तेनाली रामन
चोरांनी शिंपली बाग
अंधारात सहा चोर
राजा कृष्णदेवरायाच्या दरबारात तेनालीराम विदूषक होता. एका रात्री त्याला कळले, की त्याच्या घराच्या मागच्या बाजूला सहा चोर लपून बसले आहेत. घरात शिरून चोरी करायला ते चांगल्या संधीची वाट पाहत होते. तेनालीराम घरातल्या खोल्यांमधून फिरला. त्याने आपले सगळे पैसे, दागिने आणि रेशमी कपडे नीट सुरक्षित ठेवून दिले. मग त्याने बायकोला हाक मारली. चोरांना ऐकू जाईल, इतक्या मोठ्याने. “सध्या या शहरात चोरांची फार भीती आहे,” तो म्हणाला. “आपल्याकडचे सगळे सामान एका मोठ्या पेटीत भरून ठेवू. धोका टळला, की परत बाहेर काढू.”
चोरांनी शिंपली बाग
विहिरीत धप्पकन
तेनालीरामने एक मोठी पेटी भरली. पण सामानाने नाही. दगड आणि ठोकळे भरले. घराबाहेर एक बाग होती. बागेत एक खोल विहीर होती. विहिरीतून काढलेले पाणी लहान लहान पाटांमधून झाडांपर्यंत जाई. तेनालीराम, त्याची बायको आणि मुलगा, तिघांनी मिळून ती पेटी विहिरीपाशी नेली. आणि आत टाकली. पेटी पाण्यात धप्पकन पडली आणि बुडाली. चोर हे सगळे पाहत होते. ते पुरते फसले. “आता घर फोडायची गरजच नाही,” ते म्हणाले. “विहिरीत उतरू आणि पेटी वर काढू. यांनी आपले काम किती सोपे करून ठेवले!”
चोरांनी शिंपली बाग
विहीर उपसायला सुरुवात
एक चोर मोठ्या उत्साहाने विहिरीत उतरला. पाहतो तो पाणी फार खोल. “यातले थोडे पाणी उपसून काढले,” तो म्हणाला, “तर पेटी सहज वर काढता येईल.” बाकीच्या सगळ्यांना ते पटले. विहिरीवर पाणी काढायच्या दोन लाटा होत्या. लाट म्हणजे खांबावर झुलणारा एक लांब वासा. त्याच्या एका टोकाला घडा बांधलेला असतो. चोरांनी तीन तीन जणांच्या दोन टोळ्या केल्या. एकेका लाटेवर एक टोळी. आणि ते कामाला लागले. घड्यामागून घडे भरून पाणी वर येत होते. चोर ते ओतत होते. ते पाणी पाटांमधून वाहत बागेत जात होते.
चोरांनी शिंपली बाग
झाडांना पाणी
तेनालीराम हळूच बागेत शिरला. त्याला कोणी पाहिले नाही. तिथे तो एक पाट उघडे, दुसरा बंद करी. असे करत त्याने प्रत्येक वाफ्याला पाळीपाळीने पाणी दिले. केळी, सुपारी, लिंबू, संत्री, नारळ आणि बाकीच्या सगळ्या झाडांना ज्याचा त्याचा वाटा मिळाला. विहिरीत पाणी भरपूर होते. ते काही कमी होईना. त्यामुळे चोर रात्रभर पाणी उपसतच राहिले. पहाट व्हायच्या जरा आधी तेनालीरामने मोठ्याने हाक दिली, “सगळ्या बागेला आता भरपूर पाणी मिळाले. आता थांबलात तरी चालेल.” तेव्हा चोरांच्या लक्षात आले, की याने आपल्याला पाहिले आहे. एवढ्यावरच सुटका झाली, याचा आनंद मानत ते पळून गेले. पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १९०० मध्ये तेनालीरामच्या तमिळ गोष्टींचे इंग्रजी भाषांतर केले. त्यातल्या दहाव्या गोष्टीवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.