सूर्याच्या कथा आणि इतर लोककथा
विषारी अन्न
झाडाखालचा भात
विजयनगर शहराच्या उत्तरेला एक लहानशी नदी वाहत होती. तिच्या दोन्ही काठांवर आंब्याच्या दाट राया होत्या. एके दिवशी एक तरुण ब्राह्मण यात्रेला निघाला होता. विसावा घ्यायला तो त्या नदीकाठी टेकला. जागा गार होती, छान सावलीची होती. म्हणून त्याने ठरवले, इथेच अंघोळ करायची, संध्या करायची आणि फडक्यात बांधून आणलेला भात खायचा. पण तिथे तो एकटा नव्हता. नदीकाठी एक म्हातारा ब्राह्मण पडला होता. सत्तरीच्या पुढचा. त्याची अवस्था फार केविलवाणी होती. घरच्यांशी भांडण झाले, म्हणून तो मरायला घर सोडून निघाला होता. तीन दिवसांपूर्वी तो या जागी आला होता. तेव्हापासून पोटात अन्नाचा कण गेला नव्हता. तरुण यात्रेकरूने आपल्या भातातला एक वाटा त्याच्याजवळ ठेवला. म्हातारा उठला आणि हातपाय धुवायला नदीवर गेला. जेवण्याआधी त्याला एकदोन मंत्र म्हणायचे होते. तो तिकडे गेला, तेवढ्यात एक घार खाली उतरली. तिच्या चोचीत एक भलामोठा साप होता. भात ज्या झाडाखाली ठेवला होता, त्याच झाडावर ती येऊन बसली. ती साप खाऊ लागली, तेव्हा सापाचे थोडे विष खालच्या भातावर टपकले. म्हातारा परत आला. भुकेने तो इतका व्याकूळ होता की त्याला ते दिसलेच नाही. त्याने घाईघाईने थोडा भात गिळला. आणि तो तिथल्या तिथे कोसळला. मेला. तरुण यात्रेकरूने त्याला जमिनीवर पडलेले पाहिले. तो मदतीला धावला. पण म्हातारा गेला होता. यात्रेकरूला वाटले, तीन दिवसांच्या उपासानंतर एवढ्या घाईने खाल्ले, म्हणूनच तो मेला असेल. प्रेत घारी-कोल्ह्यांसाठी तसेच टाकून जाणे त्याला पटेना. पुढे जाण्याआधी त्याचे दहन करायचे, असे त्याने ठरवले. तो धावत जवळच्या गावात गेला. आंब्याच्या राईत काय घडले, ते त्याने लोकांना सांगितले. आणि प्रेत जाळायला मदत मागितली.
विषारी अन्न
कालीचे देऊळ
पण गावकऱ्यांना वाटले, या तरुणानेच म्हाताऱ्याला मारले आणि लुटले. त्यांनी त्याला धरले. चाबकाने बेदम फोडले. आणि गावातल्या कालीदेवीच्या देवळात कोंडून ठेवले. तो यात्रेकरू मोठा विद्वान होता. त्याला चारही वेद, सहा शास्त्रे आणि चौसष्ट विद्या येत होत्या. देवळात कोंडलेला असताना त्याने देवीच्या स्तुतीचे श्लोक म्हटले. त्या श्लोकांतून त्याने आपले सगळे दुःख देवीपुढे मांडले. देवींनी ते श्लोक ऐकले. ज्या गावकऱ्यांनी अविचाराने एका निर्दोष माणसावर आळ घेतला आणि त्याला शिक्षा केली, त्यांच्यावर देवींचा कोप झाला. अचानक सगळे गाव जळून खाक झाले. लोकांचे होते नव्हते ते सगळे गेले. डोक्यावर छप्पर उरले नाही. संकटात सापडलेले लोक कालीच्या देवळात गेले. हे संकट आमच्यावर का आले, ते सांगा, अशी त्यांनी देवीची हात जोडून विनवणी केली. तेव्हा देवी एका गावकऱ्याच्या अंगात आल्या आणि त्याच्या तोंडून बोलू लागल्या. “निष्ठुर गावकऱ्यांनो, ऐका,” देवी म्हणाल्या. “माझ्याच देवळात तुम्ही एका निर्दोष माणसाला फटके मारले आणि कोंडून ठेवले. तो दानशूर आहे, धर्मनिष्ठ ब्राह्मण आहे. तो म्हातारा विषाने मेला. झाडावर घार साप खात होती. सापाच्या तोंडातून विष खालच्या भातावर पडले. हे तुम्हाला ठाऊक नव्हते. पण आधी तो दोषी आहे की निर्दोष, हे न विचारताच तुम्ही एका सज्जन माणसाचे हाल केले. म्हणून मी तुमच्या गावावर हे संकट आणले. सावध राहा. पुन्हा असे पाप कधी करू नका.” मग काली त्या माणसाच्या अंगातून निघून गेल्या. आपण किती चुकलो, हे गावकऱ्यांना कळले. त्यांनी त्या सज्जन यात्रेकरूला सोडून दिले आणि त्याची क्षमा मागितली. त्यानेही लगेच त्यांना क्षमा केली. तर अशी गोष्ट. भुकेल्या अनोळखी माणसाला ज्याने अन्न दिले, त्याच निर्दोष माणसावर त्याच्या खुनाचा आळ आला. श्रीमती हॉवर्ड किंग्जकोट आणि पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १८९० मध्ये दक्षिण भारतातल्या लोककथांचे इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केले. त्यातल्या ‘हरवलेला उंट’ या तेराव्या कथेवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे. पुस्तकात ही गोष्ट त्या कथेच्या आत येते. राजा अलकेश आपला मंत्री बोधादित्य याच्यावर रागाने आरोप करतो, की तो राजाच्या शयनगृहात शिरला. खरे तर बोधादित्य राजाचा जीव वाचवायला तिथे गेला होता. तेव्हा बोधादित्य ही गोष्ट सांगतो.