तेनाली रामन
मिळेल त्यातले अर्धे
दोन पहारेकरी, एक वचन
एकदा तेलुगू मुलखातून एक भागवत मेळा राजा कृष्णदेवरायाच्या दरबारात आले. हे धार्मिक कलावंत होते. ते गात, नाचत, आणि कृष्णाच्या जीवनातल्या कथा करून दाखवत. राजाने राजवाड्यात त्यांचा खेळ ठेवला. आत जायच्या वाटेवर दोन दरवाजे होते. प्रत्येक दरवाजावर एक पहारेकरी होता. राजाने दोघांनाही सांगितले, “माझ्या विदूषकाला, तेनालीरामला, आत सोडू नका.” आत नाच रंगात आला होता. तेवढ्यात तेनालीराम पहिल्या पहारेकऱ्याकडे गेला. “मला फक्त आत जाऊ दे,” तो म्हणाला. “मला जे काही मिळेल, त्यातले अर्धे तुला देईन.” पहारेकऱ्याने त्याला आत सोडले. दुसऱ्या पहारेकऱ्यालाही तेनालीरामने तेच वचन दिले. आणि तो आत पोहोचला.
मिळेल त्यातले अर्धे
हा का कृष्ण?
तेनालीरामने बरोबर एक रवी लपवून आणली होती. ताक घुसळायची लाकडी रवी. त्याने ती बाहेर काढली. आणि कृष्णाचे काम करणाऱ्या नटाला एक फटका ठेवून दिला. “आई गं!” नट वेदनेने ओरडला. “शी!” तेनालीराम म्हणाला. “हा म्हणे कृष्ण? कृष्णाने तर गोपींच्या रवीचे कितीतरी फटके खाल्ले, असे म्हणतात. आणि याला माझ्या रवीचा एक फटका सहन होत नाही?” तेवढ्यात राजाचे त्याच्याकडे लक्ष गेले. “हा आत कसा आला?” तो म्हणाला. “याला चाबकाचे चोवीस फटके द्या.”
मिळेल त्यातले अर्धे
ज्याचा त्याचा वाटा
फटके द्यायला तेनालीरामला बाहेर नेत होते. तेव्हा तो दुसऱ्या पहारेकऱ्याकडे वळला. “मला मिळेल त्यातले अर्धे घ्यायचे तू कबूल केले होतेस ना?” त्याने विचारले. “खरे आहे,” पहारेकरी म्हणाला. “कबूल केले होते.” “मग ऐक. मला चोवीस फटके मिळाले आहेत,” तेनालीराम म्हणाला. “त्यांचे अर्धे बारा. ते तुझे.” मग दुसऱ्या पहारेकऱ्याला बारा फटके मिळाले. उरलेले बारा पहिल्या पहारेकऱ्याला मिळतील, अशी तेनालीरामने व्यवस्था केली. आणि स्वतः तेनालीरामला एकही फटका बसला नाही. पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १९०० मध्ये तेनालीरामच्या तमिळ गोष्टींचे इंग्रजी भाषांतर केले. त्यातल्या पाचव्या गोष्टीवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.