तेनाली रामन
राजाच्या शब्दाची परीक्षा
ज्योतिष्यांचे भाकीत
राजा कृष्णदेवरायाच्या दरबारात तेनालीराम विदूषक होता. एके दिवशी त्याने अगदी रडवेला चेहरा केला. राजाने ते पाहिले आणि विचारले, “तू एवढा उदास का? तुला काय हवे?” “काय सांगू, महाराज!” तेनालीराम म्हणाला. “ज्योतिषी म्हणतात, महिन्या-दोन महिन्यांत माझा मृत्यू आहे. मला माझ्या जिवाची काळजी नाही. दुःख एवढेच की, मी गेल्यावर माझ्या कुटुंबाची माझ्यासारखी काळजी कोणी घेणार नाही.” “त्याची मुळीच चिंता करू नकोस,” राजा म्हणाला. “तू घेतलीस त्याच्या दहापट चांगली काळजी मी तुझ्या कुटुंबाची घेईन. त्यात काय एवढे!” राजा खरेच मनापासून बोलला का, हे तेनालीरामने पारखून पाहायचे ठरवले. त्याने आजारी पडल्याचे सोंग केले. आजार दिवसेंदिवस वाढतो आहे, असे दाखवले. शेवटी आपण मेल्याची बातमी त्याने युक्तीने पसरवली.
राजाच्या शब्दाची परीक्षा
पैशांची पेटी
तेनालीरामकडे एक मोठी पेटी होती. तिच्यात तो पैसे, दागिने आणि भांडी ठेवत असे. ते सगळे त्याने आधीच बाहेर काढले होते. सुरक्षित जागी लपवले होते. आणि मग तो स्वतःच त्या पेटीत जाऊन बसला होता. तेनालीराम मेला, हे कळताच राजाने शिपाई पाठवले. “विदूषकाची पैशांची पेटी ताबडतोब घेऊन या,” असा हुकूम दिला. पेटीत भरपूर धन मिळेल, अशी राजाची अपेक्षा होती. पेटी राजवाड्यात पोहोचली. राजाने हावरेपणाने ती लगेच उघडली आणि आत डोकावून पाहिले. आत तेनालीराम बसला होता! “अरे!” राजा ओरडला. “सगळे तर म्हणत होते, तू मेलास.” “माझे कुटुंब आपल्या हवाली करून मी कसा मरणार?” तेनालीराम म्हणाला. “माझ्या कुटुंबाची काळजी घेणारे हेच का ते आपण?” राजा ओशाळला. तो काहीच बोलला नाही. पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १९०० मध्ये तेनालीरामच्या तमिळ गोष्टींचे इंग्रजी भाषांतर केले. त्यातल्या सतराव्या गोष्टीवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.