तेनाली रामन
अर्ध्या फणमाची मुद्रा
विष्णूच्या खुणा
तेनालीराम राजा कृष्णदेवरायाच्या दरबारात विदूषक होता. राजाचे राजगुरू वैष्णव होते. प्रत्येक खऱ्या वैष्णवाच्या खांद्यांवर विष्णूच्या खुणा असत, एका खांद्यावर एक. पंथाचे प्रमुख त्या खुणा डागून उमटवत. यालाच तप्तमुद्रा म्हणत. मुद्रा घेणारा नवा शिष्य त्याबद्दल गुरूंना दक्षिणा देई. ती एक-दोन महिन्यांच्या पगाराइतकी असे. शिवाय त्या दिवशी तो स्वतःच्या खर्चाने बऱ्याच ब्राह्मणांना जेवू घाले.
अर्ध्या फणमाची मुद्रा
राजगुरूंचे आमिष
राजगुरूंना वाटले, तेनालीराम आपला शिष्य झाला, तर तो आपल्याला फार मान देईल. म्हणून त्यांनी त्याला वैष्णवांची तत्त्वे शिकवली. “तुझ्या खांद्यांवर मला विष्णूच्या खुणा उमटवू दे,” ते म्हणाले. “तू वैष्णव हो. महाराजांकडे माझा शब्द चालतो. तो टाकून तुला लागेल ते मी मिळवून देईन.” “स्वामी,” तेनालीराम म्हणाला, “माझी याहून मोठी इच्छा दुसरी नाही. आपण सांगाल ते मी करीन.” तो नुसते सोंग करत होता. पण राजगुरूंना ते खरे वाटले.
अर्ध्या फणमाची मुद्रा
तेनालीरामची किंमत
होन हे सोन्याचे नाणे होते. फणम हे अगदी लहान नाणे. त्याची किंमत होनाच्या एका छोट्याशा भागाइतकीच. आता तेनालीरामने आपली किंमत सांगितली. “स्वामी, मला एक हजार होन हवेत, तेही आत्ताच. ती रक्कम आपण मला ताबडतोब मिळवून द्यावी. मी मुद्रा घेईन, त्या दिवशीच्या ब्राह्मणभोजनाचा खर्च आपण करावा. आणि आपल्या दक्षिणेपोटी मी एक फणम देईन.” राजगुरूंनी सगळे मान्य केले. तेनालीरामला वश करायला ही किंमत अगदीच किरकोळ आहे, असे त्यांना वाटले.
अर्ध्या फणमाची मुद्रा
एकाच खांद्यावर
राजगुरूंनी जवळचाच एक दिवस ठरवला. जेवणाचे सगळे सामान मागवले. मग तेनालीरामला बोलावणे पाठवले. तेनालीराम आला. त्याने स्नान केले. स्वच्छ वस्त्र अंगाभोवती गुंडाळले आणि राजगुरूंना वाकून नमस्कार केला. सुरुवातीचे सगळे विधी पार पाडले. मग मोठ्या भक्तिभावाचा आव आणून तो मुद्रा घ्यायला बसला. मुद्रेचा एका खांद्याला जेमतेम स्पर्श झाला. तेवढ्यात तेनालीराम ताडकन उठला आणि “अय्यो!” असे ओरडला. हातांनी तोंड आणि पोट बडवत तो थोडा दूर पळाला. “अर्ध्या फणमाची मुद्रा पुरे झाली!” असे तो पुन्हा पुन्हा म्हणत राहिला.
अर्ध्या फणमाची मुद्रा
अर्ध्यातच समाधान
त्याच्याभोवती लोकांची गर्दी जमली. “हे काय चालवले आहेस?” त्यांनी विचारले. “वैष्णव झालास तर खरे सुख मिळेल, असे हे पुरोहित मला म्हणाले,” तेनालीराम म्हणाला. “मी त्यांना एक फणम कबूल केला. त्यांनी एका खांद्यावर मुद्रा उमटवली. ती वेदना मला सहन होत नाही. म्हणून दुसऱ्या खांद्यावर उमटवायच्या आत मी पळतो आहे. अर्ध्या फणमाच्या मुद्रेतच मी समाधानी आहे, असे मी त्यांना सांगून टाकले आहे.” तिथले सगळे लोक खो खो हसले. आपण कसे फसलो, ते राजगुरूंनी ओळखले. ते फार ओशाळले. त्यांनी मान खाली घातली. पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १९०० मध्ये तेनालीरामच्या तमिळ गोष्टींचे इंग्रजी भाषांतर केले. त्यातल्या बाराव्या गोष्टीवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.