तेनाली रामन
दुधाला घाबरणारे मांजर
एक गाय, एक मांजराचे पिलू
एकदा राजा कृष्णदेवरायाने आपल्या शहरातल्या प्रत्येक घराला एक मांजराचे पिलू आणि एक गाय दिली. प्रत्येक पिलाला त्याच्या गाईच्या दुधावर वाढवावे, अशी त्याने आज्ञा केली. राजाचा विदूषक तेनालीराम यालाही सगळ्यांसारखी एक गाय आणि एक पिलू मिळाले. बाकीचे सगळे घरवाले आपापली गाय दोहत आणि सगळेच्या सगळे दूध पिलाला देत. पण पहिल्याच दिवशी तेनालीरामने गाय दोहली आणि दूध उकळले. ते उकळते दूध तसेच त्याने पिलापुढे ठेवले. पिलाने मोठ्या उत्सुकतेने भांड्यात तोंड घातले. आणि त्याचे तोंड पोळले. त्या दिवसापासून दूध दिसले रे दिसले, की पिलू पळून जाई. आणि गाईचे सगळे दूध तेनालीराम स्वतःच पिई.
दुधाला घाबरणारे मांजर
राजा स्वतः पाहतो
सहा महिन्यांनी राजाने सगळी मांजरे आपल्यापुढे आणायची आज्ञा केली. प्रत्येक मांजर चांगले गुटगुटीत झाले होते. फक्त तेनालीरामचे नाही. त्याचे मांजर हडकुळे होते. आता मरते की काय, असे दिसत होते. “हे एवढे हडकुळे का झाले?” राजाने विचारले. “दूध पाहिले की ते पळून जाते,” तेनालीराम म्हणाला. “मी तरी काय करू?” “दूध आणा,” राजा म्हणाला, “आणि इथे, या मांजरापुढे ठेवा.” मांजराने दूध पाहिले. ते घाबरले आणि पळाले. राजाने ते पकडून आणवले आणि निरखून पाहिले. त्याचे तोंड पोळलेले होते. पण ही युक्ती पाहून राजाला हसू आवरेना. “म्हणतात ना, गरम पाण्याने एकदा पोळलेले मांजर गार पाण्यालाही घाबरते,” तो म्हणाला. “तू याच्यापुढे एकदाच गरम दूध ठेवलेस. आणि आता हे दूध नुसते पाहूनच पळते.” पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १९०० मध्ये तेनालीरामच्या तमिळ गोष्टींचे इंग्रजी भाषांतर केले. त्यातल्या नवव्या गोष्टीवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.