तेनाली रामन
तेनालीराम विदूषक झाला
तेनालीचा मुलगा
तेनाली नावाचे एक गाव होते. त्या गावात एक ब्राह्मण मुलगा जन्माला आला. हाच आपला तेनालीराम. एके दिवशी गावोगाव फिरणारे एक संन्यासी त्याला रस्त्यात भेटले. मुलाचे देखणे रूप आणि चटपटीत बुद्धी पाहून ते थक्क झाले. त्यांनी त्याला एक मंत्र शिकवला. “बाळा,” ते म्हणाले, “कालीदेवीसमोर उभा राहा. रात्रभर हा मंत्र पुन्हा पुन्हा म्हण. देवी तुझ्यासमोर येईल. तिला हजार तोंडे आहेत. तू न घाबरता तिच्यासमोर उभा राहिलास, तर ती तुला वर देईल. तू मागशील ते देईल.”
तेनालीराम विदूषक झाला
हजार तोंडांची देवी
त्या दिवसापासून तेनालीराम चांगल्या मुहूर्ताची वाट पाहू लागला. गावाजवळ कालीचे एक देऊळ होते. मुहूर्त आला, तसा तो देवळात गेला. देवीसमोर उभा राहून शिकवल्याप्रमाणे मंत्र म्हणू लागला. शेवटी काली प्रकट झाली. तिला हजार तोंडे होती, पण हात दोनच. रूप भयंकर होते. पण मुलगा जराही घाबरला नाही. उलट तो तिच्याकडे पाहून हसू लागला. “का रे हसतोस?” देवीने कडक आवाजात विचारले. “आई,” तेनालीराम म्हणाला, “आम्हा माणसांना नाक एकच, आणि हात दोन. तरी सर्दी झाली की ते एक नाक दोन हातांनी शिंकरताना आमच्या नाकी नऊ येतात. तुला तर हजार नाके! तुला कधी सर्दी झाली, तर हे दोन हात काय कामाचे?”
तेनालीराम विदूषक झाला
सुलट-उलट एकच पदवी
देवीला मुलाची हुशारी आवडली. “अस्सं! माझी थट्टा करतोस काय?” ती म्हणाली. “मग तू विदूषकच होशील. विकटकवी!” तमिळमध्ये विदूषकाला विकटकवी म्हणतात. हा शब्द सुलट वाचा की उलट, तसाच राहतो: वि-क-ट-क-वि. आपल्या मराठीतला ‘सरस’ हा शब्दही असाच आहे: स-र-स. “हे महादेवी, फारच छान वर दिलास!” तेनालीराम लगेच म्हणाला. “माझी पदवी उजवीकडून डावीकडे वाचा, मी विकटकवी. डावीकडून उजवीकडे वाचा, तरी मी विकटकवीच!” हे ऐकून देवी आणखीच खूश झाली. “तुझ्या या चतुराईमुळे तू एका राजाच्या दरबारात विदूषक होशील,” ती म्हणाली. “तिथे सगळे नेहमी तुझ्या बुद्धीचे कौतुक करतील.” आणि ती अंतर्धान पावली. पुढे विदूषक म्हणून तेनालीरामची कीर्ती वाढतच गेली. शेवटी याच कीर्तीमुळे तो विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याच्या दरबारात पोहोचला. आणि तिथेच राजाचा विदूषक म्हणून राहिला. पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १९०० मध्ये तेनालीरामच्या तमिळ गोष्टींचे इंग्रजी भाषांतर केले. त्यातल्या पहिल्या गोष्टीवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.