तेनाली रामन
तेनालीरामची चित्रकला
एकाच बाजूचे चित्र
राजा कृष्णदेवरायाने एक सुंदर नवा महाल बांधला. महाल अनेक मजली होता. राजाने एका चित्रकाराला बोलावले. महालाच्या भिंतींवर शोभतील अशी चित्रे काढ, असे त्याला सांगितले. चित्रकाराचे काम पुरे झाले. त्याने राजाला तसे कळवले. मग राजा मंत्र्यांना आणि इतर मंडळींना घेऊन महाल पाहायला गेला. राजाचा विदूषक तेनालीरामही बरोबर होता. सगळे खोल्याखोल्यांतून फिरले. चित्रांचे कौतुक करत पुढे गेले. एका चित्रासमोर तेनालीराम थांबला. त्या चित्रातली आकृती बाजूने काढलेली होती. तिची एकच बाजू दिसत होती. “महाराज,” तो म्हणाला, “या चित्रात एकाच बाजूचे हातपाय दिसतात. दुसऱ्या बाजूचे कुठे गेले?” राजा हसला. “ते सगळे मनात कल्पना करून पाहायचे असते,” तो म्हणाला. “एवढेही कळत नाही तुला?” “हो, आता कळले,” तेनालीराम अगदी भोळेपणाने म्हणाला.
तेनालीरामची चित्रकला
तेनालीराम चित्रकार झाला
काही दिवसांनी तेनालीराम राजाकडे आला. “आपला नवा महाल पाहिल्यापासून मी चित्रे काढायचा सराव करतो आहे,” तो म्हणाला. “आता मी त्यात चांगलाच तरबेज झालो आहे. आपण येऊन माझे सुंदर काम पाहायलाच हवे.” “असं का!” राजा म्हणाला. राजाचा राजवाडा नव्या महालाहून वेगळा होता. त्यातली चित्रे जुनी झाली होती. म्हणून राजा म्हणाला, “मग माझ्या राजवाड्यातली सगळी जुनी चित्रे पुसून टाक. त्यांच्या जागी नवी चित्रे काढ.” कामासाठी राजाने तेनालीरामला पानसुपारी दिली. काम पक्के करताना पानसुपारी देण्याची तेव्हा रीत होती. मग राजा राजवाडा सोडून दुसऱ्या एका इमारतीत राहायला गेला. राजवाडा त्याने तेनालीरामच्या हवाली केला.
तेनालीरामची चित्रकला
दुसरी बाजू
तेनालीरामने राजवाड्यातली सगळी सुंदर जुनी चित्रे पुसून टाकली. मग कुठे एक नख काढले, कुठे एक बोट, तर कुठे एक हात. असे करत करत त्याने सगळा राजवाडा रंगांच्या फराट्यांनी भरून टाकला. राजवाड्याची पुरती वाट लावली. “माझी चित्रे काढून झाली,” तो राजाला म्हणाला. “आपण येऊन पाहावीत.” राजाला ते खरे वाटले. तो बऱ्याच लोकांना घेऊन राजवाड्यात गेला. “तेनालीराम, हे काय?” राजा म्हणाला. “मला तर इथे नुसते सुटे अवयव आणि तुकडेच दिसतात.” “बाकीचे सगळे अवयव दुसऱ्या बाजूला आहेत, अशी मनात कल्पना करायची असते,” तेनालीराम म्हणाला. “काय महाराज! एवढी साधी गोष्ट आपण विसरलात?” “तू मला मूर्ख बनवलेस!” राजा ओरडला. “माझा सगळा राजवाडा खराब करून टाकलास.” राजाला फार शरम वाटली. तो रागारागाने निघून गेला. पंडित एस. एम. नटेश शास्त्री यांनी १९०० मध्ये तेनालीरामच्या तमिळ गोष्टींचे इंग्रजी भाषांतर केले. त्यातल्या सोळाव्या गोष्टीवरून ही गोष्ट पुन्हा सांगितली आहे.