तेनाली रामन
सोन्याचे आंबे
आईची शेवटची इच्छा
राजा कृष्णदेवरायाची आई मरणाच्या दारात होती. तिने खायला आंबा मागितला. पण आंबा येण्याआधीच ती गेली. आईची शेवटची इच्छा आपण पुरी करू शकलो नाही, याचे राजाला फार दुःख झाले. त्याने काही ब्राह्मणांना बोलावले. “माझ्या आईला आंबा खायची इच्छा होती,” तो त्यांना म्हणाला. “पण आंबा मिळण्याआधीच ती गेली. आता तिच्या आत्म्याला शांती कशी मिळेल?” “सोन्याचे आंबे करवून घ्या,” ब्राह्मण म्हणाले. “मातोश्रींच्या वर्षश्राद्धाला ते ब्राह्मणांना दान करा. मग त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल.” राजाने त्यांचे म्हणणे खरे मानले. आणि सांगितल्याप्रमाणे सोन्याचे आंबे दान केले.
सोन्याचे आंबे
तेनालीरामचे श्राद्ध
तेनालीराम राजाचा विदूषक होता. दुसऱ्याच दिवशी त्याने सोन्याचे आंबे मिळालेल्या सगळ्या ब्राह्मणांना आपल्या घरी बोलावले. आपल्या आईचे वर्षश्राद्ध घरी आहे, असे त्याने सांगितले. ते आले. मग त्याने लोखंडी पळीचा दांडा तापवला. त्या दांड्याने त्याने प्रत्येक पाहुण्याला दोन ठिकाणी डाग दिले. ब्राह्मण रडत रडत गेले आणि त्यांनी राजाला सांगितले. राजाने तेनालीरामला बोलावले. “हे भयंकर कृत्य तू का केलेस?” त्याने जाब विचारला. “महाराज,” तेनालीराम म्हणाला, “माझी आई मरणाच्या दारात होती, तेव्हा तिच्या हातापायांना झटके येत होते. तापलेल्या लोखंडाचे डाग द्यायचे, असा उपाय ठरला होता. पण तापलेली पळी येण्याआधीच ती गेली. म्हणून तिच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी मी ते डाग ब्राह्मणांना दिले.” हे ऐकून राजा कितीतरी वेळ खो खो हसत राहिला. पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १९०० मध्ये तेनालीरामच्या तमिळ गोष्टींचे इंग्रजी भाषांतर केले. त्यातल्या सातव्या गोष्टीवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.