तेनाली रामन
काळा कुत्रा पांढरा
झोपेतच दाढी
एके दिवशी सकाळी सूर्य उगवला, तरी राजा कृष्णदेवराय झोपलेलाच होता. त्या दिवशी त्याची दाढी करायची होती. न्हावी आला. पाहतो तो राजा झोपलेला. मग न्हाव्याने तिथेच त्याची दाढी केली. इतक्या हलक्या हाताने केली, की राजाला जागही आली नाही. न्हावी निघून गेला. राजा उठला. त्याने आरशात पाहिले. दाढी किती सफाईदार झाली होती! राजा फार खूश झाला. त्याने न्हाव्याला बोलावले आणि विचारले, “बोल, तुला काय हवे?” “महाराज,” न्हावी म्हणाला, “आपण मला ब्राह्मण करायलाच हवे.” तो जन्माने न्हावी होता.
काळा कुत्रा पांढरा
सहा महिन्यांत ब्राह्मण
राजाने काही ब्राह्मणांना बोलावले. “सहा महिन्यांच्या आत,” तो त्यांना म्हणाला, “तुम्ही या न्हाव्याला ब्राह्मण करायलाच हवे. त्याला तुमच्यात बसू द्या. तुमच्याबरोबर जेवू द्या. असे केले नाही, तर तुम्हाला दान मिळालेल्या सगळ्या जमिनी मी परत घेईन.” ब्राह्मण मनातून फार अस्वस्थ झाले. पण वरकरणी एवढेच म्हणाले, “जशी महाराजांची आज्ञा.” आणि न्हाव्याला घेऊन गेले. त्यांनी त्याला दिवसातून तीनदा स्नान करायला लावले. अग्नीत आहुती द्यायला शिकवले. सकाळची संध्या आणि बाकीच्या प्रार्थना शिकवल्या. पवित्र मंत्र म्हणायला शिकवले.
काळा कुत्रा पांढरा
शेवटची पायरी
सहावा महिना संपला. राजा ब्राह्मणआळीकडे निघाला. न्हावी आता ब्राह्मणांबरोबर जेवतो का, ते त्याला स्वतः पाहायचे होते. ब्राह्मणांनी बाकी सगळे केले होते. पण अजून ते त्याच्याबरोबर जेवले नव्हते. तसे केले असते, तर त्यांची जातच गेली असती. राजा येतो आहे, हे कळताच ते धावत राजाचा विदूषक तेनालीराम याच्याकडे गेले आणि मदत मागितली. “घाबरू नका,” तेनालीराम म्हणाला. “मी तुम्हा सगळ्यांना वाचवीन.”
काळा कुत्रा पांढरा
एक विचित्र विधी
तेनालीरामने एक काळा कुत्रा मिळवला. त्याच्या गळ्यात दोरी बांधून त्याला ब्राह्मणआळीजवळच्या एका तळ्यावर नेले. तिथे एका खड्ड्यात त्याने अग्नी पेटवला, होमासाठी पेटवतात तसा. चार ब्राह्मण पुरोहितांच्या मदतीने त्याने तिथे एखाद्या पवित्र होमाचे सगळे सोपस्कार केले. मग त्याने कुत्र्याला आंघोळ घातली आणि ओढत अग्नीभोवती फिरवले. कुत्रा धडपडत होता, केकाटत होता. पुन्हा त्याला पाण्यात बुचकळले. पुन्हा ओढत अग्नीभोवती फिरवले. बिचारा कुत्रा भुंकतच राहिला.
काळा कुत्रा पांढरा
काळ्याचा पांढरा
हे चालू असतानाच राजा तिथे आला. “या कुत्र्याचे असे हाल का करतो आहेस?” त्याने विचारले. “या काळ्या कुत्र्याला मी पांढरा करणार आहे,” तेनालीराम म्हणाला. राजाने त्याला वेडा म्हटले. जे होणे शक्यच नाही, त्याचा हा खटाटोप थांबव, असे त्याला सांगितले. तेनालीराम लगेच म्हणाला, “महाराज, न्हावी जर ब्राह्मण होऊ शकतो, तर काळा कुत्रा पांढरा का नाही होणार?” हा टोला आपण ओढवून घेतला, हे राजाने ओळखले. ब्राह्मणआळीत न जाताच तो राजवाड्यात परत गेला. आणि ब्राह्मणआळीत आनंदीआनंद झाला. पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १९०० मध्ये तेनालीरामच्या तमिळ गोष्टींचे इंग्रजी भाषांतर केले. त्यातल्या पंधराव्या गोष्टीवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.