्रावळी मांडल्या आणि त्याला जेवायला हाक मारली. मग ठरल्याप्रमाणे दोघे बोलले. घरातल्या मुलाने तीन भुते भाजून गोड खाऊ म्हणून खाल्ली, हे भुतांना कळले. त्या मुलाची ताकद पाहून ती थरारली. “मुलगा जर तीन भुते गोड खाऊ म्हणून भाजून खातो,” ती मनात म्हणाली, “तर बाप जेवणात काय खात असेल?” ती लगेच पळत सुटली. ज्या भुताला ती हसली होती, त्याच्याकडे गेली आणि म्हणाली, “तुझे बरोबर होते. बिते आपले सगळ्यात मोठे शत्रू आहेत. इथे राहिलो, तर आपल्यापैकी कोणीच सुरक्षित नाही. आज संध्याकाळीच एका बिताच्या मुलाने आपल्यातली तीन भुते गोड खाऊ म्हणून भाजून खाल्ली.” म्हणून जवळच्या जंगलात पळून जायचे सगळ्यांनी ठरवले, आणि ती तिथून नाहीशी झाली. अशा रीतीने तोंडबहाद्दराने स्वतःला आणि मित्राला भुतांपासून दुसऱ्यांदा वाचवले. काही दिवसांनी दोघे मित्र जवळच्या एका गावाहून घरी परत येत होते. उशीर झाला होता. अर्धी वाटही झाली नव्हती, तोच रात्र पडली. पुढे जंगली जनावरांनी भरलेले दाट रान होते. म्हणून रात्र काढायला ते एका मोठ्या पिंपळावर चढले. हे तेच रान होते, जिथे भुते पळून आली होती. मध्यरात्री ती सगळी मशाली घेऊन बाहेर पडली. कोल्हे आणि इतर जनावरे पकडून मेजवानी करायला ती जमली, ती नेमकी त्याच झाडाच्या बुडाशी! हातबहाद्दर नखशिखांत थरथरू लागला. त्याची पकड सुटली आणि तो पानांतून धाडकन खाली कोसळला.
तोंडबहाद्दर आणि हातबहाद्दर
पिंपळावरून पडलेला
पण नेहमीप्रमाणे त्याच्या मित्राकडे युक्ती तयार होती. तो ओरडला, “या बिचाऱ्यांना मेजवानी करू द्यावी, असे मला वाटत होते. पण तुला भूक लागली आहे. मग उडी मार आणि त्यातली काही पकड. सगळ्यात लठ्ठ भूत हाती लागू दे बरे का!” भुतांनी तो आवाज ओळखला. ज्याच्या मुलाने तीन भुते गोड खाऊ म्हणून भाजून खाल्ली, तोच हा बित! ती ताबडतोब पळत सुटली. “अरे देवा, केवढी आपत्ती! आपले कट्टर शत्रू या रानातही आपल्या मागे आले!” असा आक्रोश करत. अशा रीतीने तोंडबहाद्दराने चतुराईने स्वतःला आणि मित्राला तिसऱ्यांदा वाचवले. सूर्य उगवू लागला, तेव्हा हातबहाद्दराने आदर म्हणून तोंडबहाद्दराला तीन प्रदक्षिणा घातल्या. “मित्रा,” तो म्हणाला, “आपल्या दोघांत खरा बहाद्दर तूच. बोलण्याचे कौशल्य नसेल, तर अंगातल्या ताकदीचा काही उपयोग नाही. शब्द कितीतरी जास्त बलवान असतात. ज्याच्याकडे दोन्ही आहेत, तो म्हणजे सोन्याचे कमळ, आणि त्याला सुगंधही! मला एवढे शिकायला मिळाले, ते पुरे. तुझी परवानगी असेल, तर मी माझ्या गावी परत जातो.” “तू माझे काहीही देणे लागत नाहीस,” तोंडबहाद्दराने मित्राला सांगितले. त्याच्या योग्यतेच्या माणसाचा करावा तसा त्याने त्याचा मान केला आणि त्याला त्याच्या गावी जाऊ दिले. श्रीमती हॉवर्ड किंग्जकोट आणि पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १८९० मध्ये दक्षिण भारतातल्या लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. त्यातल्या सातव्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.