तेनाली रामन
हरवलेली ओळ
सहा पाने पुढे गेलेली ओळ
एकदा एका विद्वानाने राजा कृष्णदेवरायाच्या स्तुतीचे एक काव्य रचले. राजाचा विदूषक तेनालीराम याला हा कवी कधीच मान देत नसे. नेहमी त्याला तुच्छ लेखत असे. त्या काव्याच्या पोथीत एका श्लोकाची एक ओळ नव्हती. ती ओळ कुठे यायची, ते श्लोकातल्या एका खुणेने दाखवले होते. पण ओळ त्या पानावर लिहिलेली नव्हती. पुढच्या पाच पानांवरही नव्हती. ती पाने तर अक्षरांनी गच्च भरलेली होती. ओळ लिहिली होती पुढच्या सहाव्या पानावर, त्याच खुणेखाली.
हरवलेली ओळ
भर सभेत वाचन
एके दिवशी त्या काव्याचे सर्वांसमोर वाचन करण्याची आज्ञा झाली. वाचकाने काही श्लोक वाचून दाखवले. मग ओळ नसलेला श्लोक आला. तिथे तो थांबला. त्याला पुढे वाचता येईना. कवीने त्याला सहाव्या पानावर जाऊन तिथून वाचायला सांगितले. वाचकाला ओळ सापडली. त्याने श्लोक वाचला. त्यावर कोणी काही बोलले नाही. दुसऱ्या दिवशी कवी आपले बक्षीस घ्यायला दरबारात आला. त्या दिवशी तेनालीरामही दरबारात आला.
हरवलेली ओळ
तेनालीरामची नवी हजामत
तेनालीरामने सगळे डोके भादरून घेतले होते. ब्राह्मणाची शेंडीसुद्धा कापून टाकली होती. शेंडी होती तिथे दोन-तीन लहान खुंट तेवढे उरले होते. ती कापलेली शेंडी त्याने दरबारात आणली होती आणि शेजारी ठेवली होती. तो नेमका कवीच्या समोर जाऊन बसला. सगळी तयारी झाली, तसा राजा तेनालीरामकडे वळला. तेनालीरामने पगडी काढली. डोक्यावरचे खुंट बोटांनी चाचपले. मग शेजारी ठेवलेली शेंडी नीटनेटकी करत बसला. “हे काय?” राजाने विचारले.
हरवलेली ओळ
थोरांचा कित्ता
“हजामत चालू असताना मी न्हाव्याला शेंडी काढायला सांगितले,” तेनालीराम म्हणाला. “पण लगेच माझा विचार बदलला. अजून वेळ होती. म्हणून योग्य जागी खूण म्हणून थोडे खुंट ठेवायला लावले. आता ही शेंडी मी बरोबर घेऊन फिरणार आहे. कवी आणि विद्वान मंडळी असेच करतात.” “म्हणजे काय?” राजाने विचारले. “महाराज, हे विद्वान आता आपल्यासमोर बसले आहेत,” तेनालीराम म्हणाला. “काल यांचे काव्य सर्वांसमोर आले. त्यातल्या एका श्लोकाची एक ओळ नव्हती. तिच्या जागी यांनी खूण ठेवली, आणि ती ओळ सहा पानांनंतर दिली. मग मलाही गिरवायला थोरांचा कित्ता मिळाला!” कवी फार ओशाळला. त्याने मान खाली घातली. राजा आणि सगळा दरबार खो खो हसला. पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १९०० मध्ये तेनालीरामच्या तमिळ गोष्टींचे इंग्रजी भाषांतर केले. त्यातल्या तेराव्या गोष्टीवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.